सदुभाऊंचे हे म्हणणे बरोबर आहे, असे मलाही वाटले.
अशा तऱ्हेच्या चर्चांत आणि वाचनात माझ्या शिक्षेचे पाच महिने केव्हा निघून गेले, ते मला समजलेसुद्धा नाही.
- आणि एके दिवशी सकाळी ऑफिसमधले लोक मला येऊन सांगू लागले, की ''तुमची शिक्षा संपलेली आहे व तुमची सुटका झाली आहे आणि आम्ही तुम्हांला घेऊन जाण्यासाठी येथे आलेलो आहोत.''
मी त्यांना म्हटले,
''सरकारकडून प्रतिबंधक कायद्याखाली काही हुकूम तर आला नाही ना?''
''आमच्याकडे काही हुकूम वगैरे आला नाही. तेव्हा तुम्हांला सोडून देणेच आम्हांला भाग आहे.''
सदुभाऊ म्हणाले,
''प्रतिबंधक कायद्याचा हुकूम आला नाही, ही काही वाईट गोष्ट नाही. तुम्ही जरूर जा.''
जेलमध्ये राहतो म्हटले, तरी राहता येत नाही. अशी काहीशी माझी मन:स्थिती झालेली होती. मी माझ्या सगळ्या राजबंदी मित्रांचा निरोप घेऊन येरवड्याच्या जेलमधून बाहेर पडलो. सरकारने दिलेले प्रवासाचे वॉरंट बरोबर घेऊन, रेल्वेत बसून, निवांतपणे कराडला जाऊन पाहोचलो आणि १९४४ सालच्या जानेवारीच्या सुमारास मी कराड स्टेशनवरून एका टांग्यात बसून जेव्हा कराडकडे जाऊ लागलो, तेव्हा मला असा प्रवास करताना पाहून रस्त्यात भेटणा-या सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला होता. ते माझे स्वागत करत होते. मी घरी गेलो आणि सुमारे वर्षभरानंतर घरातील सर्व मंडळींना मोठ्या प्रेमाने भेटलो.
गणपतरावांची सुटका होऊन तेही घरी परत आले होते. परंतु तुरुंगातून बाहेर येताना त्यांनी एक जबरदस्त आजार बरोबर आणला होता. जेलचे जीवन सहन न झाल्यामुळे म्हणा, किंवा त्यांनी केलेल्या चिंतेमुळे म्हणा, जेलमध्ये असतानाच त्यांना क्षयाचा विकार जडला होता, आणि ते परत आल्यानंतर त्यांनी डॉक्टरला वगैरे दाखवून निश्चित निदान करून घेतले होते. परंतु प्राथमिक अवस्था आहे, बरे होईल, असा डॉक्टरांचा सल्ला होता. मी बाहेर कुणाला दाखविले नाही. पण या बातमीने मला काहीसा धक्का बसला. मी अनपेक्षितपणे अगोदरच सुटून आल्यामुळे पुढे काय करावे, याचा अजून निर्णय झाला नव्हता. स्वाभाविकपणे कार्यकर्ते अधूनमधून भेटायला येत होते. त्यांच्याशी चर्चा करीत होतो, त्यांना साधेपणाने पुढे कसे गेले पाहिजे, हे सांगत होतो. याप्रकारे दोन-तीन आठवडे गेले आणि नंतर सौ. वेणूबाईंच्या आग्रहामुळे ती व मी आम्ही दोघेही दोन दिवसांच्या मुक्कामाकरता फलटणला गेलो. आश्चर्य असे, की फलटणमध्ये असतानाच पुन्हा सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याचे वॉरंट माझ्यावर बजाविण्यासाठी, ज्या ठिकाणी मला पहिल्याप्रथम पकडले होते, त्याच ठिकाणी आले. सौ. वेणूबाईला तर धक्काच बसला. तिला वाटले, की मी फलटणला आलो, म्हणजे मला पकडले जाते. 'मी तुम्हांला फलटणला यायचा कशाला आग्रह केला....' असे ती दु:ख करू लागली. मी तिला समजावले आणि तिच्यासह परत कराडला निघालो. मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले,
''मी माझ्या पत्नीला घरी सोडीन आणि तेथे तुमच्या ताब्यात येईन. तोपर्यंत मला तुमचा बंदोबस्त माझ्याभोवती ठेवायला माझी काही हरकत नाही.''
त्याप्रमाणे घडले आणि माझा येरवड्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
या खेपेला 'ब' वर्ग दिलेला नव्हता. येरवड्याच्या 'क'वर्गाच्या कैद्यांसाठी जे तिसरे वर्तुळ आहे, त्यामध्ये एका बराकीत माझी रवानगी झाली. या बराकीत असताना मला जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते मित्र भेटले. मला आठवतं, की श्री. आत्माराम जाधव, हरिभाऊ लाड नि असे अनेक कार्यकर्ते तेथे भेटले. आत्माराम बापूंनी झालेल्या छळाची कहाणी मला येथेच सांगितली. त्याच आवारातील आमच्या समोरच्या बराकीमध्ये श्री. ना. ग. गोरे आणि त्यांचे इतर सहकारी होते. त्यांची आमची अधूनमधून भेट होत असे.