• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१६९

या तिस-या सर्कलमध्ये मी तीन महिने काढले असतील. या तीन महिन्यांमध्ये माझे काही विशेष वाचन झाले नाही. मला कार्यकर्त्यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे, माझे अनुभव सांगणे, त्यांचे अनुभव ऐकणे यांतच आमचा सारा वेळ निघून गेला. या तीन महिन्यांत माझी प्रकृतीही फारशी चांगली राहिली नाही. घराकडून गणपतरावांच्या प्रकृतीची बातमी येत होती. डॉक्टरकडून ते औषधपाणी घेत होते आणि घर-संसार चालविण्याचा प्रयत्नही करीत होते. माझ्या मनामध्ये विचारसंघर्ष सुरू झाला, की माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा किती छळ मी होऊ देणार आहे? दादा गेले, गणपतराव गंभीर रोगाने आजारी आहेत, सौ. वेणूबाईची प्रकृती बरी नाही, आई काही न बोलता सर्व सहन करीत होती, पण ती दु:खी आहे. माझ्यापासून तिने खूप अपेक्षा केल्या असतील, परंतु मी तिची कुठलीच अपेक्षा पुरी केली नाही. मनातील हा जो विचार चालू होता, तो मी माझ्या जेलमधल्या मित्रांशीही बोललो.

१९४४ साल पुढे पुढे चालू होते. लढाईनेही हिटलरविरोधी आक्रमक रूप धारण केले होते. युरोपमधील दोस्त राष्ट्रांची दुसरी जबरदस्त आघाडी उघडण्याची सर्व चिन्हे दिसत होती. त्यामुळे युद्धाचा निर्णय फॅसिझमविरोधी लागणार, असे निश्चित वाटू लागले आणि त्यामुळे वर्षभरात भारताच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडतील, अशा गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. या सर्व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासाठी मी काही तरी केले पाहिजे, असे विचार माझ्या मनात घर करू लागले आणि तीन महिन्यांनंतर इतर मंडळी जशी पॅरोलवर सुटत होती, तशी मला पॅरोलवर सोडण्याची अनुज्ञा आली आणि मी बाहेर पडलो.

मी कराडला जाऊन विचार केला, की पॅरोलची मुदत काही तरी दोन महिने होती. ह्या दोन महिन्यांच्या मुदतीमध्ये माझ्या घरची जबाबदारी पुरी करण्याच्या दृष्टीने काही तरी पावले टाकली पाहिजेत. या काळामध्ये माझे मित्र आबासाहेब वीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून मी त्यांना माझी मन:स्थिती आणि परिस्थिती कळविली. त्यांचाही निरोप आला, की तुम्ही बाहेर राहणे आवश्यक आहे. तुमच्या घरच्या प्रश्नाकडे तुम्हांला दुर्लक्ष करता येणार नाही. राजकीय चळवळीशी तुमचा आहे तो संबंध आम्ही योग्य प्रकारे सांभाळून नेऊ. तुम्ही पॅरोल वाढविण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वकिलीच्या व्यवसायाकडे लक्ष द्या. कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. गणपतरावांना मिरज किंवा कुठे तरी चांगल्या ठिकाणी नेऊन उत्तम औषधोपचार करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय यातून दुसरा रस्ताच दिसत नव्हता. मी जर काही केले नाही, तर हे घर मोडून पडणार, असे चित्र मी पाहिले आणि पॅरोलची मुदत वाढविण्यासाठी मी गृहखात्याला लिहिले. त्याचा काय निकाल येईल, याची मला कल्पना नव्हती. परंतु पुढे दोन महिन्यांनी त्यांनी माझ्या विरुद्धचा प्रतिबंधक कायद्याखालचा आदेश मागे घेतला, असे त्यांचे मला उत्तर आले आणि मग मी स्थिर मनाने घराच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागलो.

गणपतरावांना मिरजेला चांगल्या डॉक्टरच्या नजरेखाली ठेवले. माधवनगर येथे एक घर भाड्याने घेतले आणि तेथे नेऊन त्यांची व्यवस्था केली. गणपतरावांच्या बरोबर त्यांची व्यवस्था करण्याकरता माझी थोरली बहीण तेथे राहिली. त्यांची पत्नीही त्यांच्याबरोबर गेली. आता मला कराडचे घर आणि माधवनगरचे घर अशी दोन्ही घरे चालवावयाची होती. वकिलीला पुन्हा सुरुवात करताना एकदम सर्व उत्तम चालण्याची शक्यता नव्हती. त्यामध्ये प्रगती जी होणार, ती हळू हळूच होणार होती. परंतु तेथे स्थिर झालेले दोन ज्येष्ठ वकील श्री. पंडितराव भद्रे आणि श्री. अब्बास भाई शेख यांची मला खूप मदत झाली. आणि त्यामुळे मी माझ्या फौजदारी गुन्ह्याच्या वकिलीचा जम थोडा-फार बसवू शकलो. दोन्ही घरांचा चालू खर्च चालविण्याइतके उत्पन्न मी महिन्याला मिळवू लागलो आणि हे १९४४ साल केव्हा निघून गेले, हे लक्षातसुद्धा आले नाही.

माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये १९४४ साल जरी केव्हा गेले, हे मला कळले नाही, तरी सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारची वा प्रति सरकारची जी संघटना आकार घेत होती, तिचे स्वरूप व काम या वर्षात अधिक विस्तृत आणि परिणामकारक बनत चालले होते, त्यांनी ठिकठिकाणी न्याय समित्या स्थापन केल्या होत्या व गोरगरिबांवरील अन्याय दूर केल्याची उदाहरणे लोकांच्या डोळ्यांपुढे येऊ लागली होती. ग्रामीण भागात लोकांना त्रास देणा-या गुंड लोकांनाही एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती आणि भूमिगत चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांचा दबदबा एक प्रकारे वाढत जात होता.