फलटणला आल्यानंतर माझ्या प्रकृतीत काहीएक फरक पडला नाही. अशक्तपणा वाढला. एके दिवशी माझी प्रकृती अचानक बिघडली. मी देवाघरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. माझा भाऊ बाबासाहेब मोरे येथेच होता. त्याने माझी तब्येत जास्त असल्याचा निरोप साहेबांना दिला.
साहेब रातोरात गाडी करून फलटणला आले. रात्री थांबून सकाळी लगेच जातो म्हणाले. माझी अवस्था बघून त्यांनी निर्णय बदलला. साहेबांनी फलटण येथील नामांकित डॉक्अर बर्वे यांना घरी बोलावून घेतलं. साहेबांना पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी माझी काळजी घेतो, असा साहेबांना शब्द दिला. साहेब दिवसभर फलटणला थांबले. मला बरं वाटलं. दुसर्या दिवशी सकाळी साहेबांनी माझ्यासोबत नाश्ता केला.
मला म्हणाले, ''तुझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर लगेच कराडला जा. आई तिथे एकटीच आहे.''
आमच्या दोघांचं बोलणं बराच वेळ चालू होतं. जास्त दिवस इथं थांबणं साहेबांना धोक्याचं होतं. साहेब निघण्याच्या तयारीला लागले तोच बाहेरून माझा भाऊ - बाबासाहेब मोरे धावतच घरात आला व सांगू लागला,
''बाहेर पोलिसांनी घराला वेढा घातला आहे.''
साहेब माझ्याजवळ आले व म्हणाले, ''घाबरू नका. मला काहीही होणार नाही. मनानं खंबीर हो, काळजी करू नकोस.''
साहेब घराबाहेर पडले. पोलिसांनी त्यांना अटक केली. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होते. माझी काळजी सोबत घेऊन फलटण संस्थानाने बांधलेल्या नवीन कारागृहात राजबंदी म्हणून साहेब दाखल झाले.
आठ दिवस फलटण जेलमध्ये राहिल्यानंतर साहेबांची रवानगी सातारच्या जेलमध्ये झाली. साहेबांवर खटला भरावा की स्थानबद्ध करावं असा आठ-पंधरा दिवस अधिकार्यांचा घोळ चालू होता. इथे अनेक चळवळीतील कार्यकर्ते साहेबांना भेटले. साहेबांना त्यांच्यासोबत न ठेवता प्रसिद्ध दरोडेखोर म्हातारबा रामोशी कोतवडेकर यांच्या खोलीत डांबलं. पंधरा दिवसांनंतर साहेबांवर खटला भरण्याचा निर्णय झाला.
१९४२ ला तांबवे येथील भाषणाबद्दल साहेबांवर खटला दाखल करण्यात आला. खटला कराड येथे चालविण्यात आला. त्याकरिता साहेबांना सातारहून कराडला नेण्यात आलं. साहेबांवर जे आरोप लावण्यात आले ते खरे होते. साहेबांना सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. वकील असल्यामुळं साहेबांना 'ब' वर्ग मिळाला. एक आठवड्याच्या आत साहेबांची रवानगी येरवड्याच्या तुरुंगात करण्यात आली. 'ब' वर्गाकरिता बांधलेल्या राहुटीत साहेब राहू लागले. बाजूच्या राहुट्यांत पहिल्या वर्गातील स्थानबद्धांचा कॅम्प होता. तिकडून चांगली पुस्तके 'ब' वर्गातील कैद्यांना वाचण्यासाठी मिळत असत. त्या वेळी गाजत असलेली ऑथर कोस्लरची 'डार्कनेस ऍटनून' ही कादंबरी साहेबांनी मिळविली. सावकाश वाचली. कम्युनिस्ट राजवटीचे धिंडवडे या कादंबरीत अधोरेखित केले आहेत.