• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ११०

१९३७ साली रॉय हे सुटून आल्यानंतर त्यांनी जसा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा केला, तसाच देशाच्या इतर भागांतही त्यांनी दौरा केला. काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे मनापासून स्वागत केलेले मला दिसले नाही. त्याचवेळी माझ्या मनात पाल चुकचुकली. १९३१ साली कराची काँग्रेसमध्ये मूलभूत हक्काचा जो ठराव पास झाला, त्यावेळी रॉयसाहेब भूमिगत अवस्थेत कराचीत होते व तो ठराव करण्यासंबंधी पंडितजी आणि त्यांच्यांत काही चर्चा झाली होती. त्या ठरावाच्या मांडणीमध्ये त्यांचा काहीसा हात होता, असे रॉयवादी मंडळी मला सांगत असत. त्यामुळे असे वाटत असे, की काँग्रेसचे नेतृत्व रॉयसाहेबांच्या सहकार्याची अपेक्षा करील. परंतु हे होणे शक्य नाही, असे आता स्पष्ट दिसू लागले. पुढे रॉयनी स्वतःचे 'इंडिपेंडंट इंडिया' नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि त्या साप्ताहिकात ते ज्याप्रमाणे घटना समितीच्या (Constituent Assembly) प्रस्थापनेवर प्रचार करत होते, त्याचबरोबर काँग्रेसच्या हल्लीच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व उभे केले पाहिजे, असाही विचार मांडत होते.

मी रॉयवादी मित्रांच्या बरोबर जिल्ह्यात काम करीत असलो, तरी पर्यायी नेतृत्वाच्या कल्पनेसंबंधाने माझ्या मनात मूलभूत शंका होत्या आणि त्या मी ह. रा. महाजनी आणि आत्माराम बापू पाटील यांच्याशी स्पष्टपणे बोलत असे. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा-माझा चांगला परिचय होता. परंतु ते रॉयसाहेबांच्या आंतरगोटात असल्यामुळे उच्च नेतृत्वाच्या वर्तुळात होते. त्यामुळे त्यांची भेट होणेही मुश्किल असे. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नासंबंधीचा अधिक खुलासा करून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही. याच्यापूर्वी मी एका वैचारिक त्रिकोणात उभा होतो, असे सांगितले, ते या क्षणी. मी या त्रिकोणातील जीवन तसेच चालू ठेवले, कारण दैनंदिन कामामध्ये त्याची अडचण येत नव्हती. साता-यातील इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी माझे स्वतंत्र संबंध प्रस्थापित झाले होते आणि मी त्यांच्याशी या वैचारिक बाबीही बोलत असे. प्रत्यक्षात काय अनुभव येतो, ते पाहू. आज होय, की नाही, असा निर्णय घेण्याची गरज नाही, असे त्यांचेही मत पडले.

रॉयसाहेबांनी पुणे येथे मार्क्सवादावर तीन व्याख्याने दिली. त्या व्याख्यानांना मी हजर राहिलो व ती मी काळजीपूर्वक ऐकली. रॉयसाहेब गाढे विद्वान होते, पण उत्तम वक्ते नव्हते. त्यांनी तर्कदृष्ट्या सुसंगत असे आपले विचार मांडले आणि माझ्याप्रमाणे पुण्यातील इतरांवरही त्यांचा प्रभाव पडला.

१९३९ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्याची एक राजकीय परिषद आम्ही तासगाव येथे घेतली. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस कमिटीमध्ये आम्हां मित्रांचे वर्चस्व होते. या राजकीय परिषदेला अध्यक्ष म्हणून कोण पाहुणे बोलवावयाचे, याचा निर्णय आम्हांला घ्यावयाचा होता. रॉयसाहेबांचे आमच्यावर ताजे संस्कार असल्यामुळे आम्ही रॉयसाहेबांना निमंत्रण द्यावयाचे ठरविले आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरेंना सांगून त्याला मान्यता मिळविण्याची विनंती केली. त्यांची मान्यता मिळाली आणि त्याप्रमाणे ते या महत्त्वाच्या राजकीय परिषदेला हजर राहण्यासाठी तासगावला आले. तेथे त्यांची माझी दुसरी भेट थोड्या वेळासाठी झाली. मी त्यावेळी काँग्रेसच्या पर्यायी नेतृत्वाची कल्पना परिषदेत वादग्रस्त होण्याची शक्यता आहे, हे त्यांच्या नजरेस आणून दिले. त्यांना ते रूचले नाही. पण मी हे काम तेवढ्यावरच सोडून दिले. कारण ते आमचे पाहुणे होते. आमच्या परिषदेचे अध्यक्ष होते. परिषद कशी यशस्वी करणे शक्य आहे, या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करू लागलो.

या परिषदेला आम्ही रॉयसाहेबांना अध्यक्ष म्हणून बोलाविले, हे ऐकताच आमच्या जिल्ह्यात विरोधाची एक मोठी लहर जुन्या-नव्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येऊन गेली. वाळवे तालुक्यातील आत्माराम बापूविरोधी असणा-या नाना पाटील आदी मंडळींनी या बाबतीत आपला विरोध असल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे ही परिषद वादग्रस्त होणार, हे स्पष्ट झाले. आत्माराम बापूंनाही याची जाणीव झाली. आणि तेही इतर रॉयवादी मंडळींबरोबर खूप परिश्रम करीत होते. पण शेवटी परिषदेमध्ये हिंदुस्थानच्या पर्यायी नेतृत्वाच्या संबंधीचा ठराव काही मंडळींनी मांडण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला. काही भाषणे आधी होऊन गेली होती. हाच त्यातला एक चांगला भाग होता. रॉयसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा ठराव मांडला गेला व तो पास झाला, की नापास झाला, हे सांगणे अवघड होते. अशा परिस्थितीत ती परिषद विरोधी मंडळींनी उधळून लावली. जिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांच्या मनात एक प्रकारची निराशा व नाराजी निर्माण झाली. एवढ्या परिश्रमाने परिषद उभी केली आणि एवढा मोठा माणूस अध्यक्ष म्हणून बोलावला असताना ही परिषद अशा पद्धतीने मोडावी, याचे दुःख मलाही फार झाले. रॉयसाहेबांची समजूत काढण्याचा प्रश्न आम्ही ज्येष्ठ मंडळींकडे सोपवून दिला.