• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-मीच यशवंतराव , आई... !

मीच यशवंतराव , आई... !

यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. बीड जिल्ह्यात त्यांचा दौरा चालू होता. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्याने चालला होता. एका पुलाजवळ एक म्हातारी आपल्या नातवंडांना घेऊन निर्धाराने उभी होती. ती मंत्र्यांच्या गाड्यांना धीराने हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न करीत होती. तिला न जुमानता एक- दोन गाड्या पुढे गेल्या. ती म्हातारी आपल्याला भेटण्यासाठीच थांबली आहे हे यशवंतरावांनी अचूक ओळखले. त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. ते डोंगरेंना म्हणाले, ' श्रीपादराव, त्या वृद्ध स्त्रीचं म्हणणं काय आहे बघा.'

डोंगरे खाली उतरून म्हातारीजवळ गेले. तिची अडचण विचारली. म्हातारी हुशार व धाडसी होती. ती आपल्या रांगड्या भाषेत म्हणाली, ' तुम्हापैकी यशवंतराव म्हन्तेला कोन ? त्येला म्होरं घ्या.'
डोंगरेंनी म्हातारीचा हा निरोप ( अर्थातच स्वत:च्या भाषेत ) यशवंतरावांना सांगितला. यशवंतराव खाली उतरले. त्या म्हातारीसमोर जाऊन दोन्ही हात जोडून वाकून अत्यंत नम्रपणे म्हणाले, ' मीच यशवंतराव, आई.... बोला काय गा-हाणं आहे ?'

म्हातारीनं क्षणभर यशवंतरावांना निरखलं आणि म्हणाली, 'गा-हाणं न्हाई लेकरा माझं काई ! ह्यो तुझ्या लेकराबाळास्नी खाऊ द्यायसाटी उभी हाय कवाधरनं, ' असं म्हणून म्हातारीने कमरेजवळ खोचलेली कापडी पिशवी बाहेर खेचून तिच्यातून बंदा रुपाया काढला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातावर ठेवला. त्यांची आलाबला घेतली. कानशिलाजवळ आपली बोटं मोडली. या जगावेगळ्या भेटीनं यशवंतराव थरारले. स्तब्ध झाले. काहीच न बोलता गाडीत येऊन बसले. एका अनाम वृद्धेकडून संतांच्या भूमीत तो रुपाया त्यांनी स्वीकारला होता. त्यांच्यासाठी हा एक कृपाप्रसादच होता !