• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १३०

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचं अपयश धुऊन काढण्यासाठी साहेबांनी प्रदेश काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचं ठरविलं.  मोठेपणाच्या नावाखाली पद अडवून बसलेल्या बुजुर्ग मंडळींना विश्रांती देण्याचं ठरविलं.  नव्या दमाची, नव्या उमेदीची, नव्या जिद्दीच्या कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याचं साहेबांनी मनावर घेतलं.  साहेबांनी मराठवाड्यातील विभागीय अध्यक्ष देविसिंग चौहान यांच्या जागी बाबासाहेब सवणेकरांची अध्यक्षपदी नेमणूक केली.  महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष देवगिरीकर यांचं नेतृत्व निवडणुकीत जनतेनं नाकारलं होतं.  त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा पराभव होऊन मानहानी स्वीकारावी लागली होती.  फलटणचे राजेनाईक-निंबाळकर यांच्याकडे प्रदेश काँग्रेसची सूत्रं दिली.  महाराष्ट्रभर पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा कार्यक्रम साहेबांनी आखला.  पक्षीय पातळीवर बदल घडवून आणीत असतानाच प्रशासकीय कारभार गतिमान करण्यासाठी द्वैभाषिकातील प्रत्येक विभागाचा समतोल विकास घडवून आणण्याकरिता साहेबांनी 'विकास परिषद' साहेबांनी निर्माण केली.  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदाबाद आणि राजकोट या ठिकाणी विकास परिषदेची विभागीय कार्यालये थाटली.  सर्वसामान्यांचे प्रश्न तत्काळ सुटावेत, शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याकरिता साहेबांनी हे निर्णय घेतले.  

मुंबईचे राज्यपाल हरेकृष्ण मेहताब यांनी प्रतापगडाला भेट दिली असताना त्यांना एक कल्पना सुचली.  या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारून या राष्ट्रपुरुषाचं स्मरण करावं.  या राष्ट्रपुरुषाच्या शूरत्वाची प्रेरणा नव्या पिढीला मिळत राहील.  त्यांनी नाईक निंबाळकर, साहेब व हिरे यांच्याकडे ही भावना व्यक्त केली.  साहेब, राजेनाईक-निंबाळकर आणि हिरे यांनी पुढाकार घेऊन सातारच्या छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली.  या स्मारकाचं अनावरण नेहरूजींच्या हस्ते व्हावं ही इच्छाही राज्यपालांनी व्यक्त केली होती.  एक वर्षापूर्वी या समारंभाचं निमंत्रण नेहरूजींना देण्यात आलं होतं; पण या ना त्या कारणास्तव ते प्रलंबित राहिलं होतं.  निवडणुकीचा आणि या स्मारकाच्या उद्‍घाटनाचा संबंध जोडला जाऊ नये ही एक भूमिका त्यामागे होती.  निवडणूक पार पडल्यानंतर या कार्याला चालना मिळाली.  समितीनं या स्मारकाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला अपशकुन दाखवून खोडा घातला.  समितीला वाटलं पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीत काँग्रेसची झालेली बेअब्रू नेहरूजींना बोलावून परत मिळविण्याचा हा काँग्रेसचा खटाटोप आहे.  समितीनं स्मारकाच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम नेहरूजींच्या हस्ते होऊ नये याकरिता विरोध दर्शविला.  नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण आपल्या पुस्तकात केले आहे, असा प्रचार समितीनं सुरू केला.      

इंग्रजी ग्रंथाच्या आधारे नेहरूजींनी आपल्या ग्रंथात 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कपटानं मारलं' असा उल्लेख केला होता.  वस्तुस्थिती नेहरूजींच्या लक्षात आणून देताच त्यांनी दुसर्‍या आवृत्तीत चुकीची दुरुस्ती करून आपला ग्रंथ प्रकाशित केला.  मामा देवगिरीकर यांना २६ मार्चला पत्र लिहून छत्रपती शिवजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केला होता.  या पत्राचा मजकूर देवगिरीकरांनी वर्तमानपत्रात छापूनही आणला होता.  मोरारजी देसाईंनीही छत्रपती शिवजी महाराजांबद्दल अनादर करणारं वक्तव्य केलं होतं.  नेहरूजींचे लिखाण आणि मोरारजींच्या वक्तव्याचं भांडवल करून समितीच्या नेत्यांनी नेहरूजी प्रतापगडावर ज्या वाटेनं जाणार आहे त्या मार्गाची नाकेबंदी करण्याचं जाहीर केलं.  या समितीच्या नेत्यांची मजल इथपर्यंत गेली की, 'नेहरूजींना प्रतापगडावर आमच्या प्रेतावरून जावं लागेल' असं माथेफिरू विधान करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली.