१६ ऑगस्टला राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं. सिंडिकेटची मंडळी आत्मविश्वासानं आपला विजय होणार म्हणून आनंद व्यक्त करू लागली. जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद आणि इंदिराजी यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल कारवाई करावी असा दबाव निजलिंगअप्पांवर आणण्यात मोरारजी, स. का. पाटील, अतुल्य घोष हे आघाडीवर होते. २० ऑगस्टला निवडणुकीचा निकाल लागला. व्ही. व्ही. गिरी कमी फरकाच्या मतांनी विजयी झाले.
काँग्रेस कार्यकारिणीची २५ ऑगस्टची बैठक वादळी होणार असं भाकीत करण्यात येत होतं. दोन्ही गट तयारीनिशी बैठकीला हजर झालेले. काँग्रेस अध्यक्ष निजलिंगअप्पा यांचं भाषण संपताच साहेबांनी सभासदांना उद्देशून भाषणास सुरुवात केली.
म्हणाले, ''आपण एका मोठ्या संकटातून बाहेर पडलेलो आहोत. आतातरी पक्ष एकसंध कसा राहील याविषयी विचार करूया. काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षावर संकटं आली त्या त्या वेळी पक्षाने एकसंध राहून संकटांवर मात केलेली आहे. पक्ष एकसंध ठेवणे ही काळाजी गरज आहे. पक्ष एकसंध राहिला पाहिजे या विचारांच्या तयारीत असलेल्यांना साहेबांनी सोबत घेऊन एक ठराव तयार केला व तो कार्यकारिणीसमोर वाचून दाखविला. स. का. पाटील 'ठराव ठीक आहे' म्हणाले; पण अध्यक्षावर जे दोषारोप करण्यात आले त्याचे काय ? असा प्रश्न निर्माण केला. तडजोडीवादी मंडळींनी त्यावरही मार्ग काढला.
साहेबांच्या या ठरावाचं इंदिराजींनी स्वागत केलं व म्हणाल्या, ''काँग्रेस पक्ष आपापसांत तडजोड करण्यास समर्थ आहे. जनतेच्या पक्षाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पक्षकार्यात दिसून येतील. आता सर्व संपलं.''
पक्षात झालेल्या तडजोडींबद्दल साहेब समाधानी होते.
पक्षात केलेल्या तडजोडीचं समाधान साहेबांना जास्त काळ भोगता आलं नाही. सिंडिकेटमधील आक्रमकता व प्रांता-प्रांतातील नेत्यांमधील बेबनाव उफाळून आला. कामराज यांनी सरकार आणि काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल साहेबांसोबत चर्चा केली. यापुढे सिंडिकेट परत एखादा वाद निर्माण करून पक्षात तेढ निर्माण करीत असेल तर मी त्याच्याशी सहमत राहणार नाही, असं स्पष्ट मत साहेबांनी कामराज यांच्याजवळ व्यक्त केलं. सिंडिकेटमधील मंडळी सत्ता म्हणजे सर्वकाही मानीत असेल तर पक्षाच्या ध्येयधोरण आणि सामाजिक बदलाचं काय ? याचा विचार ही मंडळी करणार की नाही ? त्यामुळं साहेबांचा विश्वास या मंडळींवर राहिला नव्हता.
इंदिराजींचा तामिळनाडू दौरा. या दौर्यात कामराज आणि सी. सुब्रमण्यम यांच्यातील बेबनाव उघड झाला. या दौर्याच्या वेळी सी. सुब्रमण्यम यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इंदिराजींचा दौरा अयशस्वी करण्याचा प्रयत्न कामराज यांनी केला, असा आरोप कामराज यांच्यावर होऊ लागला. इकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री सी. बी. गुप्ता आणि कमलापती त्रिपाठी यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचला. सी. सुब्रमण्यम यांनी प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना काँग्रेस कार्यकारिणीतून कमी करण्याच्या हालचाली सिंडिकेटमध्ये सुरू झाल्या. सिंडिकेटच्या या निर्णयाच्या विरोधात इंदिराजींनी हालचाली सुरू केल्या. स्वर्णसिंग, जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद हे विश्वासू सहकारी इंदिराजींसोबत होतेच.