• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ७५

आज मात्र माझी स्पष्ट भावना झाली आहे, की आज एकोणिसाव्या शतकातल्या मार्क्सच्या विचारांच्या फार पुढे जग गेलेले आहे. मार्क्सवादी म्हणणा-या मंडळींनाही नवीन जगाशी जमवून घ्यावे लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. पण यामुळे मार्क्सने जगाला दिलेल्या विचारधनाचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना त्याने दिलेल्या मूलभूत दृष्टिकोनाची वाट पुसतच आजच्याही विचारवंतांना जावे लागत आहे. गौतम बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांच्यानंतर एवढ्या मोठ्या मानव समाजाच्या जीवन-पद्धतीवर परिणाम करणारा कोणी तत्त्ववेत्ता झाला असेल, तर तो मार्क्सच, हे कबूल करावे लागेल.

१२ व्या बराकीतील आमचे हे शिक्षण आणि वाचन दिवसेंदिवस असेच वाढत राहिले. त्यातून नवे स्नेही लाभले. महाराष्ट्राच्या विविध विभागांमधून आलेल्या लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या. सोलापूरचे अनंतराव भोसले हे या ठिकाणी मला एक नवे मित्र मिळाले. आमचे राघूआण्णा लिमये हेही वाचत असत. परंतु त्यांची वृत्ती फार खोलात शिरण्याची नव्हती. मला ते नेहमी म्हणत,
''इतके काय वाचत बसतोस? स्वराज्यासाठी लढायचे, एवढी साधी गोष्ट तुला-मला समजली, एवढी पुरे आहे.''

मी त्यांना म्हणे,
''आपण जेव्हा बाहेर जाऊ, तेव्हा तुमचा सल्ला मी मानेन. पण आज येथे असलेल्या वेळेचा उपयोग करून मला जितके वाचता येईल, तेवढे वाचून, समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे.''

राघूआण्णांनी १२ व्या बराकीत 'चला-खेळू या' नावाचा क्लब सुरू केला आणि त्यामध्ये हुतूतू, आट्यापाट्या, खो-खो, इत्यादी खेळ संध्याकाळच्या वेळेला बराकीच्या बाहेरच मोकळ्या जागेत आम्ही खेळत असू. बराकीतला अत्यंत आनंदाचा वेळ म्हणजे आंघोळीचा. आंघोळीसाठी आम्हांला प्रत्येक बराकीत छोटे छोटे घाट बांधून दिले होते. तेथे मुबलक पाणी मिळे. बादल्याच्या बादल्या अंगावर ओतून घेऊन आम्ही स्नान करीत असू. घरची मंडळी भेटीला येत, तेव्हा साबण, दंतमंजन अशी काही साधने घेऊन येत असत, तेव्हा ही सगळी व्यवस्था ठीक होती. कपडे उत्तम, स्वच्छ ठेवण्याची स्पर्धाच बारा नंबरच्या बराकीत सुरू झाली होती, असे म्हटले, तरी चालेल. काही मंडळी या स्पर्धेत आघाडीवर असत. अगदी जेलचे कपडे असले, तरी ते परीटघडीचे करून वापरणारेही काही लोक होते. या शर्यतीत मी पुढे नव्हतो, पण फार मागेही नव्हतो. मध्यावर कोठे तरी असेन.
जेलमध्ये दररोज संध्याकाळी सर्व तऱ्हेच्या भाज्यांचा एक संमिश्र काढा मिळत असे आणि तो खाल्ल्यानंतर दात काळे पडत असत. हा काढा म्हणजे दातांच्या आरोग्याचा मोठाच शत्रू होता, असे म्हटले, तरी चालेल.

जेलमध्ये असताना एक वेळ मला माझे वडील बंधू गणपतराव भेटायला आले होते. एकदा आई पण भेटायला आली होती. पाच-दहा मिनिटांच्या अशा या भेटीत कसलेच समाधान वाटत नसे. परंतु नजरभेटीचा जो आनंद होता, तो काही कमी समाधानकारक नव्हता. माझी प्रकृती सामान्यतः उत्तम आहे, या गोष्टीचा आईला आनंद वाटत असे. गणपतरावांनी माझ्यासाठी काही पुस्तके आणली होती.
अधून मधून अशा भेटीमुळे मानसिक समाधान लाभत असे.

शेवटी शेवटी मात्र जेलमध्ये एकाकी वाटू लागले. वाचन जरी करत होतो, तरी शेवटी वाचन तरी किती करणार ?

या जेलमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणावरच्या चर्चाही मोठ्या अर्थपूर्ण असत. मात्र महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीसंबंधाने येथील पुढारी मंडळी ज्या चर्चा करत, त्यांवरून या शहरी पुढाऱ्यांचा ग्रामीण समाजाबद्दल केवढा गैरसमज आहे, याची मला कल्पना आली. यांतले बरेचसे उच्चभ्रू प्रवृत्तीचे लोक असत. सत्यशोधक चळवळीसंबंधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल या लोकांना कमी माहिती आहे, असे मला वाटते. यांमध्ये अपवाद म्हणून समाजवादी विचारसरणीची जी मंडळी होती, त्यांत एस्. एम्. जोशी, ह. रा. महाजनी, भुस्कुटे ही मंडळी काहीशी समजूतदारपणाने बोलत असत.