''लोक असंतुष्ट आहेत. त्याचं कारण द्वैभाषिक. विकास तर होणारच आहे. विकास करणं सरकारचं कामच आहे. त्याकरिता द्वैभाषिकाची गरज काय ? या प्रश्नाचं उत्तर आम्ही जनतेला समाधानकारक देऊ शकत नाही हे माझं मत आहे. आपण इतर मंत्र्यांनाही बोलावून त्यांचं मत अजमावून बघा. त्यांच्या इतर काही कल्पना असतील ते त्या आपल्याकडे व्यक्त करतील.'' साहेब.
साहेबांच्या या विश्लेषणावर नेहरूजींनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, ''तुमचं विश्लेषण बरोबर आहे. मी इतरांची मतं याअगोदरच अजमावली आहेत. शासकीयदृष्ट्या द्वैभाषिक यशस्वी आहे; पण राजकीयदृष्ट्या जनतेच्या मनात असंतोष खदखदतोय असाच तुमचा निष्कर्ष आहे ना ? तुम्ही हे मत मनातून व्यक्त केलं आहे ना ?'' साहेबांनी नेहरूजींच्या या प्रश्नाला होकार दिला.
नेहरूजी त्यावर साहेबांना म्हणाले, ''तुम्ही तुमचं मत स्पष्ट व्यक्त केलं हे फार बरं केलं. आपल्या या संभाषणाबद्दलची बातमी या कानाची त्या कानाला कळता कामा नये.''
''या संभाषणाची कुठेही वाच्यता करणार नाही'' असा शब्द साहेबांनी नेहरूजींना दिला आणि तो शेवटपर्यंत पाळला. ही चर्चा १९५८ च्या मध्यास झाली.
नेहरूजींचे डिसेंबर १९५८ ला मुंबई उपनगरात कार्यक्रम होते. साहेबांनी नेहरूजींची राजभवनाऐवजी आरे वसाहतीत थांबण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारचे जेवण संपवून मी थोडी वामकुक्षी घेतो आणि तुम्हाला बोलावतो, असे नेहरूजींनी साहेबांना सांगितले. जेवण संपल्यानंतर नेहरूजी आराम करावयास त्यांच्या विश्रांतीगृहात गेले. साहेब थोडे तणावमुक्त मूडमध्ये आपल्या कक्षात थांबले. लगेच नेहरूजींचे साहेबांना बोलावणे आले. साहेब तातडीनं नेहरूजींच्या आराम कक्षाकडे जावयास निघाले. कक्षाबाहेर नयनतारा सहगल-नेहरूजींची भाची हिनं साहेबांना अडवलं.
म्हणाली, ''या वेळेस तुम्ही पंडितजींची झोपमोड कशासाठी करीत आहात ?''
''मला पंडितजींनी भेटण्यास बोलावलं आहे म्हणून मी आलोय.'' साहेब.
''तुम्हाला तसा निरोप आला का ?'' नयनतारा सहगल.
''होय.'' साहेब.
नयनतारा सहगल साहेबांना नेहरूजी ज्या कक्षात आराम करीत होते तिथे घेऊन गेल्या. पंडितजी आपल्या पलंगावर आडवे झालेले होते. पंडितजींनी साहेबांना बसायचं सांगितलं. नयनतारा सहगल कक्षाबाहेर गेल्या.