• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-ही रात्र मी कधीच विसरणार नाही !

ही रात्र मी कधीच विसरणार नाही !

मुख्यमंत्री असताना यशवंतराव एकदा नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर गेले. दिवसभर जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम होते. रात्री साडेबाराच्या अजंठा एक्सप्रेसने मुख्यमंत्री औरंगाबादला जाणार होते. योगायोगाने त्याच दिवशी नांदेड येथील कलामंदिरात उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा शहनाईवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कार्यक्रम रात्री दहाला सुरू होणार होता. कलामंदिराचे विश्वस्त यशवंतरावांना निमंत्रण द्यायला विश्रामगृहावर गेले तेव्हा यशवंतराव म्हणाले, ' मी कार्यक्रमाला येईन, थोडा वेळ थांबेन. तुम्ही कार्यक्रम वेळेत सुरू करा. म्हणजे मला मध्यरात्रीची गाडी पकडता येईल.'

मुख्यमंत्री येणार म्हणून बिस्मिल्ला खाँ यांनाही आनंद झाला. कार्यक्रम बरोबर दहाला सुरू झाला. बिस्मिल्ला खाँ यांनी शहनाईला नमस्कार करून ती ओठात धरली व पहिला सूर बाहेर पडला. इतक्यात यशवंतराव आत आले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा आदाब त्यांनी हात जोडून स्वीकारला. शहनाईतून पुन्हा सुरांची बरसात होऊ लागली.

श्रोत्यांची व यशवंतरावांची तंद्री लागली. ती तंद्री मोडण्याची कोणाची इच्छा होईना. ' अंजठा एक्सप्रेस ' आली आणि गेली. मध्यंतर झाला. अधिका-यांनी जवळ जाऊन गाडी गेल्याचे सांगितले, पण यशवंतराव खूश होते. ते म्हणाले, ' गाडी गेली तर गेली. मोटारीने जाता येईल. गाडीनेच गेलो असतो तर अशा दिव्य आनंदाला मुकलो असतो व ती खंत आयुष्यभर राहिली असती.' उत्तररात्र सुरू झाली. बिस्मिल्लांनी पुन्हा एकदा सुरांची जादूगिरी सुरू केली. पहाटे तीन वाजता कार्यक्रम संपला. ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' अशी सर्वांची अवस्था झाली होती.

यशवंतराव उठून तडक ग्रीनरूममध्ये गेले. त्यांनी बिस्मिल्ला खाँ यांचे हात प्रेमाने हातात घेतले ते लवकर सोडलेच नाहीत. ब-याच वेळाने ते म्हणाले, ' खाँ साहेब, आजची रात्र मी कधीच विसरणार नाही. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.' असे म्हणून ते बाहेर पडले. आता खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून मोटारीने त्यांना औरंगाबादला जायचे होते.