• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१०९

मी एक-दोन वेळा या बाबतीत ह. रा. महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वामनराव कुलकर्णी यांच्याशी माझी ही भावना आणि शंका स्पष्ट केली. तेव्हा त्यांनी त्या संबंधात रॉयसाहेबांच्या विचारांचे काही वाङ्मय मला वाचायला दिले. त्या वाङ्मयाचा आशय पुढीलप्रमाणे होता :

मार्क्सवादी पद्धतीने सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांतीची लढाई आहे आणि ती करत असताना कामगार-वर्ग, गरीब शेतकरी यांना एकत्र घेऊन त्यांच्या सामर्थ्यावरच ही क्रांती उभी करता येईल आणि या क्रांतीचे उद्दिष्ट साध्य होईल. पण हे व्हावयाचे असेल, तर कामगारवर्गाच्या बरोबर शेतकरी-वर्गही या लढ्यात साथीला असला पाहिजे. हिंदुस्थानचा मुख्य प्रश्न हा या विशाल देशात पसरलेल्या कोट्यवधी गरीब व लहान शेतकऱ्यांना संघटित करण्याचा आहे. त्यांना संघटित करणे म्हणजे त्यांच्या वर्गहिताच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी त्यांना शिक्षित करावे लागेल. हे ऐतिहासिक कार्य काँग्रेस करू शकेल आणि या अर्थाने काँग्रेस संघटना ही इतिहासाने हिंदुस्थानला दिलेली एक देणगी आहे. काँग्रेस संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम केले पाहिजे. जाणीवपूर्वक असे कार्य झाले, तर काँग्रेस संघटनेचे स्वरूप हळूहळू असे बनेल, की क्रांतिकाळात जी घटना समिती सत्तांतर करण्याचे काम करते, त्या घटना समितीचे रूप तिला येईल. लोकशक्तीच्या बळावर सत्तांतर करणारी यंत्रणा हे स्वरूप काँग्रेसला येईल. काँग्रेस संघटना ही राजकीय दृष्ट्या समांतरशक्ती म्हणून जेव्हा इंग्रजी सत्तेच्या विरूद्ध उभी राहील, तो क्षण क्रांतीचा असेल.

मला हे घटना समितीच्या रचनेचे तत्त्व आणि तंत्र मोठे आकर्षक वाटले. आणि मी रॉयवादाच्या काही काळ का होईना, समीप राहिलो, ते या आकर्षणामुळेच.

काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उभे केल्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे जेव्हा ही मंडळी प्रतिपादन करीत, तेव्हा मला दाट शंका येई, की हे विद्वान पंडित लहान लहान प्रश्नांवर जर इतके मतभेद निर्माण करतात, तर केव्हा तरी शेवटी आमची जी मूळ संघटना राष्ट्रीय काँग्रेस, तिला तर ते कमजोर करणार नाहीत ना ?

या मंडळींचा दुसरा एक महत्त्वाचा विचार होता, तोही असाच स्वीकारण्यासारखा होता. त्यांचे म्हणणे असे होते, की राज्यक्रांती करावयाची असेल, तर देशामध्ये विचारक्रांती केल्याशिवाय समाजवादाची क्रांती होणार नाही. त्याच्यासाठी आवश्यक ते डोळसपणाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. परंपरावादी दृष्टीने आंधळेपणाने गोष्टी स्वीकारण्याची मनोवृत्ती काढून टाकली पाहिजे, असा एक विचार ते मांडत असत आणि या विचारांशी माझे संपूर्ण सहमत होते. या विचाराचा पुरस्कार यापूर्वीच्या माझ्या बोलण्या-वागण्यात केला होता. वैचारिक क्रांतीच्या विचारसरणीला मी इतके महत्त्व देत होतो, की या विचारांच्या प्रचाराने लोकशिक्षण केले पाहिजे, असे आम्ही ठरविले व हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून 'लोकक्रांती' या नावाचे साप्ताहिक सुरू केले. श्री. आत्माराम बापू पाटील या साप्ताहिकाचे संपादक होते. या साप्ताहिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन आम्ही मोठ्या उत्साहाने केले. या प्रथम अंकातील अग्रलेख 'लोकक्रांतीचा जीवनहेतू' या शीर्षकाखाली मी लिहिल्याचे स्मरते. कऱ्हाडला व्यापारी प्रेसमध्ये हे साप्ताहिक आम्ही छापून घेत असू. पहिले काही आठवडे मी त्या साप्ताहिकाचे काम पाहिले, पण पुढे कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला जावयाचे असल्यामुळे अग्रलेख वगैरेची सर्व जबाबदारी श्री. भय्याशास्त्री वाटवे यांनी स्वीकारली. हे पत्र वर्षभर चालले असेल, पण पुढे राजकारणात जसे मतभेदांनी अंतर निर्माण केले, तसे हे साप्ताहिकही बंद झाले, पण विचारक्रांती हा भारताच्या नवजीवनाचा प्राण आहे, या भूमिकेचा मी सातत्याने पुरस्कार केला आहे. या सर्व विचारांच्या हकीकती यासाठी सांगितल्या, की आत्माराम बापूंना वैयक्तिक मित्रसंबंध व ह. रा. महाजनी आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरे विद्वान मंडळींबद्दलचा थोर आदर यांमुळे त्यांना मी सांगितले,

''या जिल्ह्यात तुमच्याबरोबर काम करावयास तयार आहे. पण एक गोष्ट तुमच्या-आमच्यांत स्पष्ट असली पाहिजे, की इंग्रज सत्तेच्या विरूद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानच्या आजच्या संदर्भात मूलभूत प्राधान्य असले पाहिजे, ही मी मूळ स्वीकारलेली भूमिका कधीच सोडणार नाही.''

त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि आम्ही एकत्र काम करू लागलो.