• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ७२

वि. म. भुस्कुटे हे मार्क्सवादाचे नवे भोक्ते होऊ घातले होते. त्यांच्या मताने निव्वळ समाजवादाची पोकळ भाषा बोलून काही काम भागणार नाही, तर समाजवादाचा शास्त्रीय विचार करून त्या विचाराची पद्धती राजकीय लढ्यात स्वीकारल्याशिवाय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणार नाही, असे विचार ते मांडत.

गांधीवाद, समाजवाद व मार्क्सवाद या तिन्ही गोष्टींपेक्षाही वेगळा दृष्टिकोन ठेवून विचार करणारीही मंडळी होती. त्यांचे म्हणणे असे, की हे असे तात्त्विक आग्रह निरर्थक आहेत. टिळक, गांधी यांनी स्वराज्याची जी मागणी केली आहे, त्या मागणीसाठी ते जे सांगतील, ते आचरणात आणून इंग्रजांशी लढत राहिले पाहिजे आणि हेच आपणां सर्वांचे काम आहे. तत्त्वज्ञानाच्या घटपटादी वादामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. यामुळे उगीच बुद्धिभेद आणि माणसे एकमेकांपासून दूर जातात.

आमच्या बराकीत चाललेल्या विविध विचारांचे हे धावते चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर माझे विचारविश्व बनत होते. केव्हा केव्हा असे होई, की ज्यांचे म्हणणे ऐकावे, त्यांचे म्हणणे बरोबर आहे, असे वाटे. पण मग सगळ्यांचेच म्हणणे बरोबर कसे असेल? कोणते तरी एकच म्हणणे बरोबर असेल. मग ते कोणते? याचा निर्णय आपणच आपल्या मनाशी केला पाहिजे. शेवटी मी मनाशी ठरविले, की कोणताही निर्णय, कोणी सांगितले, म्हणून आपण स्वीकारावयाचा नाही. विचारांच्या क्षेत्रातील निर्णय हा आपला आपणच केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केले पाहिजे. चिंतन केले पाहिजे. जेलमध्ये तर वाचन केलेच पाहिजे; परंतु जेलच्या बाहेर गेल्यानंतरही वाचन व चिंतन सुरू ठेवले पाहिजे. प्रत्यक्ष जनतेत काम करीत असताना आलेल्या अनुभवाच्या आधारे यासंबंधीचे निर्णय घेतले पाहिजेत.

प्रथमतः मला अवघड वाटणा-या आणि माझ्या काहीशा आवाक्याच्या बाहेर असणा-या पुस्तकांच्या वाचनाला मी हात घातला. इग्रंजी शब्दकोशाचा वारंवार उपयोग करून आणि अवतीभोवतीच्या मित्रमंडळींशी चर्चा करून मी बरट्र्रँड रसेल यांचे 'रोडस् टु फ्रीडम' हे पुस्तक वाचले. जवळ जवळ एक महिनाभर मी हे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकाच्या वाचनामुळे विचारांच्या दिशा किती व्यापक आहेत, याचा अंदाज आला. आणि स्वातंत्र्याचा हा प्रश्न केवळ हिंदुस्थानपुरता मर्यादित नसून सर्व मानवजातीमध्येच या प्रकारच्या विचाराने खळबळ माजविली आहे, याचीही कल्पना आली. शास्त्रीय दृष्टीने विचार कसा करावा, याचा पहिला अनुभव मला रसेलच्या या पुस्तकाच्या वाचनातून आल्यासारखा झाला.

या पुस्तकाच्या वाचनानंतर आपण आणखी काही इंग्रजी पुस्तके वाचू शकू, असा आत्मविश्वास माझ्या मनात आला. आणि त्याप्रमाणे गांधीजींच्या जीवनावर, लेनिनच्या जीवनावर असलेली पुस्तके मी पाहू लागलो.

मार्क्सवादाच्या मला समजणा-या वाङ्मयाबरोबर रशियन राज्यक्रांतीबद्दलही मी बरेचसे वाचले. 'टेन डेज, दॅट शुक द वर्ल्ड' हे जॉन रीड् यांचे पुस्तक बाराव्या बराकीत फार लोकप्रिय झाले होते. मी त्या पुस्तकावरील चर्चा आणि त्याचे प्रत्यक्ष वाचन या दोन्ही तऱ्हांनी पुस्तक समजावून घेण्याचा प्रयत्न केला. रशियन राज्यक्रांतीची सगळी कहाणी रोमांचकारी आहे. आणि त्यातील लेनिनचे कार्य जागतिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची फार मोठी छाप माझ्या मनावर पडली. रशियन राज्यक्रांती ज्या प्रकाराने झाली, त्या प्रकारे इतर देशांत राज्यक्रांती होईल, की नाही, हे सांगणे अवघड आहे. किंबहुना हे काम जरा अवघड आहे, अशीच त्यावेळी माझी भावना होती. परंतु लेनिन यांच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या शक्तीबद्दल अचंबा वाटत राहिला. आणि लेनिनसंबंधी वाटणारी आदराची भावना तेव्हापासून जी मनात बसली, ती त्यानंतरही आजपर्यंत वाढत राहिली आहे.