• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ७४

एवढेच नव्हे, तर दुस-या दिवसापासून सावरकरांचे 'गोमंतक' आणि 'कमला' यांचे प्रकट वाचन सुरू करणार असल्याचे जाहीर करून ज्यांना कोणाला यायचे असेल, त्याने यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आता 'गोमंतक' आणि 'कमला' या काव्यांच्या वाचनासाठी आम्ही सर्व मंडळी दररोज जमू लागलो.

सावरकरांच्या या काव्याचा आस्वाद घेण्याची संधी मला प्रथमच मिळाली. त्यांतील 'कमला' काव्याची गोडी तर अवीट आहे. त्याची भाषा, त्यातल्या भावना आणि त्याच्यामध्ये असलेली देशप्रेमाची उत्कटता ही तरुण मनाला मोहून टाकणारी होती. मी यापूर्वीच सावरकरांची कविता का वाचू शकलो नाही, याचे मला आश्चर्य वाटू लागले.

या सामुदायिक वाचनानंतर इतरही काही पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाची पद्धतही आमच्या बराकीमध्ये रूढ झाली. याचे नेतृत्वही आचार्य भागवत यांच्याकडे होते. ते उत्तम शिक्षक असल्यामुळे आपल्याला जे आवडते आणि माहीत आहे, ते सर्वांना सांगून जाणते करावे, हा त्यांचा स्वभावधर्म होता. आणि त्यामुळे ते मोठ्या आनंदाने हे काम करीत असत. या तऱ्हेने शिक्षण देण्याची त्यांना हौस होती, पण त्याचबरोबर अर्धवट, अपु-या तऱ्हेने वाचन करणा-या लोकांवर त्यांचा राग होता.

मला एकदा आठवते, एक चांगले वकील असलेले गृहस्थ 'गीतांजली' वाचत होते. त्यांना काही शंका उद्भवल्या, म्हणून ते आचार्य भागवत यांना विचारू लागले.

''आचार्यजी, मी 'गीतांजली' वाचतो आहे, परंतु त्यातला दाऊ (Thou) आणि हिम (Him) यांचा नेमका अर्थ काय ?''

''तुम्ही रवींद्रनाथांची 'गीतांजली' वाचता आहात आणि त्यातला दाऊ (Thou) आणि हिमचा (Him) अर्थ तुम्हांला कळत नसेल, तर वाचायचे बंद करा!'' असे तुसडे उत्तर देऊन ते मोकळे झाले. जिज्ञासूला शिक्षित करावे, परंतु दांभिकपणाने वाचन करणाऱ्यांचा तिरस्कार करावा, अशी त्यांची मनोवृत्ती होती.

मी भुस्कुटे यांच्याकडेही जाऊन बसत असे आणि त्यांच्याकडून मार्क्सवादाचा विचार समजावून घ्यायचा प्रयत्न करी. भुस्कुटे हे आचार्यासारखे प्रतिभासंपन्न विद्वान नव्हते. परंतु त्यांनी आपला मार्क्सवादाचा अभ्यास अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अत्यंत प्रामाणिकपणे चालू केला होता. त्यावरील काही ग्रंथांचे मराठी वाचकांसाठी भाषांतर करण्याच्या कामातही ते गुंतले होते. असहकाराच्या चळवळीत त्यांची वाढ झाली होती. त्यामुळे गांधीवादाच्या परंपरेत ते वाढले होते. परंतु ३२ सालच्या या जेलमधील वास्तव्यास त्यांच्या विचारात परिपूर्ण बदल झाला होता. साम्यवादाचा स्वीकार केल्याशिवाय हिंदुस्थानचे आणि जगाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे असे. त्यांच्याजवळची समाजवादासंबंधीची काही सोपी सोपी पुस्तके त्यांनी आम्हांला वाचायला दिली. त्यांतली बरीचशी पुस्तके वाचायला आणि समजायला अवघड असणारी अशी होती. पण त्यांनी दिलेली 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' ही पुस्तिका मी त्यांच्याजवळ बसूनच समजावून घेऊन अभ्यासली.

मार्क्सच्या विचारांचे, पुसट का होईना, दर्शन व्हायला 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' ही पुस्तिका पुरेशी आहे, असे माझे तेव्हापासून मत बनले आहे. इतिहासाच्या विकासाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची नजर मार्क्सने जगाला दिली, असा माझा समज झाला आणि तो आजही कायम आहे. मार्क्सच्या पद्धतीने हिंदुस्थानचे प्रश्न सुटतील, की नाही, याचा माझा निर्णय तेव्हा होत नव्हता. वाटे, की मार्क्सच्या विचाराकडे पाठ न फिरविता हिंदुस्थानने आपले प्रश्न आपल्या अनुभवातूनच सोडविले पाहिजेत.