• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ३३

ज्ञानोबांच्या पोटी चव्हाण घराण्याचा वंश जन्माला आला.  त्याचा पायगुण शुभ ठरला.  साहेब कारागृहातून सुटून आले.  नंतर मॅट्रिक पास झाले.  आई नातवाला मांडीवर घेऊन खेळवत होत्या तोच समोरून बाबुराव नरेवाडीकर आणि गणपतराव दोघेही सोबतच येताना दिसले.  घरात आल्यानंतर दोघांचं चहापाणी झालं.  इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर थोड्या वेळानं बाबुराव नरेवाडीकर आईला म्हणाले,

''आई, तुम्हाला एक विचारू का ?''

''विचार की बाबा तुला काय विचारायचे ते...''  आई.

''मी गणपतरावांसाठी एक सोयरीक घेऊन आलोय...''  बाबुराव.

''लग्न करतो की नाही हे गणपतलाच विचार की !  मी तर त्याला बोलून बोलून थकले.  सारखा म्हणतो, यशवंताचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करील म्हणून.  योग्य वेळी लग्न झालं म्हणजे बरं असतं.''  आई.

''घरंदाज माणसं आहेत.  त्यांनाही गणपतराव आवडले आहेत.  त्यांनी कामेरीच्या कुस्तीच्या फडात गणपतरावांची कुस्ती बघितली आणि त्यांनी गणपतरावांविषयी माझ्याकडे विचारपूस केली.  त्यांना आपल्या घराण्याशी सोयरीक करावयाची इच्छा आहे.''  बाबुराव.

''चांगली गोष्ट आहे.  पण कामेरीचे कोण हे ?''  आई.

'पांडुरंग जाधव.  माझे मित्र आहेत ते.  त्यांची बहीण - भागीरथी तिचं नाव.  मुलगी सुंदर आहे.  त्यांचे संबंधही चांगले आहेत.''  बाबुराव.

गणपतरावांनी पुष्कळ आढेवेढे घेतले; पण आईपुढे त्यांची मात्रा काही लागू पडेना.

आईने आदेश दिला, ''चारचौघा मित्रांना सोबत घेऊन मुलगी पाहून या.''

गणपतरावांनी मुलगी पसंत केली; पण त्यासोबत काही अटी घातल्या.  मी लग्न सत्यशोधक पद्धतीने करेल.  लग्नात हुंडा नाही, भटजी नाही अन् जेवणावळही नाही !  कुठले वाजंत्री नाही.  अक्षता म्हणून फुलांचा उपयोग करायचा.... समोरच्यांना माझ्या या अटी मान्य असतील तर मी लग्नास तयार आहे.

शेवटी जेवणावर तडजोड करून गणपतराव लग्नास तयार झाले.  साहेबांना गणपतरावांचे विचार आवडले; पण आपल्याला करवला म्हणून मिरवण्याच्या आनंदाला मुकावे लागणार या चिंतेने त्यांना ग्रासले.  लग्नाच्या दिवशी साहेब बाळानाथ मठ ते घरापर्यंत उगीचच येरझारा घालू लागले.

या विवाहाचे नेतृत्व सत्यशोधक समाजाचे कडवे प्रवर्तक कळंबे गुरुजी यांनी केले.  बाळानाथ मठ हे सत्यशोधक समाजाचे पंढरपूर होते.  यशवंतराव पाटील (पालकर) भिखूनाना साळुंखे (किसळ) इत्यादी कार्यरत होते.

कामेरीकर मोजके वर्‍हाडी व बेनाडीचे क्षात्रधर्मगुरू यांना शाहू महाराजांच्या मोटारीतून घेऊन आले.  लोकांना अचंबा वाटला.  गणपतरावांचा भटजीला विरोध होता.  कामेरीकरांनी पूर्ण विधिवत विवाह पार पाडण्याचा प्रयत्‍न केला.  मठात अगदी गांधी पद्धतीनं विवाह पार पडला.  वधू आणि वरांनी एकमेकाला सुताचे हार घातले.  फुलांचा अक्षता म्हणून उपयोग केला.  या लग्नाची चर्चा बरेच दिवस कराडकर करीत होते.  जाधव घराण्याची लेक भागीरथी चव्हाण घराण्याच्या मधल्या सूनबाई म्हणून घरात आल्या.