• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८५

माझे पहिले वर्ष मी कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध शिवाजी पेठेत काढले. आता जेव्हा मी कोल्हापूरच्या मंडळींना हे सांगतो, तेव्हा त्यांना ते खरे वाटत नाही. बाबूआण्णा कोठावळे आणि निपाणीचे श्री. अनंतराव कटकोळ यांनी स्वतःसाठी भाड्याने घेतलेल्या जागेतील दोन खोल्या त्यांनी मला दिल्या. तेथे मी एक वर्ष काढले.

कोल्हापूर हे करवीर संस्थानच्या राजधानीचे शहर होते, त्यामुळे तेथले राजकारण काही वेगळे होते. प्रजा परिषदेचे काही कार्यकर्ते क्रियाशील होते. त्या सर्वांचे आघाडीवर असलेले कार्यकर्ते वीर माने यांची व माझी माहिती होती. प्रजा परिषदेच्या ब-याच कार्यकर्त्यांनी ३२ साली कोल्हापूर संस्थानच्या बाहेर सत्याग्रह केल्यामुळे त्यांना येरवडा जेलमध्ये जावे लागले होते. त्यांतल्या कित्येकांशी तेथे माझ्या ओळखी झाल्या होत्या. कोल्हापूरला आल्यानंतर हे संबंध पुन्हा जागे झाले आणि माझ्या सार्वजनिक कामाचा धागा तेथेही माझ्या दृष्टीने जोडला गेला.

राजाराम कॉलेजमध्ये मी विद्यार्थी म्हणून प्रवेश केला, तेव्हा तेथील एकंदर वातावरणाने मी चांगलाच प्रभावित झालो. शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या राजवाड्यात आमचे हे राजाराम कॉलेज होते. उत्तम शिक्षक-वर्ग, मोकळे वातावरण, समृद्ध लायब्ररी, एवढा सर्व संच असल्यामुळे शिक्षण-संस्थेला महत्त्व का येणार नाही?

त्यावेळी डॉक्टर बाळकृष्ण कॉलेजचे प्राचार्य होते. वृत्तीने राष्ट्रीय, इतिहासाचे विद्वान प्राध्यापक, कुशल कारभारपटू, पल्लेदार वक्तृत्व यांमुळे त्यांना राजाराम कॉलेजमध्ये आणि कोल्हापूर शहरात अतिशय मान असे. आमच्या पहिल्या वर्षाच्या वर्गाला शिकविण्यासाठी ते काही येत नसत, त्यामुळे त्यांचा काही संबंध येईल, असे मला वाटेना, म्हणून एक दिवस मी भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी माझी मोठ्या अगत्याने चौकशी केली. मी त्यांना माझा पूर्वेतिहास सांगितला. माझी दोन-तीन शैक्षणिक वर्षे फुकट गेल्याचे त्यांना सांगितले आणि शिक्षणक्रम पुरा करण्याचा माझा निर्धारही व्यक्त केला. त्यांची सहानुभूती आणि लक्ष असावे, म्हणून भेटण्याची तसदी दिली, असेही त्यांना सांगितले.

मी हे सगळे मोकळेपणाने सांगितले, म्हणून त्यांना आनंद झाला. त्यांनी मला सांगितले,

''लक्षात ठेव, हे संस्थानी राज्य आहे, मी पंजाबातून येथे आलेलो आहे, तू जोपर्यंत शैक्षणिक कामात प्रगती करत राहशील, तोपर्यंत माझा तुला पाठिंबा राहील, पण कृपा करून कोल्हापूर संस्थानच्या राजकारणात भाग घेऊ नकोस.''

मी त्यांना सांगितले,

''कोल्हापूर प्रजा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझी ओळख आहे, आम्ही जेलमध्ये एकत्र होतो. परंतु येथल्या कामात प्रत्यक्ष भाग घेण्याची माझी इच्छा नाही, त्याचे काही कारणही नाही, पण अधूनमधून माझ्या सातारा जिल्ह्यात जाऊन माझे काम मी करत राहणार आहे. त्याला तुमची काही हरकत नाही ना?''

त्यांनी सांगितले,

''तो तुझा प्रश्न आहे, त्याच्याआड मी येणार नाही.''
- आणि त्यांनी मोठ्या आपुलकीने मला निरोप दिला.