• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१६७

''पण खटल्यांची सत्रे सुरू करून सहकाऱ्यांना मृत्यूची वाट दाखविणा-या स्टालिनचे समर्थन करणे केवळ अशक्य आहे.''

मी म्हटले,
    
''ही रास्त प्रतिक्रिया आहे. ऐतिहासिक परिस्थिती आणि माणसे यांचे मूल्यमापन करताना एक घटना किंवा काही घटना एकत्र करून त्यांचे एक आगळे रूप दाखविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ऐतिहासिक मीमांसा होणार नाही.'' एवढेच मला मर्यादित स्वरूपात म्हणावयाचे होते आणि स्टालिनच्या व्यक्तिमत्त्वाचे वस्त्रहरण पुढे रशियन राज्यकर्त्यांनीच-विशेषत: क्रुश्शोव्ह यांनी आपल्या कारकीर्दीत करून इतिहासाला योग्य वळण दिले, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. 'डार्कनेस ऍट नून' या कादंबरीच्या वाचनामुळे आमच्या त्या छोट्याशा कॅम्पमध्ये झालेली वैचारिक वादळे अजून मनाशी येतात, म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला आहे.
मला आता येथे बरेच दिवस राहावे लागणार, असा हिशेब करून होतो, कारण सहा महिन्यांची माझी शिक्षा संपल्यानंतर सरकार काही मला सोडेल, असे वाटत नव्हते. पुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली डांबून ठेवण्याचा प्रयत्न जरूर होईल. तेव्हा योजनापूर्वक काही तरी वाचले पाहिजे, असे मी ठरविले. म्हणून इंग्लंडची औद्योगिक क्रांती, फ्रान्सची राज्यक्रांती आणि त्याचप्रमाणे रशियाची राज्यक्रांती यांच्यासंबंधीचे वाङ्मय तेथे मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांती चार-सहा पुस्तके मिळाली. ती मी त्या पाच महिन्यांत वाचली आणि त्यामुळे जागतिक इतिहासाचे एक पुरेपूर चित्र डोळ्यांपुढे पुन्हा ताजे झाले. १९४३ सालच्या चालू युद्धाच्या घटनांसंबंधीच्या चर्चाही आठवतात. युद्धामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड यशस्वी होतील, अशी त्या वेळी फक्त आशा व्यक्त होत होती. कारण त्यावेळी लढणा-या देशांमध्ये-विशेषत: दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये दुसरी लष्करी आघाडी उघडावी, अशी रशियाच्या मनामध्ये प्रबळ इच्छा होती आणि ती आघाडी सुरू होत नाही, त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंकाही ते व्यक्त करत होते. या बातम्या वृत्तपत्रांतील लेखांतून हळूहळू बाहेर येत होत्या. मला कबूल केले पाहिजे, की माझ्या मनामध्ये रशियाबद्दल विलक्षण सहानुभूती होती आणि दोस्त राष्ट्र काही कावेबाजपणाने ही दुसरी आघाडी उघडण्याचे टाळत तर नाहीत ना, अशी शंका माझ्या मनात येत होती. या युद्धासंबंधाने माझ्या मनात काय विचार होते, याची नोंद व्हावी, त्यासाठी मी एवढे लिहिले आहे.

श्री. सदुभाऊ पेंढारकर, मी आणि रामानंद भारती यांच्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या परिस्थितीसंबंधाने खूप तपशीलवार चर्चा होत असे. मी त्यांना मुंबईत माझी गाठ पडलेल्या मित्रांच्या मुलाखतींची माहिती सांगितली आणि सातारचा लढा हा थांबणार नाही. आम्ही कुणीही तुरुंगात आलो असलो, तरी हा लढा मागे पडणार नाही. नवे नवे कार्यकर्ते आणि निष्ठेने लढायला उभे राहिलेले नेते हा झगडा चालू ठेवतील. मात्र या लढ्याचे स्वरूप बदलत चालले आहे. जरूर तर शस्त्रास्त्रे वापरून हा आक्रमक लढा चालेल, असे मी माझे निदान सांगितले. सरकारला मदत करणा-या आणि लोकांच्या जीवनाचा गैरफायदा घेणा-या समाज कंटकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न हे पत्री सरकार निश्चित करील, अशी माझी जी जाण होती, तीही मी या मंडळींना सांगितली. यातून निश्चित काय घडेल, यासंबंधाने ही सर्व मंडळी चिंता व्यक्त करीत असत.
मी सांगितले,

''त्याची चिंता तुम्ही व मी करून काय उपयोग? जो रणभूमीत उभा आहे, तो त्याचे निर्णय घेईल आणि किसन वीर आबा आणि त्यांचे इतर सहकारी शेवटी काही राष्ट्रीय मूल्यांवर विश्वास ठेवून काम करणारी माणसे असल्यामुळे ते या चळवळीला चुकीच्या मार्गाने भरकटू देणार नाहीत, असा मला विश्वास आहे.''

श्री. सदुभाऊ पेंढारकर यांना माझ्यासारखेच वाटत होते. ते म्हणाले,

''जोपर्यंत लढा संपलेला नाही, तोपर्यंत लढा चालविण्यासाठी काही विचारांच्या मर्यादा ठेवून जितके जास्तीत जास्त पुढे जाता येईल, तितके जाण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. आपण जे लोक तुरुंगात आलो आहोत, ते एका अर्थाने सुरक्षित आहोत. त्या सर्वांचे प्राण तेथे धोक्यात आहेत. तेव्हा आपण त्यांना नैतिक पाठिंबाच दिला पाहिजे.''