• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ२१

माझ्या गाण्या-भजनाच्या नादामुळे व्यायाम करण्याचा जरी मी फारसा प्रयत्नच केला नाही, तरी चालण्याचा पुष्कळ व्यायाम होत असे. अधून मधून तालमीतही जाण्याचा प्रयत्न करीत असे; परंतु त्यामध्ये नित्यक्रम असा कधीच आला नाही. एक गोष्ट मात्र मी नियमाने केली आणि ती म्हणजे पोहण्याचा व्यायाम. माझ्या बंधूनी मला सांगितले,
''दुसरे काही करत नाहीस, निदान पोहत तरी जा.''

त्यामुळे आमचे घर जरी कोयनेकाठी होते, तरी स्नानासाठी आम्ही कृष्णा संगमावर जात असू.  माझ्या सोनहि-याचा पोहण्याचा मी पूर्वी अनुभव सांगितला आहेच; पण पुढे मी पोहण्यात चांगलीच प्रगती केली आणि सुट्टीच्या दिवशी निदान दीड-दोन तास पोहत राहण्याचा व्यायाम मी केला, त्याने मला पुष्कळ मदत झाली.

मी माझा पुष्कळ वेळ नको त्या कामांत खर्च करतो, असे गणपतरावांना वाटे. आणि त्यांचे बरोबरही होते. मी त्या वेळी परीक्षेत कधी नापास झालो नाही. परंतु फार उत्तम मार्क्सही कधी मिळविले नाहीत.  हे जसे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत घडले तसेच ब-याच अंशी पुढील शिक्षणाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

गणपतराव स्वतः अतिशय बुद्धिमान होते. परंतु आमच्या घरच्या आपत्तीने आणि परिस्थितीने त्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुरा करता आला नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे ते उत्तम खेळाडू आणि लोकप्रिय विद्यार्थी होते. ते जर सर्व वेळ राजकारणात पडले असते, तर त्यांनी चांगलेच नाव कमाविले असते, असा माझा अंदाज आहे. पण त्यांना कुटुंबाच्या प्रश्नातच स्वतःला वाहून घ्यावे लागले. माझ्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाचाही पुढे त्याग केला आणि माझे शिक्षण पुरे व्हावे, म्हणून प्रयत्न केला.

मी कराडच्या प्लेगच्या दिवसांची हकीकत सांगत होतो. सकाळी उठल्यानंतर न्याहरी करावी आणि कृष्णेच्या संगमावर स्नानास जाऊन पोहत राहावे आणि त्यानंतर दिवेकर वैद्य यांच्या बैठकीत आलेली नवीन वृत्तपत्रे वाचत बसावे, असा माझा कार्यक्रम असे. दिवेकर वैद्यांचा हा दवाखाना म्हणजे जणू एक वाचनालयच होते. पुण्या-मुंबईची पत्रे वाचण्यासाठी काही स्नेही येथे जमत. गावातली बाबूराव गोखले यांच्यासारखी चार-दोन प्रतिष्ठित माणसे तेथे येत असत. त्यांत मीही एक इंग्रजी शाळेत जाणारा मुलगा जाऊन बसत असे. प्रथम प्रथम काहीसे नवखे नवखे असे वाटले - दिवेकर वैद्यांनाही आणि मलाही; पण पुढे ओळख झाल्यावर मला त्यांनी आपल्यांतलाच एक म्हणून स्वीकारला, असे म्हणायला हरकत नाही. मी रोज तेथे जाऊन मुंबईहून येणारे 'श्रद्धानंद', 'नवा काळ', 'विविधवृत्त' त्याचप्रमाणे पुण्याहून येणारे 'ज्ञानप्रकाश', 'केसरी' ही नियतकालिके वाचत असे. कधी कधी त्या वाचनालयाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चाही रंगत असत. त्या चर्चा मोठ्या बोधप्रद असत. मी त्या सगळ्या ऐकत असे; पण त्यांत कधी भाग घेत नसे.  कारण भाग घेण्याची माझ्यात शक्ती नव्हती. परंतु लक्षपूर्वक ऐकणे म्हणजेच शिक्षण घेणे आहे, असे माझे मत झाले.  आणि मी कित्येक महिने हा क्रम असाच चालू ठेवला. पण मला या चर्चा ऐकून, बहुश्रुत होऊन नवी माहिती मिळत असली, तरी त्या चर्चाचा एकंदर सूर माझ्या सुराशी मिळणारा नव्हता, याचीही मला जाणीव झाली. मनातील हा संघर्ष असा सुरूच राहिला.

त्याच वेळी देशामध्ये मोठ्या घडामोडी होत होत्या. सायमन कमिशन हिंदुस्थानामध्ये आले आणि त्याला फार मोठा प्रतिकार झाला. त्याच्यावर संपूर्ण बहिष्कार पडला. वृत्तपत्रांत यासंबंधी आलेले टीकात्मक लेख आणि चर्चा मी मन लावून वाचत होतो. दिवेकर वैद्यांच्या बैठकींतही त्यासंबंधी चर्चा होत. त्याही मी मन लावून ऐकत होतो. क्रांतिकारक चळवळींनीही याच वेळी एक नवीन उग्र रूप धारण केले होते. सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या आंदोलनात, पंजाबमध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठीमार झाला आणि देशामध्ये सर्वत्र एक असंतोषाची लाट पसरली.