• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ८०

घरी परत आल्यानंतर घरच्या माणसांना फार दिवसांनी भेटल्यामुळे आनंद वाटला. नित्याच्या जीवनामध्ये मी रूळत होतो. तोपर्यंत आमच्या घरात एका नव्या पिढीचे आगमन झाले होते. आमच्या थोरल्या बंधूंना मुलगा झाला होता आणि आम्ही सारेजण नव्या बाळाच्या कौतुकात रमलो होतो. आनंदात मग्न होतो. याच वेळी माझे जुने मित्र अहमद कच्छी यांना ब-याच दिवसांनंतर भेटावे, म्हणून त्यांच्या घरी गेलो. कारण मी जेलमध्ये असताना त्यांनी एक-दोन वेळा पत्राने माझ्याशी संबंध ठेवला होता. मी घरी गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितले,
''तो अतिशय आजारी असून मरणोन्मुख आहे.''

हे ऐकून मला वाईट वाटले. ते मला त्याच्या खोलीत घेऊन गेले. तेव्हा खरोखरच मी अहमदला जे पाहिले, ते त्याचे सुरेख, गौरवर्णी धडधाकट शरीर मला कुठेही दिसून आले नाही. फक्त हाडांचा सापळा पडल्यासारखा तो मला दिसू लागला. त्याच्या डोळ्यांत मात्र तेज होते. त्यामुळे ती आपली व्यक्ती आहे, हे मनाशी पटले. मी त्याचा हात हातात घेतला, तेव्हा किंचितसे हास्य मला त्याच्या डोळ्यांत दिसले. कोठल्या तरी दुर्धर रोगाने तो आजारी होता आणि फक्त काही दिवसांचाच सोबती होता. मला भरून आले; पण मी तेथे न थांबता उठून बाहेर आलो. इतका सुस्वभावी, बुद्धिमान, राष्टप्रेमी तरुण मुलगा मृत्यूच्या जबड्यात इतक्या लवकर जावा, याचे दुःख माझ्या मनात होते. मी त्याच्या वडिलांशी विशेष काही न बोलता निघून आलो.

जेलमधून परत आल्यानंतर जन्ममृत्यूच्या या परस्परविरोधी दर्शनाने नवजीवनाकडे आनंदाने व आशेने पाहण्याची दृष्टी. तर अंतिम काळाच्या छायेमुळे माझ्या मनामध्ये विषष्णता आणि गांभीर्य अशा संमिश्र भानवांचा कल्लोळ उडाला.

सुट्ट्या संपत आल्या होत्या, त्यामुळे मी शाळेत जाण्याच्या तयारीला लागलो. माझ्या मित्रांना व घरच्या लोकांना जेव्हा मी परत माझे शिक्षण सुरू ठेवणार आहे, असे सांगितले, तेव्हा त्यांना ते खरे वाटेना. मी जरी फक्त पंधरा महिने बाजूला गेलो होतो, तरी शैक्षणिकदृष्ट्या माझी दोन वर्षे फुकट गेलेली होती. त्यामुळे माझ्यापेक्षा ब-याच लहान मुलांच्याबरोबर मी शाळेत बसायला तयार होईन, असे गणपतरावांना वाटत नव्हते. मी त्यांना सांगितले,

''मला काही त्यात चिंता वाटत नाही, कारण त्या वयाची मुले माझ्या माहितीची आहेत. मी त्यांच्याशी जमवून घेईन.''

- आणि माझा शाळेत जाण्याचा नित्याचा कार्यक्रम सुरू केला. माझ्या मनाने एक नक्की घेतले होते, की स्वातंत्र्य-संग्रामाच्या चळवळीत काम करायचे, पण शिक्षणक्रम पुरा केल्यावाचून राहायचे नाही. जर मी शिक्षण अर्धवट सोडून दिले, तर मी कोणाच्याच उपयोगाचा नाही, असे होईल. स्वातंत्र्य-संग्रामामध्येही शिक्षण, ज्ञान, विचारशक्ती, यांची किती आवश्यकता आहे, याचा अनुभव मी जेलमध्ये असताना घेतला होता. त्यामुळे शिक्षण पुरे करण्याचा माझा ध्यास मोठा होता. मला तर वाटे की माझी मॅट्रिकची परीक्षा कोणी ताबडतोब घेतली, तर किती बरे होईल! पण अधेमधे ती कोण घेणार? वर्ष तर काढलेच पाहिजे. मी माझ्यापेक्षा वयाने ब-याच लहान मुलांच्या वर्गात बसू लागलो. शिक्षकवर्ग मला मोठ्या आपुलकीने व प्रेमाने वागवीत होता. पुष्कळ वेळा शिक्षकांची मराठी, इंग्रजी व इतिहास या विषयांची वर्गातील भाषणे ऐकून आपण काही विशेष नवे ऐकत आहो, असे मला वाटत नव्हते. त्यामुळे माझ्या मनाने घेतले, की मला हे वर्ष तरी सोपे जाणार आहे आणि तसे ते गेलेही.