• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८६

त्यांचा माझा हा जो गुरूशिष्य स्नेहाचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता, तो पुढे चार वर्षे कायम राहिला. मला अधूनमधून जरूर पडेल, तेव्हा मी त्यांना भेटत असे, तेव्हा ते आपुलकीने चौकशी करत आणि जरूर तेव्हा मार्गदर्शनही करत.

श्री. बाळकृष्णांशी हे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे मी एका दृष्टीने निर्धास्त झालो आणि माझ्या अभ्यासाच्या पाठीमागे लागलो. पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम कसा अगदी साधा होता. मला फक्त संस्कृत सोडून अर्धमागधी घ्यावे लागले होते, त्यामुळे अर्धमागधीचा अभ्यास करणे जरूर होते. संस्कृत मला मॅट्रिकच्या वेळी सोडून द्यावे लागले होते. त्याचाही एक छोटासा किस्सा आहे.

मी मॅट्रिकचा अभ्यास करीत असताना शाळेतून मिळणारे संस्कृतचे शिक्षण हे अपुरे आहे, असे वाटू लागले, परंतु इतर मुलांनी ज्याप्रमाणे तो विषय बाहेर शिकण्याची व्यवस्था केली होती, तशी मला करता आली नाही. विशेषतः, एक शास्त्री विद्यार्थ्यांना बोलावून संस्कृत शिकवीत असत. त्यांच्याशी माझी ओळख नसल्यामुळे अनंतराव कुलकर्णी यांना मी माझ्यासाठी चौकशी करायला सांगितले होते, कारण तेही आमच्याबरोबर परीक्षेला बसणार होते.

अनंतराव माझा मोठा जिगरी मित्र होता. तो मनाने फार सरळ होता. तो मला पहिल्या प्रथम काही सांगेचना; परंतु मी खोदून खोदून विचारल्यानंतर त्याने सांगितले,
''शास्त्रीबुवा म्हणाले, 'मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही.''

त्याने मला शास्त्रीबुवांचे ते शब्द सांगितले, तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आले. मी अनंताला सांगितले,
''अंतूकाका, तू माझी बिलकूल काळजी करू नको.''

हे सर्व ऐकल्यानंतर मी ठरविले, की संस्कृत सोडून द्यायचे आणि सरळ शुद्ध मराठी घ्यायचे. उरलेल्या चार-दोन महिन्यांत मी परीक्षेला बसायचे ठरविले.

अशा तऱ्हेने माझे संस्कृत सुटल्यामुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी अर्धमागधीचा अभ्यास करत होतो. डॉक्टर उपाध्ये नावाचे प्राध्यापक आम्हांला अर्धमागधी शिकवीत. ते अतिशय उत्तम शिक्षक होते. थोडे श्रम केल्यानंतर माझ्या लक्षात आले, की अर्धमागधी हा परीक्षेत मार्क मिळविण्यासाठी उत्तम विषय आहे.

त्यावेळी महाराष्ट्राचे आवडते कांदबरीकार ना. सी. फडके हे आमच्या राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. पहिल्या वर्षाला त्यांचा माझा काही संपर्क आला नाही; पण दुस-या वर्षी मी इंटरमीजिएटला गेल्यानंतर आम्हांला ते तर्कशास्त्र शिकवीत होते. ना. सी. फडके हे बाहेर जसे लोकप्रिय होते, तसे ते विद्यार्थ्यांतही अत्यंत प्रिय होते. साधा, खादिधारी, गंभीर प्रवृत्तीचा विद्यार्थी म्हणून मी त्यांच्याजवळ फारसा जाऊ शकलो नाही. परंतु त्यांचे व्यक्तिमत्त्व मी जास्तीत जास्त न्याहाळून पाहण्याचा प्रयत्न करीत असे. कारण त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'जादुगार' आणि 'दौलत' या कादंबऱ्यांचा मी मोठा भोक्ता होतो. अशी मनोज्ञ मराठी लिहिणारा लेखक आपल्याला शिकवायला शिक्षक म्हणून आहे, याचा आम्हांला आनंद वाटत होता. त्यांच्या तर्कशास्त्राच्या तासाला मी वर्गात बिनचूक हजर राहात असे. विषय सोपा आणि मनोरंजक करण्याची त्यांची हातोटी ते उत्तम शिक्षक असल्याची साक्ष देत होती आणि त्यामुळे मराठी, इतिहास यांच्याबरोबरच तर्कशास्त्रही माझ्या आवडीचा विषय झाला.