• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१११

या परिषदेच्या अनुभवानंतर आमच्या जिल्ह्यात उघड उघड दोन गट झाले व आमच्या विरोधी असलेल्या मंडळींनी असा प्रचार सुरू केला, की ही जिल्हा काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाच्या विरोधी आहे. त्यांना असे म्हणायला जागा होती, ही गोष्ट नाकारता येणार नाही. परंतु ज्या तऱ्हेने परिषद मोडली, हे काही चांगले नव्हते, ही गोष्ट तितकीच खरी आहे. याचा एक परिणाम माझ्या बाबतीत असा झाला, की माझ्या मनातील वैचारिक त्रिकोण आता संपणार, असे माझ्या मनाने घेतले. आज प्रस्थापित असलेल्या काँग्रेसच्या नेते मंडळींशी जर रॉयसाहेबांचा संघर्ष होणार असेल, तर आपण कुठे ? असा जर प्रश्न कुणी मला विचारला असता, तर माझे स्वच्छ उत्तर असे होते, की जेथे गांधी-नेहरू, तेथे मी. आमच्या विरोधात असलेल्या मंडळींची समजूत काढण्याचाही मी प्रयत्न करीत होतो. परंतु त्यामध्ये मला फारसे यश आले नाही.

याच सुमाराला जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि आमच्यातर्फे जो उमेदवार उभा केला होता, त्याचा पराभव करण्याचा सातारा जिल्ह्यातील बुवासाहेब गोसावी, नरूभाऊ लिमये, व्यंकटराव पवार वगैरे मंडळींनी चंग बांधला आणि या तासगाव परिषदेनंतरचा दुसरा पराभव या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत आम्हांला स्वीकारावा लागला. आमच्यातर्फे उभे असलेले उमेदवार गांधीनिष्ठ कार्यकर्ते श्री. पांडू मास्तर यांचा पराभव करून श्री. व्यंकटराव पवार हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. यामध्ये माझा आणि आत्माराम पाटील यांचा पराभव झाला, असा प्रचार जिल्ह्यात सुरू झाला आणि एका अर्थाने तो झाला होता, हे आम्हांला मान्य करणे जरूर होते.

या निवडणुकीनंतर आत्माराम बापूंशी मी फार मोकळे आणि तपशीलवार असे बोललो आणि सांगितले, की आपल्या जिल्ह्यातील वातावरण आणि आपल्या देशातील परिस्थिती अशी आहे, की आपण रॉयसाहेबांच्या धोरणाच्या पाठीमागे फार काळ राहू शकणार नाही. मी असे बोललेले श्री. आत्माराम पाटील यांना रूचले नाही. त्यांनी सांगितले,

''तुमची माझी मैत्री आहे. तुम्ही मला चांगल्या प्रकारे सहकार्य दिले आहे. पण या बाबतीत जर तुमचा माझा मतभेद झाला, तर मी रॉयसाहेबांच्या बरोबर जाणार आहे, हे ध्यानात ठेवा.''

मी एवढ्या परिश्रमाने आणि भावनेने आत्माराम पाटील यांची राजकीय मैत्री जोडलेली होती, ती आता संकटात येणार, की काय, या शंकेने मी व्यथित झालो, आणि नाही म्हटले तरी आमच्यामध्ये हळूहळू अंतर येऊ लागले. परंतु प्रश्न अटीतटीला न्यायचे नाहीत, असाही आम्ही दोघांनी विचार केला. पुढे पाठीमागे पाहून घेऊ, जेव्हा महत्त्वाचे असे प्रश्न उभे राहतील, तेव्हा त्यांचा विचार करू, असे मनाशी योजून आम्ही पुढे काम करू लागलो.