पण हे खरे ठरले नाही. साधन-सामग्रीची जुळवाजुळव ते करू शकले नाहीत. त्यांनी इंदूरला परत जायचे नाही, असे ठरविले आणि आम्ही मात्र मोठ्या अडचणीत सापडलो.
आईचा जीव बेचैन झाला. आणि ती बेचैन झाली, म्हणजे मी खूप निराश होई. कधी कधी डोळ्यांत पाणी उभे राही. माझा भाऊ दूरच्या प्रदेशात एकटा काय करील, या चिंतेने मन व्याकूळ होई. बाबुरावांच्याकडून पत्ता घेऊन गणपतरावांना मी एक लांबलचक पत्र लिहिले. पत्र भावनाप्रधान होते. त्यामध्ये विचार असे काही असतील असे मला वाटत नाही. आई किती दुःखी आहे, हे मात्र मी त्यांना कळविले आणि परत या असे विनविले. गणपतरावांचे उत्तर आले की जवळ जवळ पन्नास-साठ एकरांमध्ये त्यांनी पेरणी केली आहे. आणि ती पिके थोड्याच दिवसांत हाताशी येतील, अशी परिस्थिती आहे. परंतु ती पिके काढायची झाली, तर त्यासाठी लागणारे भांडवल आणि मनुष्यबळ त्यांच्याजवळ नाही. बाबुराव तिकडे आले आहेत. ते ही सर्व व्यवस्था करून येतील या आशेवर मी येथे टिकून आहे. अर्थात आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळे बाबूराव काय करतील, याची वाट पाहण्याखेरीज आम्हांला काहीच मार्ग नव्हता.
बाबुराव इंदूरला परत जाण्याची चिन्हे काही आम्हांला दिसेनात. ते साधन-सामग्री जमविण्यापेक्षा चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या ओळखीपाळखी, नाती-संबंध, सधन मंडळींच्यामध्ये असल्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळविणे त्यांना अवघड नव्हते. तशी ती त्यांनी मिळवली आणि ते सैन्यात दाखल झाले.
महिनाभर वाट पाहून, मी गणपतरावांना आईच्या संमतीने पुन्हा पत्र लिहिले आणि सर्व वस्तुस्थिती कळवली. हा महिना आम्हां सर्वांना काळजीचा आणि निराशेचा गेला. गणपतरावांची आणि आमची या बाबतीत फसवणूक झाली, असेही वाटले. पण हाती साधने आणि भांडवल नसताना अशा उद्योगात जाणे ही आमची पहिली चूक आहे, हेही आमच्या ध्यानात आले. आईने मला सांगितले,
''गणपतीला लिही, की असेल ते सर्व टाकून परत निघून ये.''
मी माझ्या आईचा निरोप गणपतरावांना पत्राने कळविला. आणि त्यानंतर ते एके दिवशी परत आले. त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील सर्व चिंतांनी बेजार झाल्यामुळे त्यांचे वजनही खूप कमी झाले होते. त्यांची ती दशा पाहून आम्ही सर्व कटुंबातील मंडळी गहिवरून गेलो. माझे थोरले बंधू या सर्व बाबतींत थोडेसे तटस्थ होते. ते आपली नोकरी सांभाळून काम करण्याच्या प्रयत्नात होते. आणि आम्हांला जेवढी मदत करणे शक्य होते, तेवढी करत होते. कुटुंबाच्या मार्गदर्शनाचा सर्व भार आईवर होता आणि ती आपली कामे सांभाळून हे सर्व करीत होती. माझी आई निरक्षर होती. पण मनाने अतिशय सुसंस्कृत होती. गणपतराव परत आल्यानंतर तिने त्यांना सांगितले,
''इंदूरला जाण्यात तू चूक केलीस, आता इतरांना दोष देऊ नकोस. कारण त्यामुळे अकारण कडवटपणा तयार होईल. आपली चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. तू परत शाळेतजायला सुरुवात कर.''
गणपतरावांनी आईचा हा सल्ला मानला आणि त्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण पुन्हा काही त्यांचे मन शाळेत रमले नाही. आईला कष्ट करू द्यायचे नाहीत, असे त्यांनी निश्चित ठरवले आणि शाळेचा नाद सोडून एक स्थानिक नोकरी पत्करून त्यांनी आपला जीवनक्रम सुरू करण्याचे ठरविले. त्यावेळी ते मला म्हणाले, ''आईने कष्ट करायचे नाहीत, आणि तू तुझे शिक्षण पुरे करायचे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.''