साहेब जत्तींना म्हणाले, ''मी माझ्या सरकारतर्फे आपल्याकडे काही गावांची भीक मागायला आलो आहे असं कृपाकरून समजू नका. प्रथम आपल्या मनातून हे काढून टाका. भाषावार पुनर्रचनेवर आधारित जो भाग मुंबई राज्यात यावयास पाहिजे तो तुम्ही आम्हाला द्यावा व त्याच आधारावर जो भाग म्हैसूर राज्यात असावयास पाहिजे तो भाग आम्ही सोडावयास तयार आहोत.''
ही चर्चा इथेच थांबली. चर्चा इथं थांबून चालणार नाही. साहेबांनी हा प्रश्न धसास लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवले. एखादा लवाद नेमून हा प्रश्न सोडवावा अशी चर्चा सुरू झाली. लवादाचा निर्णय बंधनकारक राहील हा धोका पत्करून साहेबांनी लवाद मान्य केला. म्हैसूर सरकारनंही लवादास मान्यता दिली. पाटसकर निवाड्याप्रमाणे हा प्रश्न लवादाने सोडवावा असा आग्रह साहेबांनी धरला; पण म्हैसूर सरकारला हे मान्य नव्हतं. सीमाप्रश्नाच्या संदर्भात साहेबांनी विधानसभेत आपलं मत व्यक्त केलं.
म्हणाले, ''मुंबई व म्हैसूर राज्यांतील सीमा प्रामुख्यानं भाषिक तत्त्वावर आधारलेल्या आहेत. तेव्हा सीमेलगतच्या प्रदेशाची पुनर्रचना करताना भाषिक संघपणा हे मार्गदर्शक तत्त्व मानण्यात यावं. सीमा निश्चित करण्याचा योग्य अधिकार ज्यांना दिला असेल त्यांनी भाषिक अल्पसंख्याकांचा प्रश्न हा अत्यंत मामुली स्वरूपाचा राहील अशा प्रकारे सोडविणे हे त्यांचे उघडच कर्तव्य राहील.''
विधानसभेतील एक सदस्य देशपांडे यांनी ''तुम्ही असे मख्ख का बसून राहिलात ?'' असे साहेबांना विचारले होते.
साहेबांना असा प्रश्न विचारल्याबद्दल त्यांना आता पश्चात्ताप होत आहे, असं त्यांनी स्वतःच कबूल केलं होतं. साहेबांनी त्या सदस्याचे आभार मानले. एका वयोवृद्ध गृहस्थाने सांगितलेली गोष्ट साहेबांनी देशपांडे यांना सांगितली. ती गोष्ट अशी -
खूप भांडकुदळ आणि तोंडाळ बायको आणि शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेणारा नवरा या कुटुंबातील ही गोष्ट आहे.
ती भांडकुदळ बायको आपल्या नवर्याला म्हणते, ''मी तुम्हाला एवढ्या मोठ्याने ओरडून सांगते आहे आणि तुम्ही असे मख्ख काय बसून राहिला आहात ? या कानाने ऐकता आणि त्या कानाने साडून देता !''
नवर्याने उत्तर दिलं, ''कमीतकमी मी एका कानाने ऐकतो आणि दुसर्या कानाने सोडून तरी देतो. तू दोन्ही कानांनी ऐकूनही तुझ्या तोंडातून बाहेर येत आहे.''
जोराने आणि ओरडून बोलण्याने प्रश्न सुटत नसतात याची जाणीव साहेबांना होती.
शेवटी साहेब म्हणाले, ''म्हैसूर आणि मुंबई राज्यातील जनतेमध्ये कटुतेची भावना न येऊ देता जनतेचं हित लक्षात घेऊन यातून मार्ग काढला पाहिजे.''
१९५८ च्या सप्टेंबरमध्ये साहेबांची अखिल भारतीय कार्यकारिणीवर निवड झाली. दिल्लीच्या चकरा वाढल्या.