कृष्णाकांठ१७५

माझ्या निवडणुकीच्या यशानंतर मी माझ्या आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला.
त्यानंतर अनेक महिलांनी येऊन मला ओवाळले.

माझी पत्नी सौ. वेणूबाई हिनेही येऊन मला ओवाळले. तेव्हा माझे डोळे पाणावले. मी तिलाच ऐकू जाईल, असे सांगितले,

''वेणूबाई, या यशात तुझाही वाटा आहे.''

ती किंचितशी हसली आणि म्हणाली,

''अशी वाटणी करावयाची नसते.''

स्वातंत्र्य-लढ्यातले माझे अनेक मित्र आले. डोळ्यांत आनंदाश्रू आणून नि माझ्या गळ्यात पडून माझे अभिनंदन करून गेले.

या यशाचा जो आनंद मी अनुभवला, तो काही वेगळाच होता.

जीवनात असे क्षण क्वचितच येतात.

आमची ही निवडणूक १९४६ च्या मार्च महिन्यात झाली आणि मार्चच्या ३० तारखेला काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीची सभा मुंबईला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात भरणार आहे, असे निमंत्रण मिळाले. आमच्या सातारा जिल्ह्यातून निवडून आलेले बहुतेक सर्व उमेदवार एकत्र जमलो आणि सर्वजण मिळून मुंबईला निघालो. आमच्या निवडणुकीसाठी जी मोटार आम्ही भाड्याने ठरविली होती, ती तोपर्यंत आमच्याच ताब्यात होती. तेव्हा ती मोटार घेऊनच आम्ही मुंबईस गेलो. बरोबर आमच्या जिल्ह्यातील वृद्ध पुढारी श्री. भाऊसाहेब सोमण हे अत्यंत अगत्याने आले आणि आम्ही त्यांच्यासह सातारा ते मुंबई प्रवास मोठ्या आनंदात केला.

मुंबईत आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो. श्री. के. डी. पाटील, श्री. सिंहासने आणि मी मात्र 'माधवाश्रमात' मुक्कामाला गेलो.

पक्षाची सभा ही एक औपचारिक सभा होती. श्री. बाळासाहेब खेरांची पक्षनेता म्हणून औपचारिक निवड झाली. त्यावेळी सरदार पटेल हजर होते. त्यांनी आशीर्वादात्मक भाषण केले आणि सभा संपली. दुस-या दिवसापासून आम्ही पुन्हा मुंबईमध्ये भटकंती करायला सुरुवात केली. मंत्रिमंडळ बनविण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यामध्ये श्री. बाळासाहेब खेरांशी जाऊन भेटावे व बोलावे, असे माझ्या मनातही आले नाही. कारण त्यांची माझी ओळखही नव्हती. श्री. भाऊसाहेब सोमण जे आले होते, ते आमचे हरिजन उमेदवार श्री. गणपतराव तपासे यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आले होते, असे त्यांनीच मला सांगितले होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी कुणाला सांगावे, बोलावे, असा प्रश्नच निर्माण झाला नाही. पण श्री. के. डी. पाटील यांची मात्र इच्छा होती, की आपण काही प्रयत्न करावा. त्यांची आणि श्री. मोरारजीभाई देसाईंची येरवडा जेलमधील दाट ओळख होती. श्री. मोरारजीभाईंना भेटावे, असे त्यांच्या मनात आले. पण मी त्यांना आवरले. मी त्यांना सांगितले,

''आपले काम आणि नावे पुढाऱ्यांना माहीत असली पाहिजेत. नाही तर ते पुढारी कसले? आपण कृपा करून माझ्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जाऊ नका. तुम्हांला स्वत:साठी जाऊन प्रयत्न करावयाचा असेल, तर जरूर करा.''
ते म्हणाले,

''मला मंत्रिमंडळात जाण्याची मुळीच इच्छा नाही. प्रयत्न करावयाचा असेल, तर तो तुमच्यासाठी.''