• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ२७

एकदा आजी आणि आई असे तिघे मिळून पंढरपूरला गेलो. कराडपासून पंढरपूर जवळ जवळ ८० मैल आहे. आमच्या कराडच्या मारूतीबुवांच्या मंडपातून कार्तिकी-आषाढीला पालखी जाते. आणि बरोबर चार-दोन बैलगाड्या जातात. मी, आजी आणि आई एका गाडीत इतरांबरोबर निघालो. अट अशी होती, की आम्ही तिघांनी एकाच वेळी गाडीत बसायचे नाही. कुणी तरी एकाने चालले पाहिजे, म्हणजे गाडीत बसणा-या सगळ्यांची सोय होईल. त्याप्रमाणे मजल, दर मजल करीत आमचा प्रवास सुरू झाला होता. माझ्या आजीचे वय तेव्हा साठाच्या पुढे होते. त्यामुळे तिला आम्ही गाडीत बसण्याचा आग्रह करीत असू. परंतु तिची प्रकृती काटक होती. ती म्हणे,
''मला काय झाले आहे ?''

आणि तीही चालण्यामधला आपला हिस्सा उचलत असे.

रोज दहा-पंधरा मैलांचा प्रवास करावा आणि रात्री रस्त्याच्या कडेला मुक्काम टाकून राहावे, असा आमचा क्रम होता. पालखीसमोर चाललेले रात्रीचे भजन ऐकत बसावे. तीन दगडांची चूल मांडून, भाकरी-पिठले शिजवून घ्यावे आणि उघड्या मैदानावर झोपून राहावे, असा हा जवळ जवळ एक आठवड्याचा कार्यक्रम चालू होता. अर्धे एक अंतर मी चाललो असेन. कधी गाडीत, कधी चालत या पद्धतीने आम्ही शेवटी पंढरपूरला पोहोचलो.

यात्रेला जमलेली इतकी विलक्षण गर्दी यापूर्वी मी कधी, कुठे पाहिली नव्हती. राहण्याची गैरसौय तर होतीच. पण अशा या अव्यवस्थेत आणि आरोग्याच्या दृष्टीने फारशा सुविधा नसतानाही ही माणसे इतकी गर्दी करून या यात्रेला जमतात कशी, याचे मला मोठे आश्चर्य वाटले.

एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये आम्ही सर्व उभे राहिलो. किती तास उभे राहिलो, लक्षात नाही; पण चार तासांपेक्षा जास्त वेळ उभे होतो, असा अंदाज आहे. शेवटी आम्ही एकदाचे कसेबसे मंदिरात पोहोचलो. गंध, अक्षता, फुले, कापूर, ऊद, धूप, इत्यादी पूजा-साहित्याच्या संमिश्रणातून निर्माण झालेला - आपल्याकडील सगळ्याच देवळांत असतो, तसा वास सर्वत्र दरवळत होता. टाळमृदंगाच्या साथीने विठ्ठलनामाचा गजरही दुमदुमत होता.  

गर्दीमुळेमी घामाघूम झालो होतो. कोणी तरी सांगितले, की हा गरूडखांब आहे, मी जाऊन त्याला हात लावला. कोणी तरी ओरडले,

''हात लावायचा नाही'' आणि नंतर त्यानेच माझ्या आईला सांगितले, ''बाई, तुमच्या मुलाला सांभाळा.''

शेवटी विठ्ठलाच्या मूर्तीपर्यत कसे बसे पोहोचलो. तेथे बसलेले पुजारी-बडवे देवासमोर एक क्षणदेखील कोणाला थांबू देत नव्हते, ढकलून पुढे काढीत होते, माझी उंची त्यावेळी स्वाभाविकच कमी होती. देवाच्या पायांवर डोके ठेवण्याइतका मी उंच नव्हतो. कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला,
''चला लवकर येथून ''