स्वातंत्र्यासाठी देशसेवा आणि हरिजनोद्धाराचा असा कार्यक्रम पारपाडीत असतांना जनतेंत आपल्या कार्याची कितपत प्रतिष्ठा आहे हे अजमावण्यासाठींच केवळ नगरपालिकेच्या यावेळीं होणा-या पोटनिवडणूकीत भाग घेऊन ग्रामसेवा करण्याचे आमच्या मित्रमंडळानें ठरविले व माझी उमेदवारी जाहिर करण्यांत आली आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन कोणत्याहि प्रकारची भीड न घालता जाहिर विनंतिनेच मतमागणी केली. जनतेंनें आमच्या सेवेबद्दल अमाप प्रेम व विश्वास प्रकट केला. पुष्कळच अधिक मते मिळून निवडून आलो.
याचकाळांत अनेक सहकारी मित्रांचा लाभ झाला. त्यापैकी उल्लेखनीय श्री. गौरीहर सिंहासने हे एक होत. त्यांच्या सहकारानें खटाव तालुक्यांत नवीन कार्यक्षेत्र निर्माण करतां आले. दुस-या गोलमेज परिषदेहून हिंदी प्रतिनिधी व महात्मा गांधी सन १९३२ च्या जानेवारीचे प्रारंभी भारतास परत आले. येतात न येतात तोच संयुक्त प्रांतांत करबंदी मोहीम सुरू झाली. बंगाल्यात दडपशाहीचे वटहुकूम निघाले आणि अखिल भारतांत कायदेभंगाची लाट पसरू नये, म्हणून व्हॉईसरॉय यांनी आर्डिनन्स काढले तेव्हां यासंबंधी बोलणे करण्याकरितां महात्मा गांधींना व्हॉईसरॉयची भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली, पण तीस नकार मिळाला. या सर्व गोष्टीमुळें कायदेभंगाच्या मोहिमेनें फिरून उचल खाल्ली. सन १९३२ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत महात्मा गांधी व इतर पुढा-यांना एका दिवसांत पकडून तुरुंगात कोंडण्यांत आले व देशांतील सर्व काँग्रेस कमिटया बेकायदेशीर संस्था ठरविण्यांत आल्या. परंतु खुद्द राष्ट्रीय सभा मात्र बेकायदेशीर ठरविण्यांत आली नाहीं. बेकायदेशीर काँग्रेस संस्थेचा कराड तालुक्याचा अध्यक्ष मी होतो. माझ्यावर सातारा कलेक्टरांनी हजेरीची नोटीस बजावली. माझ्याप्रमाणेंच कराडांत श्री. बाबुराव गोखले, पांडुतात्या भाटे वकील, वामनराव फडके वकील, जगन्नाथ तेली या मंडळीवरही नोटीसा बजावण्यांत आल्या. त्या अगोदर दे. भ. पांडुआण्णा शिराळकर व गणपतराव अळतेकर यांना अटक होऊन तुरुंगांत रवानगी झाली होती. श्री. बाबुराव गोखले, जगन्नाथ तेली व मी या सर्वांनी हजेरीची नोटीस मो़डून कायदेभंग केला. तिघानांही निरनिराळेवेळीं अटक झाली. सर्व प्रथम मला अटक झाली. नंतर जगन्नाथ तेली यांस अटक झाली. आम्हा दोघावरील खटल्याचा निकाल एकाचवेळी झाला. त्यांत प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व ५० रुपये दंड झाला. दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी अशा शिक्षा झाल्या. माझा दंड माझे परस्पर मी तुरुंगांत असतांना वसूल करण्यांत आला. श्री. यशवंतराव काँग्रेसच्या चळवळीची पद्धतशीर व्यवस्था करणेंत गुंतले होते. ही गोष्ट नोकरशाहीस न आवडून श्री. यशवंतरावांनाहि अटक करण्यांत आली. त्याचवेळी श्री. बाबुराव गोखलेना हजेरी नोटीशीच्या भंगाबद्दल अटक झाली. हे खटले निरनिराळे चालून श्री. यशवंतरावांना १९ महिन्याची सक्तमजुरी व गोखले यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्याचप्रमाणें श्री. गौरीहर सिंहासने यांच्या वरही कायदेभंगाचा खटला भरण्यांत येऊन त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली.
श्री. यशवंतरावांनी ठरवून दिल्याप्रमाणें तरुण मंडळींनी सातारा जिल्हा काँग्रेसचे तसेच कराड तालुका काँग्रेसचे डिक्टेक्टर नेमण्याच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम चालूच ठेविला. कराड तालुक्यांत अमाप उत्साही कार्यक्रम चालू होता. महाराष्ट्र काँग्रेसतर्फे प्रसुत होणारा बेकायदेशीर बुलेटिन्स सायक्लोस्टाईलवर छापून प्रसिद्ध करीत होते. ती छापणे व वाटणे तसेंच सर्व ठिकाणी पोहोचविणे हे कायं आमच्या व्यापारी प्रेसच्या जागेतच तरुण कार्यकर्ते करीत, पण त्याचा सुगावा बरेच दिवस लागू दिला नाहीं पण जेव्हा सरकारी यंत्रणेला हा सुगावा लागल्याची चाहूल लागली, तेव्हा जागा बदलून ते काम अव्याहत चालूच ठेवले होते. महाराष्ट्रांत नजरेंत भरण्यासारखी चळवळ कराडातूनच चालू होती. त्यामुळें सातारा जिल्ह्याचे नांव चळवळीबाबत अग्रेसर होते, त्याचे सर्व श्रेय श्री. यशवंतरावांच्या कार्यकुशलतेलाच होते. समाजात इतका उत्साह होता की, सरकारी दडपशाहीला पुरून उरण्याची तयारी सविनय कायदेभंगाने केली.