थोरले साहेब - ६०

झपाटल्यासारखे साहेब कामाला लागले.  त्यांची जेवणाची आबाळ होऊ लागली.  मी माझ्या मुंबईतील नातेवाईकांना कळविलं, ''साहेबांची जेवण्याची व्यवस्था करा म्हणून.''  साहेबांनी नातेवाईकांकडे जेवावयास जाण्याचं साफ नाकारलं.  साहेब आमदार व पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले तरीही आर्थिक चणचणीनं साहेबांचा पिच्छा सोडलेला नव्हता.  ते मित्रांसोबत त्यांच्या जेवणाच्या डब्यात वाटेकरी व्हायचे.  कधीकधी तर दिवसातून एकदाच जेवायचे.  पगारातून स्वतःचा खर्च भागवून आम्हालाही पैसे पाठवायचे.  पैसे पाठवण्यास उशीर झाला तर कराडातील त्यांचे मित्र गौरीहर यांच्याकडून पैसे घेण्यास सांगायचे.  ही माहिती कुणीतरी नानासाहेब कुंटे यांच्या कानावर घातली.  नानासाहेब कुंटे हे त्या वेळी सभापती होते.  साहेबांची माहिती ऐकून त्यांना वाईट वाटले.  या देशाचा स्वातंत्र्यसैनिक आणि माझा आमदार या अवस्थेत मुंबईत राहतो ?  त्यांचं मन अस्वस्थ झालं.  त्यांनी साहेबांना बोलावून घेतलं.

म्हणाले, ''मी सभापती या नात्यानं तुम्हाला विनंती करीत नसून, तुम्ही व मी एका विचाराचे कार्यकर्ते आहोत.  कार्यकर्ता या नात्यानं तुम्ही माझ्याकडे सकाळ-संध्याकाळ जेवायला आलं पाहिजे.''

साहेबांनी होकार देण्यास टाळाटाळ करून पाहिली; पण नानासाहेब कुंटे यांच्या प्रेमाखातर जेवायला येण्यास होणार दिला.  सकाळ-संध्याकाळ ते त्यांच्याकडे जेवायला जाऊ लागले.  

साहेब जरी मुंबईला राहू लागले तरी त्यांचं सारं लक्ष घर आणि मिरजकडे असे.  गणपतरावांचा आजार बळावत चालला होता.  मी, आई व गणपतरावांच्या पत्‍नी सौ. भागीरथीबाई त्यांच्या आजारावर लक्ष ठेवून होतो.  त्यांना काही दिवस मिरजेस डॉ. भरुचा यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं.  क्षयावरची औषधं अत्यंत महागडी होती तरीही साहेब त्या औषधींची व्यवस्था करीत असत.  गणपतरावांच्या प्रकृतीला आराम पडल्यानंतर साहेबांनी कराडमध्ये वेगळं घर करून त्यांची राहण्याची व्यवस्था करून दिली.  

तशात कराडच्या राजकारणानं वेगळंच वळण घेतलं होतं.  साहेबांनी कुर्‍हाडीच्या राजकारणाला कधी आश्रय दिला नाही.  मुंबईत कामात व्यस्त असताना कराडकडे लक्ष देण्यास साहेबांना वेळ मिळेनासा झाला.  कुर्‍हाडीच्या राजकारणाने कराडचाही ताबा घेतला.  साहेबांचे पाठीराखे चंद्रोजी पाटलांचा खून झाला.  या खुनाचे शिंतोडे के. डी. पाटलांवर उडविण्यात येऊ लागले.  या खुशाशी साहेबांचाही संबंध लावण्यात येऊ लागला.  या सर्व कुर्‍हाडीच्या राजकारणाचा परिणाम शेवटी के. डी. पाटलांच्या खुनात झाला.  या प्रकरणात साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्‍न काही हितशत्रू करू लागले.  

गणपतरावांना स्टेशनजवळच्या कल्याणी बिल्डिंगमध्ये घर करून देण्यात आलं होतं.  त्यांच्या प्रकृतीत सारखे चडउतार व्हायचे.  गणपतरावांची तब्येत नाजूक असल्याचं कळताच साहेब गणपतरावांना भेटण्यासाठी दुपारी तीन वाजताच कल्याणी बिल्डिंगमध्ये आले.  राधाक्का त्या वेळी गणपतरावांजवळ होत्या.  दोघा बंधूंनी दोन तास गप्पा मारल्या.  डॉ. भरुचांच्या औषधपाण्याचा म्हणावा तसा परिणाम गणपतरावांच्या प्रकृतीवर दिसून येत नव्हता तरीही त्यांच्या सल्ल्यानं गणपतरावांनी वागावं, असं साहेबांनी गणपतरावांना सांगितलं.  राधाक्का आणि साहेब बोलत बोलत बिल्डिंगच्या खिडकीजवळ आले.  खिडकीतून रेल्वेस्थानक दिसायचे.  क्वचित वेळी साहेब सिगारेट ओढायचे.  सिगारेट पेटवून त्यांनी ती ओढण्यास सुरुवात केली तोच त्यांना रेल्वेचा सिग्नल दिसला.

साहेब राधाक्काला म्हणाले, ''अक्का, येतो मी.''

''अरे यशवंता, गणपतदादांशी धड बोलला नाहीस.  त्याला तसंच इथं टाकून निघालास ?  राधाक्का.