एवढे मात्र खरे, की या घटनेमुळे माझ्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल झाला. देशात घडणा-या घटनांचे अर्थ समजावून घेण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचलो. जातीय विचारांच्या संकुचित कोंडवाड्यातून बाहेर पडण्याचा माझा विचार पक्का झाला. आपण आपले जीवन देशकार्यालाच वाहायचे, हा निर्णय माझ्या मनाने घेतला. छोट्या छोट्या जातीय किंवा धार्मिक प्रश्नांचे थोडे-फार आकर्षण त्यापूर्वी माझ्या बालवयात होते. पण माझे विचार आता हळूहळू स्पष्ट होत चालले होते, हेही तितकेच खरे होते. संकुचित वृत्तीने काम करण्यापेक्षा कुठल्या तरी व्यापक दृष्टीने काम केले पाहिजे, अशी मनाची घडण होत होती. यतींद्रनाथांच्या मृत्यूने माझा दृढनिश्चय झाला आणि हा प्रश्न मी माझ्यापुरता सोडविला. कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ज्यांच्यासाठी देहत्याग करावा, अशी ध्येये आणि कामे या देशात आहेत. एका अर्थाने माझा आपल्या मनाशी निर्णय झाला. मला माझ्या आयुष्याचे सार समजले आणि सूर सापडला, असे म्हटले, तरी हरकत नाही.
प्लेग संपल्यानंतर रानातून गावात आल्यानंतर मी माझ्या मित्रांशी याबाबत बोलू लागलो, चर्चा करू लागलो. तेव्हा माझ्या मित्रांकडूनही मला अनुकूल प्रतिसाद मिळत गेला. छत्रपती मंडळ आणि हरिभाऊ लाड यांच्याभोवती आम्ही तरुण मंडळी एका नव्या विचाराने भारून काम करू लागलो. गणपतराव तासगावाहून परत आले होते. त्यांच्याशीही मी याबाबत बोललो. त्यांनी सांगितले, ''तुला पटतअसेल, तसे कर. पण आपल्या कुटुंबाची परिस्थिती तू नजरेआड करू नकोस.'' पुढे ते म्हणाले, ''आपल्यासाठी आपले थोरले बंधू घरापासून दूर राहून नोकरीचे कष्ट करीत आहेत. आपली आई आपल्यासाठी कष्ट करून आपले शिक्षण करते आहे, हेही विसरू नकोस.''
त्यांचे हे म्हणणे ऐकून मी पुन्हा संभ्रमात पडे. वाटे, की गणपतराव म्हणतात, ते खरे आहे. माझी आई ही आम्हां सर्वांची शक्ती होती. आम्ही काय वाचतो आणि काय बोलतो, हे ती ऐकत असे, पण तिला त्यात भाग घेता येणे शक्य नसे. पण तिला वाटे, की आपली मुले काही ब-या गोष्टी बोलतात, काही तरी नवीन बोलतात. पण तिने आमच्या कामात किंवा विचारात कोठेही आडकाठी घातली नाही. पण एक गोष्ट खरी होती, की ती आमच्यासाठी फार खस्ता खात होती. थोरल्या बंधूंचा पगार मुळातच कमी. त्यातून ते थोडे-फार आमच्यासाठी पाठवीत असत. उरल्या सुरल्या गोष्टींसाठी माझ्या आईने खूप कष्ट सोसले. गणपतरावांनी जेव्हा आईच्या या कष्टांची आठवण करून दिली, तेव्हा माझे मन भरून आले.
यतींद्रनाथांच्या मृत्यूने मी किती हादरून गेलो होतो, हे प्रत्यक्ष माझ्या आईने पाहिले होते. ज्या दिवशी यतींद्रनाथ वारले, तो सबंध दिवस मी जेवलो नाही. रात्री झोपलो नाही, हे तिने पाहिले होते. माझ्या मनाचा तिला अंदाज लागला नाही. तिला वाटे, आपल्या मुलाला काही तरी लागीर झाले आहे, म्हणून ती चार मंडळींत त्याच्या उपाययोजनेची चौकशी करू लागली. मी आईला सांगितले, ''मला काही झालेले नाही, तू काही काळजी करू नकोस.''
पुढे तिला माझे म्हणणे पटले. तिने माझी चिंता करायचे सोडून दिले. ती म्हणे,
''बाबा, तू वाचतोस, हिंडतोस, फिरतोस-हे सगळे चांगले आहे. पण कुणा वाईटाच्या नादाला लागू नकोस. आपण गरीब असलो, तरी आपल्या घराची श्रीमंती आपल्या वागण्या-बोलण्यात आहे, रीतिरिवाजांत आहे, ती कायम ठेव. तुला कुणाची नोकरी-चाकरी करायची नसली, तरी माझी हरकत नाही. मी कष्ट करून तुझे शिक्षण पुरे करीन. पण तू ह्या शिक्षणामध्ये हयगय होईल, असे काही करू नकोस. तुम्ही शिकलात, तर तुमचे दैव मोठे होईल.''