• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८२

बरेच दिवस माझ्या असे मनात होते, की आम्ही समाजातील सर्व वर्गांना भेटतो; परंतु या दलित वर्गाशी आमचा काहीच संबंध प्रस्थापित होत नाही. तेव्हा ते करण्यासाठी काही तरी कार्यक्रम योजला पाहिजे. म्हणून सुट्टीच्या दिवशी चार-दोन मित्र बरोबर घेऊन मी आसपासच्या खेडेगावी जाऊ लागलो. विशेषतः हरिजन वस्तीच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागलो. हरिजन समाजातील वेगवेगळ्या वर्गात, वेगवेगळे अनुभव येत होते. चांभार समाजात आमचे फार उत्तम स्वागत होई. त्याच प्रमाणात मातंग समाजातही होई. पण महार समाजात मात्र आमच्यासंबंधीची एक प्रकारची उपेक्षा आणि उदासीनता असे, हेही लक्षात आले. श्री. मोहिते नावाचे महार समाजातील एक कार्यकर्ते कराडच्या म्युनिसिपालिटीत नोकरीवर होते. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि आमच्यापुढे असलेल्या सर्व शंका आणि प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. मोहिते मोठा अनुभवी आणि शहाणा माणूस होता. त्यांनी या बाबतीत जी चर्चा केली, त्यावरून, हे काम दिसते, तितके सोपे नाही, हे आमच्या लक्षात आले. हरिजनांतील हा फार मोठा विभाग विचाराने आणि मनाने आमच्यापासून वेगळा झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आणि भावना जाग्या झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये हळूहळू शिक्षणाचा प्रसारही होऊ लागला आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखे एक मोठे व्यक्तिमत्त्व त्यांच्या समाजात निर्माण झाले असून त्या सर्व समाजाचे लक्ष त्या व्यक्तिमत्त्वावर केंद्रित झाले आहे. त्यांचे वर्तमानपत्रांतील लेख आणि भाषणांचे वृत्तांत या लोकांपर्यंत जाऊन पोहोचत असत. मोहिते म्हणाले,
''तुम्ही या समाजातीलच कार्यकर्ते मिळविल्याशिवाय या कामात तुम्हांला यश येणार नाही. ते करत रहा.''

या उत्तेजनार्थ पण स्पष्ट बोलण्याने आमची चर्चा थांबली.

माझ्या मनाने घेतले, की या समाजाशी संपर्क साधण्याइतके काम आपण निदान कराडमध्ये उभे करायचा प्रयत्न केला पाहिजे. श्री. मूळचंद यांच्या सल्ल्याने आम्ही, जेथे शक्य असेल, तेथे 'नाइट स्कूल' (रात्रीच्या शाळा) सुरू करून लोकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठीसुद्धा माणसे मिळणे तितकेसे सोपे नव्हते. श्री. मूळचंद यांनी आपल्या शेणोली गावी हे काम करायचे ठरविले, आणि मी कराडमध्ये अशी शाळा माझ्या मित्रांच्या मदतीने सुरू करण्याचे ठरविले. अशी शाळा सुरू करायची, तर कोणा मोठ्या नेत्याला निमंत्रण द्यायला पाहिजे, असे मला वाटले. म्हणजे या योजनेकडे लोकांचे लक्ष जाईल व कार्यास चालना मिळेल. या संबंधाने कुणाला बोलवावे, याचा विचार करू लागलो, तेव्हा मनाशी विचार आला, की या कामासाठी कर्मवीर आण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या मोठ्या माणसाला मी आणू शकलो, तर तो एक शुभाशीर्वाद ठरेल.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत श्री. विठठल रामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती, पण प्रत्यक्षात त्यांना भेटायचे कसे आणि कुणाच्या ओळखीने, हा प्रश्न होता. अखेर मी एकट्यानेच ही जबाबदारी घ्यावी, असे ठरले. त्याप्रमाणे एके दिवशी कराडहून रात्रीच्या गाडीने निघून पहाटे पुणे स्टेशनवर उतरलो. उजाडेपर्यंतचा वेळ स्टेशनावरच काढणे सोयीचे होते. तेथील नळावर हातपाय, तोंड धुतले. पायजमा-कोट-टोपी असा त्यावेळचा माझा वेष असे. तो बदलण्याचे कारण नव्हते, पण जरासा ठीकठाक केला आणि उजाडल्यानंतर चौकशी करत करत आठ सव्वा आठपर्यंत त्यांच्या घरी पाहोचलो. श्री. आण्णासाहेब शिंदे घरीच होते. नमस्कार करून मी येण्याचे कारण सांगितले. ते माझ्याकडे पाहतच राहिले. सुरुवातीस ते फारसे बोलले नाहीत, पण अधूनमधून मी कोण, कुठला, काय करतो, घरी कोण कोण आहेत व त्यांची संमती आहे, की नाही, याबद्दल विचारीत मला तास, दोन तास बसवून घेतले. माझ्या बोलण्या-चालण्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. अखेर त्यांनी येण्याबद्दल होकार दिला. पण त्याचबरोबर एक अटही घातली. ते म्हणाले,
''माझ्याबरोबरच हरिजनालाही घरी जेवायला आणावे लागेल.''

मी लगेच होकार दिला, तेव्हा ते म्हणाले,

''पण घरच्या लोकांना विचारलेस का? ''

मी नकार देऊन त्यांना म्हटले,

''सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात. आईची त्याबद्दल काही तक्रार नाही.''