पुढील भावी वाटचालीबद्दल साहेबांना शुभेच्छा दिल्या. साहेबांचा हुरूप वाढविला. वाचन, चर्चा, चिंतनातून आपण विषयाची मांडणी करू शकतो हा आत्मविश्वास साहेबांना आला. यापुढे जे काही वाचू त्यावर आपण आपले मत व्यक्त केले पाहिजे असं साहेबांनी ठरविलं. विसापूर जेलमधील दिवस कसे गेले हे सत्याग्रहींना कळलं नाही. गावाकडून घरची व मित्रांची पत्रं येत असत. त्यात साहेबांचा शालेय मित्र अहमद कच्छी याची पत्रं असायची. त्याची पत्र अत्यंत भावनाप्रधान असायची. साहेबांच्या शिक्षेची मुदत संपल्याची तारीख जवळ आली होती. केव्हा एकदा या जेलमधून बाहेर पडतो असं साहेबांना झालं होतं.
मे १९३३ ला शिक्षेची मुदत संपली. साहेब आणि डोईफोडे सोबतच जेलमध्ये आलेले. आज सोबतच सुटणार होते. अंगावरील जेलचे कपडे उतरून दीड वर्षापूर्वी जेलमध्ये येताना जे कपडे अंगावर होते ते अंगावर चढवून दोघेही विसापूर जेलच्या बाहेर पडले. थोडं चुकचुकल्यासारखं वाटलं. जेलचे अधिकारी साहेबांना विसापूर रेल्वेस्टेशनवर घेऊन आले. रेल्वेचे तिकीट काढून त्यांनी दौंडहून पुण्याला जाणार्या रेल्वेत साहेबांना बसवून दिलं. दीड वर्षाचा दीर्घ मुदतीचा काळ घालवून घराच्या वाटेनं साहेब डोईफोडेंसोबत निघाले.
आपण सुटून आल्याचा घरच्यांना झालेला आनंद सुखावून गेला. साहेबांच्या थोरल्या वहिनीनं - ज्ञानोबांच्या पत्नीनं आपल्या मुलाला साहेबांच्या जवळ दिलं. चव्हाण घराण्याच्या नव्या पिढीच्या प्रतिनिधीला साहेबांनी मांडीवर घेतलं. त्यानं साहेबांच्या मांडीचा कब्जा घेतला. सर्व घर या मुलाच्या आगमनानं आनंदानं न्हाऊन निघालं होतं. त्याचं घरभर रांगणं, त्याच्या बाललीलांत साहेब रमून गेले असतानाच त्यांना त्यांचा बालपणीचा मित्र अहमद कच्छीची आठवण झाली. त्याला भेटण्यासाठी साहेब त्याच्या घराकडे निघाले. रस्त्यातच त्याच्या वडिलांची आणि साहेबांची गाठ पडली. साहेबांनी अहमदची ख्यालीखुशाली विचारली. त्याच्या वडिलांनी जे सांगितलं त्यावर साहेबांचा विश्वास बसेना.
त्याचे वडील म्हणाले, ''तो अतिशय आजारी असून मृत्यूशी झुंजतोय.''
हे ऐकताच साहेबांना धक्काच बसला. साहेबांनी त्याच्या वडिलांकडे त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अहमदचे वडील साहेबांना अहमदच्या खोलीत घेऊन गेले. अहमदच्या शरीराचा सापळा झालेला. त्याचे डोळे तेवढे बोलत होते. तेजस्वी, पाणीदार डोळ्यांतून जे बोलायचे ते तो साहेबांना बोलला. साहेब काहीएक न बोलता खोलीबाहेर पडले. एक अभ्यासू, देशप्रेमी युवकाचा शेवट नियतीनं या तर्हेनं करावा याबद्दल साहेबांच्या मनामध्ये नियतीबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. अहमद आणि साहेबांची ही भेट शेवटचीच ठरली. जन्म-मृत्यूच्या खेळामध्ये नियती आनंद आणि दुःख याचा समन्वय घडवून आणते. हा समन्वयच सुखदुःखाच्या भवसागरात मानवाला जगण्याची उमेद देत असतो. जन्माने जीवन जगण्याची प्रेरणा मिळते तर मृत्यूने त्यागमय जीवन जगण्याची ऊर्मी मिळते या संमिश्र भावनेचं तुफान साहेबांच्या मनामध्ये घोळू लागलं.
स्वातंत्र्याच्या संघर्षामध्येही शिक्षण, ज्ञान, विचारशक्ती यांची अनिवार्यता किती आहे याची जाणीव साहेबांना करागृहात असतानाच झाली होती. वैचारिक बैठक एकदा निश्चित झाली की, तर्कशास्त्राच्या आधारे आपण आपले विचार जनतेच्या गळी उतरवू शकतो याचं भान साहेबांना आलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सान्निध्यात साहेब आल्यानंतर शिक्षण पूर्ण केल्याशिवाय आली धडगत नाही हे मनोमन साहेबांनी ठरविलं. पुढील शिक्षण पूर्ण करण्याच्या तयारीला साहेब लागले.