• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ२६

-आणि ती त्यांनी अखेरपर्यंत पार पाडली. याबद्दल आम्ही कुटुंबातली सर्व मंडळी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत.

मी वर सांगितले, की माझी आई सुसंस्कृत होती, हे तिच्या वागण्या-बोलण्यावरून दिसतच असे. आमच्या गरिबीच्या घरात का होईना, पण कोणी आले-गेले, तर त्यांचा शक्तीप्रमाणे योग्य तो पाहुणचार करण्यास ती कधीच चुकली नाही. कधी कधी नात्यातली आणि देवराष्ट्राची आठ आठ, दहा दहा मंडळी आमच्या घरी पाहुणे म्हणून येत असत. त्या सर्वांचे तिने केले. ती म्हणत असे,
''आपण अर्धपोटी राहावे, पण आल्या-गेलेल्याला पोटभर जेवू घालावे.''

देवाधर्मावर तिची श्रद्धा होती. रामायणाच्या कथेबद्दल तिला फार आदराचा भाव असे. कराडच्या एका मंदिरात रामायणाची कथा चाले. तिथे जाऊन ती महिनोगणती ऐकत असे. अधून मधून ती मलाही घेऊन जात असे. तिच्याबरोबर जाऊन ऐकल्यामुळे रामकथेत मलाही रस निर्माण झाला. आईला रामायणाची सगळी कथा प्रसंगासहित माहिती असे. मी तिला उलटे सुलटे प्रश्न विचारीत असे. ती म्हणे,
''तू शिकला आहेस, ते वाचून पाहा. मी जे ऐकले आहे, ते भक्तिभावनेने खरे मानते.'' (रामकथा ही तेव्हांपासून माझी आवडती कथा आहे.)

आज त्यासंबंधी अनेक शंका माझ्या मनाशी येतात. परंतु रामायण हे एक काव्य आहे, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, परंतु तो काही इतिहास नव्हे, अशी माझी भावना आहे. काव्य हे आलंकारिक व अतिशयोक्तिपूर्ण असते. काही काल्पनिक गोष्टी काव्यात योजाव्या लागतात. तशा त्यातही असल्या पाहिजेत. परंतु असे असूनही भारतामध्ये रामकथेवर जनसामान्यांचे जबरदस्त प्रेम आहे हे तितकेच खरे. मी उत्तर हिंदुस्थानात आल्यानंतर हे प्रत्यक्ष पाहिले. तुलसीदासाच्या रामायणावर आधारलेली रामलीला दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या ऐन हिंदी भागांमध्ये अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ऐकली व पाहिली जाते. याची कल्पना प्रत्यक्ष पाहून, अनुभव घेतल्यावाचून येणार नाही. अक्षरशः हजारो लोक, तासन् तास बसून रामलीलेची सगळी कथा दिवस अन् दिवस पाहत असतात आणि शेवटी एका भल्या मोठ्या रावणाच्या मूर्तीचे दहन टाळ्यांच्या गजरात करून तो दिवस साजरा करतात. माझ्या मते रामायणात अनेक व्यक्तिचित्रे गडद रंगांत उभी केली आहेत. पण यांतील केंद्रस्थानी कोण आहे? कथेच्या नावाप्रमाणे रामच असावेत. आणि दिसतेही तसेच. परंतु मी जितका अधिक विचार करतो, तसे मला वाटते, की केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्त्व रामाचे नाही. तर ते सीतेचे आहे. सीतेचे स्थान या कथेचा प्राण आहे. सीतेच्या जीवनाभोवती ही करूण कहाणी गुंफली आहे. याला 'रामायण' म्हणण्यापेक्षा 'सीतायन' किंवा 'सीतायज्ञ' म्हणावे, हे अधिक उचित, अशी माझी भावना आहे.

आई माझ्याकडून अधून मधून साखरेबुवांची 'सार्थ ज्ञानेश्वरी' वाचून घेत असे. ज्ञानेश्वरी समजायला जरा अवघडच. जुनी भाषा असल्यामुळे वाचून घेत असे. त्यातला अर्थ मलाही जसा समजायला पाहिजे होता, तसा समजत नव्हता. पण मी वाचे, ते ती भक्तिपूर्वक ऐकत असे. एका आठवड्यात मी तिला दोन अध्याय वाचून दाखविले, तेव्हा मी तिला विचारले,

''आई, तू हे सगळे ऐकून घेतलेस, त्याचा सारांश तुझ्या मनाशी काय आला? ''.

तिने मला एका वाक्यात सांगितले,

''कृष्णदेव अर्जुनाला सांगतात, की तू आपला 'मी' पणा सोड आणि जे तुझे काम तू केले पाहिजेस, ते तू करीत राहा. असे सगळे ते सांगत आहेत आणि ते बरोबर आहे.'' गीतेचा इतका सरळ, साधा आणि सोपा आशय मी दुस-या कुण्या पंडिताकडून ऐकलेला नाही. तिची समज चांगली होती. मन धैर्यशील होते आणि उदार होते. आमची खरी शाळा आमची आई होती.