कामानिमित्तानं साहेब दिल्लीला गेले असताना नेहरूजींनी साहेबांना सांगितलं, ''मला आता सवड नाही. तुम्ही मला हैदराबादला काँग्रेस महासमितीची बैठक होईल त्या वेळी गाजावाजा न करता एकटं भेटा.''
नेहरूजींना काही महत्त्वाचं साहेबांशी बोलायचं होतं. ते बोलणं गुप्तही राहावं असा संकेत त्यांच्याकडून साहेबांना मिळाला. साहेबांचं विचारचक्र सुरू झालं. प्रतापगडावरील कार्यक्रम संपवून नेहरूजी आणि साहेब परतीच्या मार्गावर असताना नेहरूजींनी विचारलेला प्रश्न साहेबांना आठवला.
''मुंबई त्यांच्यापासून कोण हिरावून घेत आहे ?'' हे नेहरूजींचं वाक्य साहेबांनी हृदयात साठून ठेवलं होतं. या वाक्याचा अर्थ लावून साहेबांनी आपल्या मनाची तयारी केली. हैदराबाद येथे होणार्या बैठकीत नेहरूजींची भेट घ्याची अन् द्वैभाषिकांबद्दल आपलं मत स्पष्ट व्यक्त करायचं.
हैदराबाद येथील अधिवेश्नाच्या वेळी पाकिस्तानात सत्तांतर होऊन मिर्झा यांनी सत्ता काबीज केली होती. त्यावर नेहरूजी बोलत असताना मध्येच बोलणे थांबवून त्यांनी साहेबांना बोलावून घेतले व भेटीसंदर्भात बोलले. दुसर्या दिवशी दुपारच्या भोजनाअगोदर बाहेर पडून जेवण करू, जवेणानंतर थोडी विश्रांती घेऊ आणि ठीक अडीच वाजता आपण भेटू, असं साहेबांना नेहरूजींनी सांगितलं. दुसर्या दिवशी ठीक अडीच वाजता साहेब नेहरूजींच्या भेटीस गेले. साहेब आल्याचा निरोप मिळताच नेहरूजींनी विश्रांतीच्या खोलीत साहेबांना बोलावून घेतलं. साहेबांना विश्वासात घेऊन नेहरूजींनी काही प्रश्न विचारले.
महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी प्रामुख्यानं नेहरूजींनी साहेबांचं प्रांजळ मत विचारलं. विदर्भ व गुजरातमधील मंत्र्यांशी साहेबांचे संबंध कसे आहेत, कारभार यंत्रणा कशाप्रकारे चालू आहे, अधिकार्यांचा प्रतिसाद कसा आहे असे अनेक प्रश्न त्यांनी साहेबांना विचारले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची साहेबांनी सविस्तर माहिती दिली.
म्हणाले, ''महाराष्ट्रातील परिस्थिती स्फोटक; पण नियंत्रणात आहे. जनतेच्या हिताची कामे प्रगतिपथावर आहेत. अधिकारी व प्रशासनातील कर्मचारीवर्ग सहकार्य करीत आहे. विदर्भातील मंत्री प्रामाणिकपणे सहकार्य करीत आहेत. त्यांचं मतपरिवर्तन झाल्याचं त्यांच्या सहकार्य करण्याच्या भावनेतून व्यक्त होतं. गुजरातमधील मंत्री हातचं ठेवून वागतात. आपली नाराजी खाजगीत व्यक्त करतात. कदाचित मी मुख्यमंत्री असल्यानं माझ्याकडे स्पष्ट मत व्यक्त करण्यास ते कचरत असतील. आपण माझ्या अपरोक्ष त्यांना त्यांचं मत विचारावं ? द्वैभाषिकाचा विकासरथ विनाअडथळा चालत आहे. पण...''
''पण काय ?'' नेहरूजी.
''पण जनता समाधानी नाही.'' साहेब.
''लोक समाधानी का नाहीत ?'' नेहरूजी.