• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ३१

१९३१ साल सरून १९३२ साल उजाडलं.  बारा नंबरच्या बराकीमध्ये बारा महिने कसे गेले हे सत्याग्रहींना कळलं नाही.  चार वर्षे विद्यापीठाच्या जीवनात जे ज्ञान साहेब मिळविणार होते ते एक वर्षाच्या काळात साहेबांना मिळाले.  विद्यापीठ परीखा पास होण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देते.  येथे तर समाजजीवन अभ्यासण्याचे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे शिक्षण साहेबांना मिळाले.  येथील एक वर्षाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर सत्याग्रहींना विसापूर जेलमध्ये जावे लागेल अशी चर्चा जेलमध्ये सुरू झाली.  कॅम्प जेलमधील आठवणी सोबत घेऊन साहेब जेलच्या दरवाजामधून बाहेर पडले.  क्षणभर घुटमळले.  मागे फिरून जेलच्या दरवाजाकडं बघितलं.  साहेबांना गहिवरून आलं.  भाड्याचं घर सोडताना त्या घराबद्दलची जी आत्मीयता निर्माण झालेली असते तशीच काहीशी भावना साहेबांची जेल सोडताना झाली.

विसापूर जेलच्या भयानक कहाण्या सत्याग्रहींना कळल्या होत्या.  विसापूर जेल हे दौंड ते मनमाड या रेल्वेमार्गावर विसापूर रेल्वेस्टेशनपासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे.  ओसाड माळरान, पाण्याचे दुर्भिक्ष, कडक जेलर, मरणयातना सत्याग्रहींना सहन कराव्या लागणार होत्या.  येथील हवामानही तापदायक होतं.  हे तापदायक पाच महिने काढण्याचे साहेबांच्या मनाने ठरवले होते.  सर्व सत्याग्रही दुसर्‍या दिवशी विसापूर जेलमध्ये दाखल झाले.  या जेलबद्दल जे ऐकलं होतं ते येथे वर्षभर सत्याग्रही म्हणून राहणार्‍या कैद्यानं पुसून काढलं होतं.  गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत सत्याग्रही या जेलमध्ये होते.  येथे प्रत्येक बराकीत एक प्रवक्ता निवडला जायचा.  या प्रवक्तयास बराकीतील सत्याग्रहीच्या गरजांची पूर्तता प्रशासनाकडून करून घ्यावी लागत असे.  साहेब ज्या बराकीत होते त्या भराकीचे प्रवक्ते मगनभाई पटेल हे होते.  मगनभाई पटेल बडोद्याचे प्रसिद्ध काँग्रेस नेते.  ते सुसंस्कृत, विनयशील, मितभाषी होते.  सर्व बराकीतील सत्याग्रहींचा त्यांनी विश्वास संपादन केला होता.  याच जेलमध्ये मुंबईचे थोर नेते स. का. पाटील असल्याचे साहेबांना कळले.  कॅम्प जेलचं वातावरण सत्याग्रहींनी या जेलमध्ये निर्माण केलं.  स. का. पाटील यांनी अद्ययावत वाचनालय येथे सुरू केलं होतं.  नवी-जुनी पुस्तकं बाहेरून जेलमध्ये येत व आतून बाहेर पाठविली जात असत.  या जेलमध्ये गुजराती कैद्यांचा भरणा जास्त होता.  त्यांचा सहवास लाभल्यामुळे साहेबांना गुजराती भाषा समजू लागली व बोलताही येऊ लागली.  गुजराती भाषेचा उपयोग पुढे साहेब द्विभाषिकांचे मुख्यमंत्री झाले त्या वेळी झाला.  कॅम्पजेल बराक नंबर बारामधील सत्याग्रही डोईफोडे, कोपर्डेकर व ह. रा. महाजनी हे साहेबांसोबत या जेलमध्ये आले.  चर्चा, वाचन पुन्हा सुरू झाले.  ह. रा. महाजनी साहेबांना एक दिवस म्हणाले,

''आपण वर्ष-सव्वा वर्ष चर्चा, वाचन, प्रबोधन करीत आहोत.  अनेक विचारांचा अभ्यास केला. वाचनातून आपले विचार परिपक्व झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी एका-एका विषयावर एकएकाचे भाषण ठेवू.''

साहेबांना ह. रा. महाजनी यांचे म्हणणे आवडले.  साहेबांनी बराकीतील कैद्यांसमोर 'गांधीवाद' या विषयावर ३५ ते ४० मिनिटांचं एक व्याख्यान दिलं.  गांधीवादाबद्दल साहेब म्हणाले,

''गांधीजींच्या आर्थिक व राजकीय विचारांबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात; पण गांधीजींना मानवी जीवनाला नित्योपयोगी पडणारी महत्त्वाची देणगी दिली, ती साध्य, साधनशूचिता ही होय.  याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे काहीच कारण नाही.''

एखादा विषय घेऊन बोलण्याची ही साहेबांची पहिलीच वेळ.  ह. रा. महाजनी आणि निपाणीचे कटकोळ यांनी साहेबांचं अभिनंदन केलं.  बराकीतील कैद्यांना साहेबांचं भाषण आवडलं.  साहेबांच्या मुद्देसूद मांडणीबद्दल ह. रा. महाजनी भारावून गेले.  निपाणीचे अनंतराव कटकोळ गांधीवादी म्हणून मान्यता पावलेले नेते.  त्यांनी साहेबांचं तोंडभरून कौतुक केलं.  साहेबांच्या कुटुंबाची चौकशी केली.