मराठी मातीचे वैभव-१- प्रकरण १

                                       यशवंतराव चव्हाण
                                           फ. मु. शिंदे



सावलीच्या स्पर्शानं
वृक्ष मनात
उतरावा
उन्मळू नये कधीच
तसाच तो राहावा
तुम्ही गेल्यानंतर
खेड्यातल्या हृदयातील
डहाळ्यांच्या पानोपानी
तशीच
लहर शहारून गेली
कोरलेली प्रतिमा
जवळ अधिकच आली !

खोट्या जवळिकेतला
खरा दुरावा
लपत नाही
अतृप्त आत्म्यांना
चांगुलपणाही खपत नाही
यशवंतराव गेले...
कशासाठी एवढा
त्यांचा आता उदोउदो....
वेटोळ्यात शंखशिंपले
बाळगणारे
नाग फुत्कारले
आणि भेगाळ जमिनीलाही
दुष्काळातल्या
कीव आली
आठवणीतल्या भिजलेपणाच्या
गहिवरानं
गरळही पचवली.
फेट्या पागोट्यातल्या
पटक्यातल्या
मुंडाशातल्या माणसाला
फुत्कारातला डाव
कळत नाही
गाळसाकडं गोरेपणा
वळत नाही

रानावनानं शेतानं
तुम्ही झुळझुळला
अक्षराच्या ओढीनं
पायातला वाळा
पाळण्यात खुळखुळला
तिथला मुलुख
बांधून पदरात सुख
नाही आठवणार
असं कधी होईल का ?

हिमालयाच्या हाकेसरशी
सह्याद्री सरसावला
कृष्णेच्या डोळ्यातले तेव्हाचे
तेजतरंग
कोयनेच्या संगमात आजही उसळतात
देश प्रदेश अखंड मिसळतात
तिथं का नसता तुम्ही ?

कोणत्याच नकाशात
जमीन मावत नसते.
माणसांशिवाय मन
धावत नसते
वाटा विसरणारा वाटसरू
भोक्ता असतो
दगडाचा
रमून शिल्पात तुम्ही
आकार गोंजारले
म्हणून तरी
उद्ध्वस्त का होईना
गाव आहे
खंगून गेलेल्या माणसाला
सांगण्यापुरते
नाव आहे
त्या सर्वांनी
आटलेल्या अश्रूंत तुम्हालाही ठेवलं !
शांत शीतल स्वरांची
आवड

वेणूच्या प्रसन्नतेत
बहरताना
कृष्णेचा काळ काळजातून
निसटला नाही
जोडणारा धागा
ओढणारं नातं
एकच सर्वांसाठी
कित्येकांच्या अशा
किती तरी गाठीभेटी !
तुडुंब नद्या भेटल्या
थोपवलेले जलाशय
भेटले
वाट काढून वाहणारे
कालवे भेटले
तृप्त मातीची कृतज्ञता
गाणारी हिरवी
शेतं भेटली
या सार्यांचा कधीच
दुस्वास न करणारे
कोरडे नाले भेटले
आसपासच्या कंठातली
तहान भेटली
अवर्षणातला
दुष्काळ भेटला
माणूसच माणसाचा
काळ भेटला

टाहोची किंचाळी भरलेला
नाळ भेटला
भेगातून डोकं खुपसून
निपचित पडलेला
नांगराचा फाळ भेटला
एका डोळ्यात
स्वप्न
आणि दुसर्यात
सल
घेऊन चालतानाही हर्षव्यथा
सांभाळली ती कशी ?

तुम्हाला
कुंपणावर बसवले
त्यांनी
क्षणभर हसवले
मनभर फसवले

कोण कुणाचा
काय लागतो
तितकाच तो
तिथं जगतो
इथल्या माणसांचा
वास केव्हा येईल
सांगता येत नाही
कळपाच्या अंगणाशिवाय
त्यांना रांगता येत नाही

भोगले नाही
चुकांचे शाप
असा कोण आहे
आला नाही
वाट्यास विलाप
असा कोण आहे ?

सोसल्या भोगल्यातून
घडले
त्यांनीच युगांचे बंद
दरवाजे उघडले

त्यातून आज
जाता येतं
विशाल काही
घेता येतं

तुम्ही त्यांतलेच
जे जे देऊन गेले
पहाटेच्या प्रकाशात
             क्षितिज ठेवून गेले !