• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १३१

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगकर्त्या महान राष्ट्रपुरुषाला वंदन करण्याकरिता लोकशाहीतील एक राष्ट्रपुरुष येत असताना त्यांना विरोध करण्यात कुठलं शहाणपण आहे हे सामान्य माणसाच्या आकलनाच्या बाहेरचं होतं.  बुद्धिजीवी वर्गाच्या पूर्वजांनी 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' ही विरुदावली देऊन महाराजांना 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' म्हणून मर्यादित केलं होतं.  त्यावर खरे महाराजप्रेमी विचार करू लागले.  महाराजांनी फक्त गाई आणि ब्राह्मणांचं प्रतिपालन केलं होतं का ?  महाराज तर रयतेचे राजे होते.  प्रजाहित रक्षक होते.  अठरापगड जातींच्या मावळ्यांचे जीव की प्राण होते.  खरे महाराजप्रेमी इतिहासात डोकावू लागले.  सत्य इतिहास वेगळाच आहे.  तो आम्हाला एका वर्गानं कळू दिलाच नाही.  महाराजांना हिंदूधर्मरक्षक ठरवून इतर धर्मीयांच्या मनामध्ये महाराजांबद्दल सूडाची भावना निर्माण केली.  महाराजांच्या निःपक्षपाती इतिहासाला काळं फासविण्याचं महापातक या वर्गानं केलं.  महाराजांवर जीवन ओवाळून टाकणार्‍या शिवभक्तांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्य इतिहास कळू लागला.  महाराज हे गो-ब्राह्मण प्रतिपालक नसून 'प्रजाप्रतिपालक' होते हा खरा इतिहास आहे याची जाणीव बहुजन समाजाला झाली.  गो-ब्राह्मण प्रतिपालक महाराजांच्या स्मारकाच्या उद्‍घाटन कार्यक्रमास या पुणेरी बुद्धिजीवीचा विरोध का ?

समितीच्या बेताल वक्तव्यांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण परत जातीयवादाकडं वळण घेऊ लागलं.  समाजजीवनामध्ये तेढ निर्माण होऊ लागली.  'समिती विरुद्ध काँग्रेस' या प्रचाराला जातीयतेचा रंग चढू लागला.  महाराजांबद्दल पूज्यभाव असणार्‍या अठरापगड जातीतील तरुण समितीच्या विरोधात बाहू सरसावून उभे राहण्याच्या तयारीला लागले.  समिती ज्या मार्गाचा अवलंब करून जनतेची दिशाभूल करीत होती त्याच मार्गाचा अवलंब समितीविरोधक करू लागले.  १९२०-२१ मध्ये पुण्यात छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते होणार होतं.  त्याला काही बुद्धिजीवींनी पत्रक काढून विरोध दर्शविला होता.  त्यावेळची परिस्थिती वेगळी होती.  त्यावेळचा विरोध हा इंग्रज सत्ताधारी होते व आपण स्वातंत्र्यासाठी त्यांच्याशी लढत होतो म्हणून तो विरोध होता.  त्या वेळी विरोध करणारे ब्राह्मणच होते व आताही विरोध करणारे ब्राह्मणच आहेत.  

समितीला ब्राह्मणाचा टिळा लावून राजकीय मंडळींनी प्रतापगडावरच्या कार्यक्रमाची सांगड ब्राह्मणांचा विरोध म्हणून घातडी.  'ब्राह्मण विरुद्ध इतर' असं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्माण होऊ लागलं.  सत्यशोधक विचाराची बहुसंख्य मंडळी काँग्रेस पक्षात कार्यरत होती.  काँग्रेस पक्षांतर्गत जेधे-मोरे त्यांचं नेतृत्व करीत होते.  जातीय तेढ वाढविण्याचं कार्य समिती व काँग्रेसतर्फे होऊ लागलं.  समितीचा द्वैभाषिक आणि नेहरूजींना जर विरोध होता, तर ज्या वेळी नेहरूजी टिळकांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला आले असताना समितीनं त्यावेळी नेहरूजींना काळे झेंडे का दाखविले नाहीत ?  या कार्यक्रमाच्या वेळेसच समिती का विरोध करीत आहे ?  हा प्रश्न जनतेसमोर मांडू लागले.  टिळक हे ब्राह्मण होते व छत्रपती शिवजी महाराज मराठा आहेत म्हणून समितीचा कार्यक्रमाला विरोध आहे, असं जनतेच्या गळी उतरविण्याचं कार्य काही मंडळी करू लागली.  उच्चभ्रू मंडळींनी नेहरूजींना ठार मारण्याचा कट केला आहे, अशी एक अफवा जनतेत पसरविण्यात आली.  नेहरूजींच्या संरक्षणाकरिता बहुजनांनी बंदोबस्तासह तयार राहावं, असं जनतेला सांगण्यात येऊ लागलं.  या संघर्षाला जातीयतेचं खतपाणी घालण्याचं काम समिती व समितीला विरोध करणार्‍यांकडून होऊ लागलं.