या आंबेडकरांच्या उदाहरणाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, इतके ते आश्चर्यकारक उदाहरण आहे. आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा लाभ यशवंतरावांना त्यांच्या वडीलबंधूंच्या कै. गणपतरावांच्या आधुनिक जीवनदृष्टीमुळे झाला हे मात्र योगायोगाने घडले नाही. गणपतराव जोतीराव फुल्यांनी स्थापिलेल्या व ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतरित झालेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. नव्या इंग्रजी शिक्षणाचे रहस्य त्यांना उमगले होते. मोठा सामाजिक परिवर्तनाचा आदेश सत्यशोधक समाजाच्या दणदणीत प्रचाराने महाराष्ट्राच्या ग्रामीण जगात दुमदुमू लागला होता. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या प्रचाराला प्रखर स्वरूप प्राप्त झाले होते. गरीब अशा ब्राह्मणेतर मराठा, कुणबी, माळी इ. सामाजिक स्तरामध्ये सत्यशोधक समाजाच्या विचाराचे स्वागत मनमोकळेपणे होत होते. परंतु त्या वेळच्या ब्राह्मण, वाणी आणि इतर उदिम व्यापारी वर्ग हा या चळवळीपासून अलिप्त होता. या चळवळीच्या कार्यक्रमात प्रचाराचे दणदणीत साधन म्हणून तमाशाही अंतर्भूत केला होता. ह्या तमाशाची गंमत मात्र पांढारपेशा समाजातील मंडळी तटस्थपणे पाहात होती.
यशवंतराव कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत होते. शिक्षकांना पसंत पडणार्या विद्यार्थी मंडळींत चमकत होते. टिळक हायस्कूलची त्या वेळची शिक्षक मंडळी ही एक प्रकारची ध्येयवादी मंडळी होती. ठरलेला अभ्यासक्रम शिकवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने उत्तीर्ण केले म्हणजे झाले, एवढाच शिक्षणोद्देश त्यांच्या पुढे नव्हता. त्या वेळी सबंध भारत राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनांनी भारला जात होता. टिळकयुग नुकतेच संपले होते. म. गांधींच्या नेतृत्वाखाली परकीय स्वातंत्र्याविरुद्ध जी तीन मोठी देशव्यापी वादळे १०-१२ वर्षांच्या अंतराने निर्माण झाली; त्यांतील पहिले वादळ नुकतेच शमले होते. हे पहिले वादळ असहकारितेचे. ते १९२३-२४ च्या सुमारास शांत झाले होते. परंतु सगळा पांढारपेशा समाज राष्ट्रीय भावनांनी भारला गेला. अशा राष्ट्रीय भावनांनी भारलेले शिक्षण टिळक हायस्कूलमध्ये शिकवीत होते. या भावनांनी लहानमोठ्या नगरांना वेढून ग्रामीण भागामध्येसुद्धा खोल प्रवेश केला होता. त्यामुळे विचारांचे दोन प्रवाह एकमेकांना छेद देऊ लागले. सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळ ही यशवंतरावांच्या भाषेत सांगायचे म्हणजे मध्ययुगीन सरंजामदारी प्रवृत्तीच्या वर्गांनी उचलून धरली होती. ही मंडळी राजनिष्ठ होती. या राजनिष्ठ सरंजामदारांपासून बहुजनसमाजाला फोडून वेगळे करण्याचे काम या म. गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या राजकीय आंदोलनाने केले. वैचारिक द्वंद्वे, संघर्ष यांचे पडसाद वारंवार उमटत होते. या राजकीय स्वातंत्र्याच्या ध्येयवादी क्षोभामध्ये भगतसिंगसारख्या सशस्त्र क्रांतिवाद्यांनी भावनेची आग निर्माण केली. जतींद्रनाथ दास या सशस्त्र क्रांतिकारकाने कारागृहामध्ये आमरण उपवास अनेक आठवडे, ६२ दिवस चालविला, व त्यातच आत्मार्पण केले. याचा विलक्षण परिणाम देशाच्या तरुण पिढीवर झाला. जतींद्राच्या अन्नत्यागाच्या बातम्या रोज यायच्या. ते क्षीण होत गेले. त्यांची शुद्ध गेली. त्यांचा जीवात्मा राष्ट्राच्या आत्म्यामध्ये विसर्जन पावला. हे सगळे रोज वाचत असता यशवंतराव रात्रंदिवस दुःखाने आणि असंतोषाने अस्वस्थ होत होते. जतींद्रांच्या आत्माहुतीची वार्ता वाचल्याबरोबर घरातलेच अत्यंत जिव्हाळ्याचे कोणीतरी दगावले अशा भावनेने ओक्साबोक्शी रडू लागले. अनेक दिवस त्यांचे नेत्राश्रू ओघळत होते. यशवंतराव म्हणतात, ''जतींद्राच्या देहातील राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रखर वलय माझे अंतःकरण छेदून गेले.'' भारतीय स्वातंत्र्याच्या काँग्रेसच्या आंदोलनात संपूर्णपणे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताच वयाच्या १६ व्या वर्षी ते सामील झाले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका निराळ्या पर्वाची ही घटना सूचक ठरली. सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत विलीन झाल्याची ही घटना सूचक होय. टिळक हायस्कूलमध्ये यशवंतराव वक्तृत्वही शिकले. वयाच्या १६ व्या वर्षी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे रु.१५०- बक्षीस यशवंतरावांनी मिळविले. याच सुमारास म्हणजे १९३० साली म. गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ब्रिटिशांचे राज्य गरिबाकरिता नाही. गरिबांना जाचक असे कायदे ब्रिटिशांनी केले आहेत. ते कायदे मोडणे व मोडल्यावर झालेली शिक्षा शांतपणे भोगणे म्हणजे सविनय कायदेभंग. मीठ खासगी रीतीने परवाना घेतल्याशिवाय कोणी बनवू नये असा कायदा होता. म. गांधींच्या चळवळीच्या कार्यक्रमामध्ये हा कायदा मोडून कारागृहवास प्रतिकार न करता किंवा बचाव न करता पत्करायचा हा मुद्दा अंतर्भूत केलेला होता. हा कायदेभंग प्रतीकात्मक होता. ही चळवळ देशभर पसरली. गांधींनी दांडी नावाच्या समुद्रकाठच्या गावाकडे ८० सत्याग्रहींसह साबरमतीच्या तीरावरून पदयात्रा सुरू केली आणि तेथे मिठाचा कायदा मोडला. ह्या दांडी यात्रेची वार्ता रोज वृत्तपत्रांत प्रकाशित व्हायची. गावोगाव, शहरोशहरी मोर्चे आणि प्रचाराच्या सभा व्हायच्या. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाने यशवंतरावांना ओढून घेतले. यशवंतरावांच्या भाषेत बोलायचे म्हणजे अहमदाबादजवळील साबरमती नदीच्या तीरावरून दांडीमार्च सुरू झाला. त्याने उठलेल्या या वादळाने कृष्णाकाठ पुरा भारून गेला. या वादळाने भारताची सगळी शहरे आणि खेडी थरारू लागली.