आमचे मुख्यमंत्री -८१

केंद्रीय मंत्री

आंध्रच्या राज्यपालपदात त्यांचे मन रमले नाही. त्यांची त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात वीजमंत्री म्हणून नेमणूक झाली. ही नेमणूक ते मागासवर्गीय आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर. वीजमंत्री झाल्यावर विजेची चोरी रोखण्याकरता व विजेचे उत्पादन वाढवण्याकरता त्यांनी अनेक योजना आखल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ तात्पुरते उपाय करून विजेचा प्रश्न सुटणार नाही, तर त्याकरता उजानिर्मिती क्षेत्राची पुनर्रचना केली पाहिजे व वीजगळती, चोरी थांबवली पाहिजे.

मूल्यमापन

सुशीलकुमारजींनी अनेक मानाची पदे भूषविली व ते सुध्दा एका गरीब कुटुंबात जन्म झालेला असताना. ते महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्री होते. कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. आंध्रचे राज्यपाल झाले. लोकसभेचे सदस्य व केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. त्यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी सूचित केले गेले होते. ह्या सर्वांकडे पाहण्याच्या त्यांचा एक दृष्टिकोन आहे. तो असा – सत्ता असली तरी आनंद आहे, नसली तरी दुःख नाही. मी गरीबांचे आठवण विसरणार नाही. (लोकमत, मंथन – पान ८, रविवार दि. ४-९-२००५). डॉ. मेहेंदळे म्हणतात, त्यांचे व्यक्तिमत्व उमदे, देखणे व हसतमुख आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा. चपराशापासून चढत जाऊन ते नामदार झालेले आहेत. कॉंग्रेसशी निष्ठा हे त्यांचे एक शक्तिस्थान आहे. त्यांनी सातत्याने स्वतःच्या गरिबीची जाणीव ठेवून दुर्बल व गरिबांकरता अनेक योजना आखल्या. मोठेपणाने त्यांचा तोल सुटला नाही. ते एक अभ्यासू राजकारणी आहेत. राजकारण हा समाजपरिवर्तनाचा मूलमंत्र मानणारे ते एक बुध्दिजीवी योगी आहेत. राजकारण हा समाजधर्म बनविल्यामुळे ख-या अर्थाने ते सर्वधर्म समभावी, धर्मनिरपेक्षवादी नेते आहेत. त्यांनी जातीचे भांडवल केले नाही. सत्तेची पीठे निर्माण केली नाहीत. (डॉ. विश्वास मेहेंदळे, मला भेटलेली माणसे).

त्यांची प्रतिमा जनमानसात उजळून निघाली ह्याची कारणे त्यांची मनाची प्रसन्नता, सतत हसतमुख चेहरा, गरिबांविषयी सहानुभूती, रसिकता, वाड.मयप्रेम, हौशी वाचक, समाजसेवक ही ठाम भूमिका आणि प्रेमळ, आपुलकीचा स्वभाव ही होत.

सुशीलकुमारांच्या पुढे उज्ज्वल भविष्यकाळ आहे. कारण लोक म्हणतात की तो त्यांच्या पत्नीच्या नावातच आहे! त्यांचे अनेकविध गुण, समजूतदारपणा, लोकसंग्रहाची हौस, हेव्यादाव्यांपासून अलिप्त, गरिबांविषयी कळकळ हे त्यांचे भांडवल असून त्यांच्या जोरावर आज जे यश कोणाही व्यक्तीला लाभले नाही ते सुशीलकुमारांच्या आवाक्याबाहेरचे नाही.

संदर्भग्रंथः
१)    काळे पांडुरंग – जीवनपट सुशीलकुमार शिंदे, सुविधा प्रकाशन, गंगा निवास, सोलापूर.
२)    अनिल थत्ते – संध्यानंद, २४-११-२००५, पान ८.
३)    मराठे ह.मो. – एक माणूस एक दिवस – सुशीलकुमार शिंदे, पृष्ठे २४५-२६८.
४)    विश्वास मेहेंदळे – मला भेटलेली माणसे, १९९५, सिग्नेट पब्लिकेशन्स.
५)    मधुकर भावे – लोकमत – मंथन, ४-९-२००५, पृ. ८.
६)    राजू परुळेकर – माणसे भेटलेली व न भेटलेली – श्री. सुशीलकुमारजी शिंदे, नवचैतन्य
       प्रकाशन, बोरिवली (प), मुंबई ४०० ०९२.
७)    रणदिवे विठ्ठल – आत्मचिकित्सा प्रारब्धाचे नीलमणी – सुशीलकुमार शिंदे १७-२-२००३,
       जाईजुई प्रकाशन, जम्माचाळ, भवानी पेठ, सोलापूर

टीपः श्री. सुशीलकुमार शिंदे कामगार मंत्री असताना त्यांनी माझी नेमणूक बिडी कामगारांच्या किमान वेतन समितीवर दोन वर्षांकरता सदस्य म्हणून केली होती.     –डॉ. रायरीकर