थोरले साहेब - ५८

के. डी. पाटील खोलीवर आलेले होते.  साहेबांनी घडलेला वृत्तांत के. डी. पाटलांना सांगितला.  के. डी. पाटलांनी आपण बाबासाहेब शिंदेंचा सल्ला स्वीकारूया, असं मत साहेबांकडे व्यक्त केलं.  दुसर्‍या दिवशी खेरांनी मंत्रिमंडळाची यादी जाहीर केली.  साहेबांचं नाव पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून प्रसिद्ध झालं.  

बाळासाहेब खेरांचा हा निर्णय साहेबांना काही पटला नाही.  निराशाजनक मनःस्थितीत साहेब कराडला आले.

गणपतराव नाराजी व्यक्त करीत म्हणाले, ''बाळासाहेब खेरांनी तुला राज्यमंत्री तरी करावयास पाहिजे होतं.''

घरातील मंडळींची व कार्यकर्त्यांचीही हीच भावना होती.  साहेब मंत्री होणार असा सर्वांचा अंदाज होता; पण तसं घडलं नाही.  आई आणि गणपतरावांनी, बाबासाहेबांनी दिलेला सल्ला ऐकावा असं मत व्यक्त केलं.  माझं मत साहेबांनी मला विचारलं.  आई आणि गणपतरावांच्या मताला मी दुजोरा दिला.  आई, गणपतराव व कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करून साहेबांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.  

साहेबांनी आठ-दहा दिवस सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.  'तुम्हापासून दूर जातोय...' असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.  पुढेही अशीच सदिच्छा माझ्या पाठीशी राहू द्या, अशी विनंतीही सर्व कार्यकर्त्यांना केली.  आई आणि गणपतरावांच्या पायांवर मस्तक टेकवून साहेब घराबाहेर पडले.  कराडमधील जनता साहेबांना निरोप देण्यासाठी रेल्वेस्टेशनवर लोटली.  सर्वांचा भावपूर्ण निरोप घेऊन साहेब रेल्वेत जाऊन बसले.  

सकाळी सकाळी रेल्वे पुण्याला पोहोचली.  तेथे मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्मवर लागलेली होती.  साहेब या गाडीतून उतरून डेक्कन क्वीनमध्ये जाऊन बसले.  प्लॅटफॉर्म सोडून रेल्वेस्टेशनबाहेर पडताच गाडीनं वेग घेतला.  

सोनहिराकाठी जन्मलो, लहानपणी मित्रांसोबत खेळलो-हुंदडलो-रागावलो, रुसवाफुगवा केला, राग विसरलो.... निसर्गाच्या सान्निध्यात घडत गेलो.  कृष्णाकाठी वैचारिक जडणघडण झाली.  जीवाभावाचे मित्र मिळविले.  त्यांच्या सहकार्यानं यशाची एक एक पायरी चढत गेलो.  आता कृष्णाकाठ सोडून सागराकडे निघालो.  कृष्णा ही शेवटी सागरालाच मिळते.  सागराला मिळाल्यानंतर जसं तिचं अस्तित्व नष्ट होतं तसंच माझं कृष्णाकाठचं कार्य महाराष्ट्राच्या सागरात विलीन होणार... महाराष्ट्ररूपी सागरात मला कृष्णा-कोयनेतील पोहण्याचा अनुभव कामास येईल... सोनहिरा या ओढ्याच्या पाण्यात मी पोहण्यास कमी पडलो होतो.  माझा माझ्या मित्रांनी जीव वाचविला होता.  इथे मी कदाचित कमी पडलो तर मला वाचविणारे मित्र असतील का... अशा गतकाळातील आठवणींना उजाळा देत असतानाच सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पुढारी रावसाहेब मधाळे हे साहेबांजवळ
आले.

म्हणाले, ''कुठे निघालात ?''

''मुंबईला निघालो.'' साहेब.

''काय काम काढलं आज मुंबईला ?'' मधाळे.

''महाराष्ट्र सरकारनं माझ्यावर नवी जबाबदारी टाकली आहे.  ती स्वीकारण्यासाठी मी मुंबईला जात आहे.'' साहेब.