कृष्णाकांठ६६

या नव्या गुदमरणा-या वातावरणात सुरुवातीला मला झोप आली नाही. पण गेले चार-पाच दिवस मी इतका फिरत होतो आणि दिवसभर उपाशी असल्यामुळे इतका थकलो होतो, की नंतर झोप केव्हा लागली, हे मला कळलेच नाही.

सकाळी जागा झालो, तेव्हा माझ्या खोलीतील त्या दोन लोकांना मी पाहिले. आम्ही नंतर एकमेकांशी बोललो. तेव्हा एक निराळाच अनुभव आला. हाता-पायांत बेड्या असणारा हा माणूस कुठल्या तरी संस्थानातील कैदी होता. कराडच्या मॅजिस्ट्रेटच्या कचेरीत त्याच्यावर दुसरा खटला होता, म्हणून त्यासाठी त्याला तेथे आणला होता. अंगावर शिक्षा झालेल्या कैद्याचे कपडे होते. हातांत आणि पायांत बेड्या होत्या.

मी त्याला विचारले,

''हे सर्व असे का?''

त्याने सांगितले,

''मी तुरचीचा कृष्णा धनगर आहे.''

नाव ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तुरचीचा तात्या आणि कृष्णा ही एक जोडी त्यावेळी नामांकित होती. त्यांच्यापैकी हा असावा.

त्याचे व्यक्तिमत्त्व फार आकर्षक होते. उणा-पुरा सहा फूट उंच, गोरापान, नाक -डोळे अतिशय तरतरीत, हनुवटीवर अणकुचीदार दिसणारी बरीच वाढविलेली दाढी, हातापायांत खळखळ वाजणा-या त्याच्या बेड्या.

हे त्याचे रूप पाहून माझी तबियत मोठी खूश झाली. माझ्या मनात उगीचच विचार येऊन गेला, की 'राजसंन्यास'नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात बंदी असलेल्या संभाजीचे चित्र असेच काहीसे असले पाहिजे.

मी कराड जेलमध्ये असेतोपर्यंत कृष्णाची आणि माझी मोठी दोस्ती झाली. त्यालाही आम्हां मंडळींच्या चळवळीबद्दल काहीसे कौतुक होते. तो बाहेर चाललेल्या गोष्टींच्या हकीकती विचारू लागला आणि मीही त्या सांगू लागलो.

काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी मला आणि तात्या डोईफोडे यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले. आम्हांला आमच्यावरचे आरोप वाचून दाखविण्यात आले, आम्ही गुन्हा कबूल केला. मॅजिस्ट्रेटचे काम सोपे होते. त्याने तातडीने आम्हांला अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आणि खटल्याचे काम संपले.

एक मिनिटापूर्वी आम्ही कच्चे कैदी होतो. आता पक्के झालो होतो. त्या वयात अठरा महिने घरापासून आणि गावापासून दूर राहण्याची कल्पना मलाही थोडीशी अस्वस्थ करणारी वाटली. आमच्या काँग्रेस पक्षातर्फे हजर असलेल्या वकिलांनी मला सांगितले,
''तुम्हांला जास्त शिक्षा केली आहे. त्याचे कारण इतरांना दहशत बसावी.''

हे कदाचित शक्यही असेल, पण आता अठरा महिने राहणे भागच आहे, तेव्हा हे आनंदाने स्वीकारले पाहिजे, असे मी माझ्या मनाला सांगू लागलो.