साहेबांची अवस्था दोलायमान झाली. वैचारिकदृष्ट्या इंदिराजी जवळच्या तर सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय पक्षातील नेत्यांना बंधनकारक. इंदिराजी दुखावलेल्या असतानाही साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा विचार करून इंदिराजींची भेट घेतली. मोरारजी यांच्याशी एकदा चर्चा करावी असं इंदिराजींना सुचविलं. इंदिराजींनी अर्थ खातं सोडून मी मोरारजींशी चर्चा करावयास तयार आहे. बंगलोर काँग्रेस अधिवेशनातील आर्थिक धोरण मला राबवायचं आहे. त्याकरिता अर्थ खातं मी माझ्याकडं घेतलेलं आहे. दोन्ही गटांत समझोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात असताना साहेबांबद्दल राजकीय वर्तुळात अनेक गैरसमज पसरले.
१८ जुलैला इंदिराजींनी साहेबांना भेटीस बोलावलं. बंगलोर काँग्रेस अधिवेशनातील आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करावयाची आहे. पहिलं पाऊल म्हणून आपण १४ बँकांचं राष्ट्रीयीकरण करू. माझ्या मनाची तयारी झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक एक तासाच्या आत बोलावली आहे. आपणास बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत जो वटहुकूम काढायचा आहे त्याचा मसुदा तयार आहे. त्या वटहुकुमाचा कच्चा ड्राफ्ट इंदिराजींनी साहेबांच्या हाती दिला. साहेबांनी वटहुकुमाचा ड्राफ्ट नजरेखालून घातला. इंदिराजींसोबत त्या कच्च्या मसुद्यावर साहेबांनी चर्चा केली. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर इंदिराजींनी या वटहुकुमाचा मसुदा सादर केला. साहेबांनी बँक राष्ट्रीयीकरणाच्या वटहुकुमाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठिंबा दिला. ही बैठक संपल्यानंतर लगेच काँग्रेस अध्यक्ष निजलिंगअप्पानं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली. साहेब मंत्रिमंडळाची बैठक संपवून पक्षाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीस पोहोचले. या बैठकीत साहेबांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणास मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं सांगितलं. 'माझा बँक राष्ट्रीयीकरणास पाठिंबा आहे. मोरारजी यांना मंत्रिमंडळातून काढल्याबद्दल मला वाईट वाटतंय. या पेचातून पक्ष कसा दुभंगणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे. याकरिता मला मंत्रिमंडळातून बाहेर पडता येणार नाही.' या बैठकीत साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आजच्याच रात्री बँकांचं राष्ट्रीयीकरण झाल्याचा वटहुकूम इंदिराजींनी जाहीर केला.
२२ जुलैला काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत इंदिराजींनी सर्व सदस्यांसमक्ष नीलम संजीव रेड्डी यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली. निजलिंगअप्पा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य नसताना त्यांना या बैठकीत निमंत्रित करण्यात यावं. इंदिराजी आणि निजलिंगअप्पा यांनी संयुक्तरीत्या सभासदांना नीलम संजीव रेड्डी यांना मतदार करण्यासंबंधी आवाहन करावं असं ठरलं. दोन्ही गटांतील नेत्यांनी प्रयत्न करून संयुक्त बैठक बोलावण्यासाठी धावपळ करावी लागली. यापुढे सर्वकाही सुरळीत पार पडेल असं साहेबांना वाटलं; पण हा निर्णय क्षणभंगुर ठरला. मोरारजी यांच्या चाहत्या तारकेश्वरी सिन्हा यांनी मुंबईच्या 'करंट' साप्ताहिकात इंदिराजींवर टीकात्मक लेख लिहिला. निजलिंगअप्पा यांनी अटलबिहारी वाजपेयी व एम. आर. मसानी यांची घेतलेली भेट या सर्व घटनांचा अर्थ इंदिराजींनी वेगळा घेतला. काँग्रेस कार्यालयातील विश्वासू सहकार्यांनी इंदिराजींना काँग्रेस पक्षाचा उमेदवार पडल्यास पक्षात फूट अटळ आहे. कदाचित सरकार पाडण्याचेही प्रयत्न होणार, अशी माहिती दिली. इंदिराजींनी ११ ऑगस्टला सिद्धार्थ शंकर रे, फक्रुद्दीन अली अहमद यांनी निजलिंगअप्पांना पत्र देऊन मतदानासाठी सर्वांना स्वातंत्र्य असावं अशी मागणी करावी, असं ठरविलं. ठरल्याप्रमाणं या दोघांनी अध्यक्षाला पत्र दिलं. जे पक्ष पंतप्रधानांना हटविण्याची भाषा करतात त्यांना काँग्रेस अध्यक्ष कसे भेटतात अशी विचारणा या पत्रात शेवटी करण्यात आली.
१२ ऑगस्टला कामराज आणि साहेबांची भेट झाली. कामराज यांनी साहेबांना नीलम संजीव रेड्डी यांच्या बाजूनं मतदान करावं अशी विनंती केली. साहेबांनी नीलम संजीव रेड्डी यांना मतदान करण्याची हमी कामराज यांना दिली. त्याचबरोबर पक्षातील दुफळीला वाव न मिळता पक्ष एकसंध कसा राहील याची काळजी घ्यावी, असंही साहेबांनी कामराज यांना सुचविलं. याच दिवशी साहेबांनी इंदिराजींची भेट घेतली. मी नीलम संजीव रेड्डींसोबत राहणार याची कल्पना दिली. पक्ष वाचविण्याच्या दृष्टीनं काही तडजोडीचा मार्ग शोधावा असं इंदिराजींना सुचविलं.