• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८४

शंकरराव देवांनी सांगितले,
''आचार्य भागवत यांच्याकडून त्यांच्यासंबंधी ऐकले आहे.''

पुढे शिक्षण घेण्याचा माझा विचार आहे, असे राघूआण्णांनी सांगताच शंकररावही म्हणाले,
''कशासाठी वेळेचा दुरूपयोग करता आहात? कुठल्या तरी एका निश्चित कामाला तुम्ही आता वाहून घेतले पाहिजे.''

मी विचारले,

''कुठले काम आणि कसले काम?''

ते म्हणाले,

''मी काही विचार केलेला नाही. पण तुम्ही आठ-पंधरा दिवसांत आमच्या सासवडच्या आश्रमात एक वर्षासाठी राहायला या ! म्हणजे तुमच्या-आमच्या चर्चेतून निश्चित कामाची योजना आपण उभी करू.''

मग इतर काही गोष्टी झाल्या आणि आम्ही निरोप घेऊन बाहेर पडलो. माझ्या मनावर शंकररावांनी सांगितलेल्या गोष्टीचा अगदीच परिणाम झाला नव्हता, असे नाही. जर काही निश्चित दिशा निघत असेल, तर का विचार करू नये ? असा प्रश्न माझ्या मनाशी येऊन गेला.
तो दिवस मी तसाच जाऊ दिला. दुस-या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर माझे मन स्वच्छ आहे, असे माझ्या लक्षात आले. आश्रम वगैरे काही नाही. पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला जायचे, हा माझा निर्णय झाला. त्यानंतर दोन दिवसांनी राघूआण्णांना परत भेटल्यानंतर मी त्यांना माझा विचारपूर्वक घेतलेला निर्णय सांगितला. अर्थात मग त्यावर त्यांनी आक्षेप घेतला नाही.

कोल्हापूरच्या कॉलेजात जाण्याचा मी विचार केला खरा, पण त्यात पुष्कळ अडचणी दिसू लागल्या. मी याबाबत माझे बंधू आणि आई यांच्याशी बोललो. अर्थात त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना जे करणे शक्य होते, ते त्यांनी करण्याचे कबूल केले. पण ते काही पुरेसे नव्हते, म्हणून मी माझे मित्र गौरीहर सिंहासने यांच्याकडे माझा उच्च शिक्षणाचा प्रश्न मांडला. ते म्हणाले,
''कसलाही विचार न करता कोल्हापूरला जा. बाकीचे सर्व प्रश्न आम्ही मित्र पाहून घेऊ.''

- आणि म्हणून १९३४ च्या जून महिन्याच्या तिस-या आठवड्यात उच्च शिक्षणासाठी मी कोल्हापूरला प्रस्थान केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूर शहर हे गोर-गरिबांसाठी एक अतिशय महत्त्वाचे शिक्षण-केंद्र बनले होते. तेथे त्यांनी अनेक वसतिगृहे चालविण्याची व्यवस्था केली होती. मी जाताना मात्र मनाशी ठरवून गेलो होतो, की या कुठल्याही वसतिगृहात राहायचे नाही. त्यावेळी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या जातींची वसतिगृहे असत. मराठा समाजासाठीसुद्धा काही होती. ती चांगली होती आणि प्रसिद्धही होती, पण माझ्या विचाराची जी धारा होती, त्याप्रमाणे मला अशा एखाद्या जातीच्या वसतिगृहात जाऊन राहणे पसंत नव्हते. मला माझ्या मित्रांचा आधार होता. त्यामुळे कुठे तरी स्वतंत्र खोली घेऊन राहावे, असे मी ठरविले आणि याप्रमाणे पुढची चार वर्षे मी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या भागांत स्वतंत्र खोली घेऊन राहिलो.