बाबासाहेबांचा माझ्यावर फार वर्षांचा लोभ होता. मी त्यांचेही आभार मानले आणि टॅक्सी करून परत माधवाश्रमात आलो. श्री. के. डी. तेथे परत आले होते. त्यांना मी झालेला सर्व वृत्तान्त सांगितला. श्री. के. डी. हा मोठा व्यवहारी मनुष्य होता. मी त्यांच्याजवळ माझी भावना स्पष्ट केली. तेव्हा ते म्हणाले,
''तुमची भावना मी समजू शकतो; परंतु श्री. बाबासाहेब शिंदे यांनी दिलेला सल्ला मानून चालू या.''
मला त्यांचे सर्व काही बोलणे समजत होते, पण पटत नव्हते. मी सांगितले,
''मला या बाबतीत विचार केला पाहिजे. मी काही घाईघाईने हजर होणार नाही. आपण तूर्त परत जाऊ या.''
श्री. बाळासाहेबांनी नावांची घोषणा केली. त्यांमध्ये माझे नाव पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून प्रसिद्ध झाले आणि या प्रसिद्धीच्या वातावरणात मी दुस-या दिवशी कराडला पोहोचलो.
श्री. गणपतरावांचीही काहीशी निराशा झालेली दिसली. मी त्यांना, मला काय वाटत होते, ते सांगितले. त्यांनीही बाबासाहेबांचा सल्लाच मान, असे मत व्यक्त केले.
त्यानंतर जवळ जवळ दहा दिवस मी कराडमध्ये होतो आणि इतर मित्रांशी चर्चा करीत होतो. सर्वांचा मनोदय, मी जावे, असाच मला दिसला.
सौ. वेणूबाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. ती म्हणाली,
''आजपर्यंत एवढे कठीण निर्णय घेतलेत, तेव्हा तुमच्या मनात चलबिचल नव्हती; मग आताच असे का?''
मी याचा अर्थ समजलो.
मी माझ्या आईला शेवटी विचारले. ती म्हणाली,
''मला तुझ्या राजकारणातले काही समजत नाही. पण तुला काही नवे काम करायची संधी आली आहे, तर आता नको म्हणू नकोस.''
माझ्यासाठी हा आमच्या वरिष्ठ न्यायालयाचा आदेश होता. त्यामुळे मी मुंबईस निघण्याचा निर्णय केला.
दुस-या दिवशी संध्याकाळी सर्वांचा निरोप घेऊन, आईच्या पायांवर मस्तक ठेवून मी घराबाहेर पडलो आणि पुणे मार्गे रेल्वेने मुंबईच्या वाटेला लागलो. दुस-या दिवशी सकाळी पुणे स्टेशनवर त्या गाडीला जोडून असणारी मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन गाठली आणि त्या गाडीत जाऊन बसलो.