• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ३९

गांधीवादी पर्यायही नाकारला

समाजवादाचा रॉयप्रणीत आराखडा जसा चव्हाणांनी नाकारला तद्वतच गांधींनी समाजवादाच्या विचारसरणीला एतद्देशीय स्वरूपात मांडण्याचा केलेला प्रयत्नही चव्हाण स्वीकारू शकले नाहीत.  पश्चिमी समाजवादाला पर्याय म्हणून रॉयचा नवमानवतावाद होता.  तसाच गांधींचा सर्वोदय विचार होता.  पण चव्हाण त्या विचारापासूनही अलित्पच होते.  गांधी-नेहरू असा संयुक्त उल्लेख ते करीत असले तरी त्यांचा कल स्पष्टपणे नेहरूंच्या बाजूने होता.  ''स्वतःला कधीच गांधीवादी न म्हणवून घेणारा मला भेटलेला पाहिला नेता'' असे त्यांचे वर्णन वेलेस हँजेन या लेखकाने केले आहे.  (हू आफ्टर नेहरू १,१३२).  भूमिगत चळवळीच्या खडतर वाटचालीत त्यांचे राजकीय संगोपन झाले असल्यामुळे असेल किंवा जहाल व झुंजार सातारा जिल्ह्याच्या 'समाजवादी' संस्कारामुळे असेल पण गांधीप्रणीत अहिंसा-सत्य-अस्तेयादी व्रतस्थ जीवनादर्शाचे त्यांना कधीच फारसे आकर्षण वाटले नाही.  वैयक्तिक जीवनातही विक्तिपूर्ण आचरणाचे त्यांनी स्तोम माजवले नाही.  सुखवस्तु जीवनपद्धती त्यांना आवडायची.  गांधींची आध्यात्मिकताही त्यांना मानवणारी नव्हती.  गांधीविचाराविरुद्ध बंडखोरी त्यांनी कधी केली नसली तरी वर्तमानकाळात गांधीवादाची तत्त्वे बरीच गैरलागू झाली आहेत याबद्दल ते निःशंक होते.  स्वतः खादी वापरीत असले तरी खादीचे संपूर्ण तत्त्वज्ञान त्यांनी कधीच स्वीकारले नव्हते, आणि गांधीमार्गातील विधायक कार्यक्रम, क्रियाशील कार्यकर्ते, जनसंपर्क वगैरेबद्दल त्यांना आस्था असली तरी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रूप द्यायचे सामर्थ्य त्या कार्यक्रमात आहे काय ?  या प्रश्नाचे त्यांचे उत्तर स्पष्ट नकारार्थी होते.  (कृष्णाकाठ, १५६).  त्यामुळे गांधीप्रणीत समाजवादाचा पर्याय त्यांनी गंभीरपणे विचारात घेतलाच नव्हता.

नेहरूंचा समाजवाद

यशवंतरावांनी स्वतःला ''नेहरूवादी'' हेही विरुदकधी लावले नसले तरी त्यांनी आपल्या निष्ठा नेहरूंना समर्पित केल्या होत्या हे स्पष्ट आहे.  रॉयच्या मार्क्सवादात उगम पावलेली त्यांची विचारसरणी नेहरूंच्या समाजवादात परिणत झाली होती असे रास्त विधान तर्कतीर्थांनी केले आहे.  नेहरूंच्या मार्गाने काँग्रेस गेली तर देशात समाजवाद येईल याची त्यानां एवढी खात्री होती की, नेहरू जे म्हणतील व करतील तोच समाजवाद हे त्यांनी जणू गृहीतच धरले होते !  त्यांच्या प्रारंभिक काँग्रेसनिष्ठेचे रूपांतर असे नेहरूनिष्ठेत झाल्यामुळे आपल्या ''मूळ'' समाजवादी धारणांना मुरड घालण्याचे अनेक प्रसंग पुढे त्यांच्यावर ओढवले.

नेहरूंची वैचारिक परिबद्धता समाजवादाशी निश्चितपणे होती.  रशियातील समाजवादाच्या यशाचे त्यांना कौतुक होते.  भारतातले प्रश्नही रशियातील प्रश्नांप्रमाणेच असून समाजवादाच्या मार्गाने त्यांची सोडवणूक होऊ शकेल अशी त्यांना खात्री वाटे.  १९३६ साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ''समाजवाद म्हणजे अशी एक व्यवस्था की जीमध्ये भूमी आणि भूमीची फळे यांचा समाजाच्या हितासाठी अशा तर्हेने उपयोग व्हावा की, मिळणारा लाभ खासगी मालमत्तेच्या अपघाताने न ठरता लोकांनी केलेल्या सेवेच्या प्रमाणात ठरावा'' (स्पीचेस, खं. ३,१५६-७).  उत्पादन व वितरणाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण करून त्याद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणणे हा त्यांच्या मते समाजवादाचा गाभा होता.  १९३७ नंतर क्रमशः काँग्रेसची मंत्रिमंडळे सत्तेवर आल्यानंतर आधी काँग्रेस चळवळीबद्दल तटस्थ असलेला स्थानिक भांडवलदारवर्ग काँग्रेसला पैसा व पाठिंबा पुरवू लागला, आणि मग नेहरूप्रभृतींना आपल्या समाजवादी विचारांना मुरड घालणे अनिवार्य होऊ लागले.  जोपर्यंत काँग्रेस सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या ध्येयवादाच्या बळावर उभी होती आणि जनजागृती व जनसंघटनातूनच आपले आधार भरभक्कम करू पाहात होती तोपर्यंतच्या नेत्यांची समाजवादी ध्येयनिष्ठा टिकून राहू शकली, पुढे मात्र ती शिथिल होणे भाग ठरले.  नेहरूंनी आणि नेहरूनंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी पुनःपुन्हा समाजवादी कार्यक्रमांचा जोरकस जाहीर पुरस्कार केला असला तरी ख-या अर्थाने काँग्रेस कधीच समाजवादी होऊ शकली नाही.  नेहरूंच्या समाजवादाची ही अपरिहार्य शोकान्तिका होती आणि स्वाभाविकच नेहरूंमध्ये समाजवादाचे आदर्श शोधणा-या चव्हाणांसारख्यांच्या पदरीही निराशा येणे त्यामुळे अटळ ठरले होते.