• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८१

शाळेत जेवढे ऐकत होतो, ते माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने पुरेसे होते. त्यामुळे बाहेरचे काम करण्याकडे मनाचा ओढा होता. जिल्ह्यातले, तालुक्यातले कार्यकर्ते भेटू लागले. आमचा त्यांचा जिव्हाळा अधिक वाढू लागला. अधून मधून मी त्यांच्या गावी जाऊन राहू लागलो. ३० सालात पाहिलेली लोकजागृती आणि लोकांचे प्रेम यांमध्ये परिपक्वता आली होती. कायदेभंगाची चळवळ मात्र ओसरल्यासारखी दिसत होती. परत जेलमध्ये जाण्याची गरज उरली नव्हती आणि तसा कोणी प्रयत्नही करीत नव्हते. माझ्या हे लक्षात आले, की आमचा जनसंपर्क पक्का झालेला आहे. त्याला आता नव्या दिशा दिल्या पाहिजेत, म्हणून नवा कार्यक्रम शोधण्याचा प्रयत्न आम्ही करू लागलो.

या दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जेलमधून सुटून बाहेर आले होते. कायदेभंग किंवा राजकीय कार्य याच्यापेक्षा हरिजन-सेवेवर त्यांनी आता आपले सर्व लक्ष केंद्रित केले होते. देशामध्ये गांधीजींनी मंदिर-प्रवेशाची एक नवी चळवळ उभी केली होती. त्यांचा राजकीय कार्यक्रम लोकांना जितका आकर्षक वाटत असे, तितका सामाजिक एकतेच्या क्षेत्रातला हा मंदिर-प्रवेशाचा कार्यक्रम लोकांना उत्साहवर्धक वाटत नव्हता. मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोक म्हणायचे,

''स्वराज्याची चळवळ चालविण्यासाठी याची गरज आहे काय?''

मी त्यांना सांगत असे,

''स्वराज्य मिळाले, तरी माणसाने माणसाला कशा-कशापासून वंचित ठेवायचे, याला काही मर्यादा आहेत, की नाही?''

या तऱ्हेने चर्चा चालत असे. मी माझ्या ओळखीच्या आणि मैत्रीच्या हरिजन माणसांशी याबाबत बोललो. महार समाजातील माझ्या मित्रांना या मंदिर-प्रवेशाचे मुळीच आकर्षण वाटत नव्हते. ते म्हणायचे,
''तुमच्या विठ्ठलाला आणि रामाला भेटून आमचे पोट थोडेच भरणार आहे? आणि त्यासाठी या गावातील सर्व लोकांचा विरोध का ओढवून घ्या?''

अशा तऱ्हेने ते त्यांचे विचार मांडत. परंतु मंदिर-प्रवेशाचा गांधींचा कार्यक्रम हा प्रतीकात्मक म्हणून बरोबर आहे, अशी माझी भावना होती. समाजाच्या सर्व शाखांना एका मुख्य प्रवाहात आणायचे असेल, तर खाणे, पिणे, धर्म या बाबतीमध्ये माणसाने माणसाला एकमेकांपासून दूर ठेवावे, हे बरोबर नाही. हा गांधींचा विचार बिनचूक होता. अर्थात मंदिर-प्रवेशाच्या दृष्टीने आम्हांला आमच्या जिल्ह्यात तातडीने हाती घ्यावा, असा कुठलाच कार्यक्रम लक्षात आला नाही. एक तर काहीशा सनातनी वृत्तीच्या मंडळींचा अशा कार्यक्रमाला विरोध होता, ही गोष्ट होतीच, परंतु ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम करावयाचे, त्यांनाही त्यात औत्सुक्य वाटत नव्हते. त्यामुळे हरिजनांसाठी काही नवीन कार्यक्रम आपण घेतला पाहिजे, अशी माझ्या कार्यकर्त्या मित्रांमध्ये चर्चा झाली.

माझे दोन वर्षापूर्वीचे जुने मित्र पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यामुळे मी नवे मित्र जोडले होते. हरिजन-सेवेच्या नव्या आंदोलनात आपल्याला काय करता येईल, याचा विचारविनिमय मित्रांशी करत होतो. असा विचार करताना आम्ही दिवसातला काही वेळ ज्याला हरिजन-सेवा म्हणता येईल, अशा तऱ्हेचे काम करण्यासाठी द्यावा, असे ठरविले. याच वेळी आमच्या तालुक्यातील शेणोली गावी स्थायिक झालेला मूळचंदभाई म्हणून एक गुजराती तरुण आपले कॉलेजचे शिक्षण अर्धवट टाकून हरिजन-सेवेच्या कार्याला वाहून घेण्यासाठी गावी परत आला होता. मी त्यांना भेटायला शेणोलीला गेलो. त्यांची-माझी बरीच चर्चा झाली आणि आम्ही तालुक्यासाठी काम करण्याकरता एक छोटेसे मंडळ स्थापन केले. त्यासाठी गावातील कुणी तरी प्रतिष्ठित माणसाचा पाठिंबा असावा, म्हणून आमच्या शहरातील श्री. पांडूआण्णा शिराळकर - जे आमचा गावातील थोर देशभक्त आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे धनिक गृहस्थ होते, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हांला सांगितले,
''तुमच्या कायदेभंगाच्या चळवळीला लोकांचा जितका पाठिंबा मिळाला, तितका या कामाला मिळणार नाही. तुम्ही खटपट करीत राहा, माझी मदत राहील.''

- आणि आम्ही आमच्या मंडळामार्फत आमच्या कामाला सुरुवात केली.