• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ७३

लेनिनसंबंधीच्या गोष्टी डॉक्टर शेट्टी आणि ह. रा. महाजनी यांच्याशी बोलत असतानाच त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय या हिंदी कम्युनिस्ट नेत्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांनी देशत्याग करून कशा प्रकारे वनवास पत्करला, आणि हे वनवासाचे जीवन भटकत काढत असताना मेक्सिकोमध्ये त्यांनी कम्युनिझमचा स्वीकार कसा केला, त्याचप्रमाणे रशियन राज्यक्रांतीनंतरच्या बांधणीच्या काळात आंतरराष्ट्रीय कम्युनिझमच्या प्रसारानिमित्त उभारलेल्या संघटनेत रॉय यांनी लेनिनच्या बरोबर काही वर्षे काम कसे केले, या संबंधीच्या हकीकती त्यांनी मला विस्ताराने सांगितल्या. या हिंदी नावासंबंधी मला एक नवी जिज्ञासा वाटू लागली. डॉक्टर शेट्टी हे या सत्याग्रहात जेलमध्ये आले असले, तरी ते मानवेंद्रनाथ रॉय यांचे वैचारिक साथी होते, असे नंतर त्यांनी आम्हांला सांगितले. त्याचप्रमाणे मानवेंद्रनाथ रॉय हे त्यावेळी जेलमध्ये होते, तरी तेथून आपल्या सर्व मित्रमंडळींशी ते पत्रव्यवहाराने कसा संबंध ठेवतात, आणि आपले विचार कळवीत असतात, याची काहीशी गुप्त माहितीही त्यांनी मला सांगितली.

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नावाशी माझी पहिली ओळख अशी झाली आणि पुढे त्यांच्या विचारांशी असलेला संबंध काहीसा वाढत गेला. परंतु प्रथमच मी त्यांच्यासंबंधी येथे ऐकले, म्हणून मी याचा उल्लेख या ठिकाणी करीत आहे.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या अनेक सहकारी मित्रांच्या सोबतीमुळे आणि आग्रहामुळे काही काळ रॉय यांच्या विचारांचा पाठपुरावा केला होता. पण ती पुढची कहाणी आहे.

या राजकीय स्वरूपाच्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच वाङ्मयाच्या वाचनाची माझी आवड जुनी होती. तिला आता नवा अर्थ प्राप्त झाला. आचार्य भागवतांच्या बिछान्याभोवती रोज संध्याकाळी आम्हां अनेक जिज्ञासू सत्याग्रहींचा गराडा पडलेला असे.

आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते. प्रखर विद्वत्ता आणि तितकीच परखड वाणी ही त्यांची दोन मोठी आयुधे होती आणि ते अनेक विषयांवर तासन् तास बोलत असत. आणि ते निव्वळ ऐकूनसुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत, ज्ञानी झाला असता !

आचार्य भागवतांच्या श्रोत्यांतला मी एक कायमचा श्रोता होतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर मी तेव्हापासून अधिक भर देऊ लागलो.

एकदा बोलता बोलता सहज त्यांनी बॅरिस्टर सावरकर यांच्यासंबंधी उल्लेख केला. त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणावर त्यांनी सपाटून टीका केली. आचार्य भागवतांनी सावरकरांनी केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येसंबंधी विश्लेषण केले. या हिंदुत्वाच्या पायावर जर आम्ही राजकारण उभे करण्याचा प्रयत्न केला, तर भारताचे रहिवासी असलेल्या अनेकविध धर्मांतील लोकांची एकता कशी साधणार? जनतेची एकता हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. या हिंदुत्वाच्या आग्रहामुळे जनता एकसंध राहू शकणार नाही, म्हणून हा प्रतिगामी विचार आहे. भागवतांच्या टीकेचा हा सारांश होता. मला ही टीका पटली. ओघाओघाने कोणी तरी त्यांना विचारले,

''साहित्यिक म्हणून सावरकरांबाबत तुम्हांला काय वाटते?''

मघाशी त्यांच्यावर राजकीय टीका करणारे आचार्य भागवत एकदम बदलून गेले. त्यांच्या मनामध्ये, त्याचप्रमाणे बोलण्यामध्ये एक प्रकारचा हळुवारपणा निर्माण झाला आणि त्यांनी सांगितले,
''मला अत्यंत प्रिय आहेत, ते कवी सावरकर.''