• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ२२

अनेक क्रांतिकारकांना तुरूंगात डांबण्यात आले. तेथे त्यांचे अनन्वित छळ केले गेले. नोकरशाहीचा ज्यांच्यावर राग होता, अशा अनेकांना लाहोर कटाच्या जाळ्यात गुंतवले होते. याच सुमारास किंवा याच्या थोडे पुढे-पाठीमागे माझ्या भावविश्वात क्रांती करणारी एक विशेष घटना घडली. ती घटना म्हणजे यतींद्रनाथ दास यांनी सुरू केलेले आमरण उपोषण.

वस्तुतः लाहोरच्या कटाशी यतींद्र दासांचा दूरान्वयानेही संबंध असल्याचा पुरावा इंग्रजांकडे नव्हता; परंतु २० सालच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे सरकारचा त्यांच्यावर दात होता. पाच वर्षांत त्यांना चार वेळा तुरूंगात डांबण्यात आले. चौथ्यांदा जेव्हा ते मैमनसिंगच्या तुरूंगात होते, तेव्हा त्यांचा इतका छळ झाला, की वैतागून त्यांनी जेल सुपरिंटेंडेंटशी दोन हात केले. त्यामुळे त्यांना अंधारकोठडीची प्रखर शिक्षा देण्यात आली.

राजकीय कैद्यांना गुन्हेगारासारखी मिळणारी वागणूक पाहून सात्त्विक संतापाने यतींद्रांनी तुरूंगात उपोषण सुरू केले होते. त्या अगोदरच सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनीही उपोषण सुरू केले होते. या उपोषणाने त्यावेळी सर्व देशाचे लक्ष खेचून घेतले होते. पहिले चार-सहा दिवस गेल्यानंतर सर्वांनाच अतिशय काळजी वाटू लागली आणि मी तर आमच्या शेतावरच्या झोपडीतून गावामध्ये, यतींद्रनाथांच्या उपोषणात त्यांची प्रकृती कशी आहे, हे पाहावे, म्हणून वृत्तपत्र पाहण्यासाठी दररोज येऊ लागलो.

क्रांतिकारकांच्या या उपोषणाने मी अस्वस्थ झालो होतो. यतींद्र दासांची प्रकृती उपवासामुळे दिवसेंदिवस खंगत चालली होती. माझी अस्वस्थताही प्रत्येक दिवशी वाढत होती. वर्तमानपत्रांतून त्यावेळी येणारी वर्णनेही हृदयद्रावक होती. यतींद्रनाथांच्या शरीरावर प्रेतकळा आल्याचे वाचून तर मी बेचैन झालो, घायाळ झालो. क्षणाक्षणाला ते मृत्यूसमीप जात असल्याची कल्पना मला अस्वस्थ करून सोडीत असे. ब्रिटिश सरकारचा निष्ठुर अमानुषपणा यमासही लाजविणारा आहे, असे मला वाटे. जामीन देण्याच्या अटीवर सरकारने त्यांची मुक्तता करण्याचा अनुचित उदारपणा दाखवला. पण स्वतः यतींद्रनाथांची अशा नामुश्कीला तयारी नव्हती. त्यापेक्षा इहलोकीच्या बंदिवासातून सुटका करून घेण्याचे त्यांनी ठरवले असावे.

अखेर तो दुष्ट दिवस उगवला. एके दिवशी लाहोरच्या तुरूंगात भर दुपारी एकच्या सुमारास प्रखर सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी प्राणाहुती दिली. मातृभूमीसाठी कणाकणाने झिजून त्यांनी तेजस्वी आत्मार्पण केले.

या घटनेने मी बेचैन झालो. माझ्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. देशासाठी प्राणार्पण करणारे यतींद्र माझे कोणी निकटचे आप्त आहेत, असे मला वाटू लागले.

दैनंदिन व्यवहार चालू होते. पण मनातून मी कोठे तरी हरवलो होतो. दुःखाच्या खोल गर्तेत सापडलो होतो. कुठे जावे, काय करावे, कोणाला सांगावे, काही सुचत नव्हते. बधिर मनाने मी रानातील झोपडीकडे चालू लागलो. चालता चालता रडायलाही लागलो. सा-या चराचरात वातावरण मला कुंद वाटू लागले.

वस्तीवर पोहोचलो, तेव्हा कडुसे पडले होते. जमिनीवर अंग टाकले आणि निपचीत पडून राहिलो. पोटात भूक असूनही अन्नावरची वासना उडाली होती. रात्रीच्या अंधारात आकाशात शून्य दृष्टीने पाहात होतो. त्यातील तारकापुंजात यतींद्रनाथ कुठे दिसतात का, हे वेड्यासारखे पाहात होतो. परंतु जवळजवळ ९० दिवस किंवा कदाचित अधिकही असतील, एका मानसिक क्रांतीतून यतींद्रनाथांनी धैर्याने हे उपोषण पुढे चालू ठेवले. राजबंद्यांच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेच्या निषेधार्थ केलेला उपवास म्हणजे एक मोठी तपश्चर्या होती. त्यांची तपश्चर्या त्यांच्या मृत्यूने त्यांनी पुरी केली.