केसेस काढता येणार नाहीत !
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यावेळी श्री. बी.जे. खताळ - पाटील हे नगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री होते. त्यांनी सांगितलेली ही आठवण.
यशवंतराव वर्षातून एकदा प्रत्येक जिल्ह्याला भेट देत असत. दिवसभरात जिल्ह्यात कार्यक्रम करून रात्री जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम करून कार्यकर्त्यांशी चर्चा करायची अशी त्यांची पद्धत होती. अशाच एका भेटीत नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील काही नेत्यांनी त्यांच्या भागातील काही कार्यकर्त्यांवरील फौजदारी केसेस माघारी घ्याव्यात असा आग्रह यशवंतरावांकडे धरला. यशवंतरावांनी लगेच उत्तर दिले नाही. रात्री बंगल्यावर त्यांनी खताळ पाटलांना एकट्यालाच बोलावून घेतले आणि सांगितले,' उद्या सकाळी तुम्ही जिल्हा पोलीस अधिक्षक आणि कलेक्टर यांच्याशी बोला. केसेस काढता येतील की नाही याची चर्चा करा, आणि तुमचे मत मला कळवा.' त्यानुसार खताळ पाटलांनी अधिका-यांशी चर्चा करून यशवंतरावांना सल्ला दिला की केसेस काढणे कठीण आहे. आपण प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करू नये. ' कार्यकर्ते सांभाळायचे की प्रशासनाची बुज राखायची असा पेच यशवंतरावांपुढे होता. शेवटी त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांना बोलावून घेतले आणि सांगितले , ' केसेस काढणे शक्य होणार नाही. प्रशासनाला त्याचे काम करू द्या. त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही.'
राजकारण करीत असतानासुद्धा यशवंतरावांनी प्रशासनाचा मान सांभाळला, म्हणूनच ते राज्याला व देशाला नेतृत्व देऊ शकले.