यशवंतरावांना निवड करायची होती. त्यांनी विचार केला समाजवादी बुद्धिमान व देशभक्त निःसंशयपणे आहेत, पण ते पुस्तकी आहेत. हस्तिदंती मनो-यात बसून चिंतन करणारे आहेत, लोकांच्या प्रश्नाचे त्यांना यथार्थ आकलन नाही, त्यांच्या पुस्तकी विचारांना शहरी झालर आहे. जनतेमधील आंदोलनाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मुळीच नसल्यामुळे ते या देशात समाजवाद आणू शकणे असंभवनीय आहे. याउलट रॉय तुरुंगातून आपल्या अनुयायांना पत्राद्वारे जे विचार कळवीत किंवा चळवळ-बांधणीविषयी मार्गदर्शन करीत ते पाहिल्यावर समाजवाद्यांच्या भोंगळ विचारांपेक्षा रॉय यांची मांडणी अधिक नेमकी आहे, तीत ठाम दिशा आहे अशी यशवंतरावांची भावना झाली. अर्थात रॉय यांच्या विचारांपेक्षा व्यक्तिमत्त्वानेच ते जास्त प्रभावित झाले होते हे त्यांच्या लेखनावरून दिसते (कृष्णाकाठ, १९०). रॉय यांची तीव्र बुद्धिमत्ता, मार्क्सवादाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, रशियात लेनिनसोबत केलेले राजकीय व वैचारिक कार्य, चीन, द. आफ्रिका व मेक्सिकन क्रांतीतील प्रत्यक्ष सहभाग आणि पूर्व आशियायी देशामध्ये ज्या भांडवलशाहीविरोधी चळवळी करायच्या त्याच्या आखणीतील जागतिक पातळीवरचा पुढाकार - या बाबींमुळे रॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक तेजोवलय त्या काळात निर्माण झाले होते. समाजवाद्यांपेक्षा रॉयवाद्यांमध्ये समाजवादी क्रांती घडवून आणण्याची अधिक क्षमता आहे असे त्या वेळी यशवंतरावांना वाटून त्यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला आणि रॉयवाद्यांची सोबत धरली.
रॉयवादी प्रतिपादनातील पुढील दोन गोष्टी चव्हाणांना पटत होत्या. एक, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांतीची लढाई आहे आणि ती कामगार व शेतकरी यांनी संयुक्त बळावरच लढवायची आहे, त्या दृष्टीने कोट्यवधी गरीब शेतक-यांना वर्गहिताच्या मागण्यांच्या आधारे संघटित करणे हे मुख्य कार्य असून हे ऐतिहासिक कार्य फक्त काँग्रेसच पार पाडू शकेल; आणि दुसरे असे की, राज्यक्रांती करायची असेल तर आधी देशामध्ये विचारक्रांती घडवून आणली पाहिजे, त्याशिवाय समाजवादाची क्रांती होणार नाही. विचारक्रांतीसाठी डोळसपणाचे वातावरण निर्माण केले पाहिजे, परंपरावादी दृष्टीने आंधळेपणाने गोष्टी स्वीकारण्याची मनोवृत्ती काढून टाकली पाहिजे (कृष्णाकाठ, १९२). चव्हाणांनी त्या काळात रॉय यांच्याशी ''भारतीय सामाजिक क्रांतीतील किसानांचे स्थान आणि राज्यक्रांतीचे तंत्र'' या विषयावर सविस्तर खल केला होता असे तर्कतीर्थ लक्षणशास्त्री सांगतात (चव्हाण अभिनंदन ग्रंथ, ८).
रॉय यांचा आपल्यावर प्रभाव झाला तो केवळ बौद्धिक व तात्त्वि पातळीपुरताच परिमित होता, त्यापेक्षा अधिक खोलवर तो जाऊ शकला नव्हता हे खुद्द चव्हाणांनीच सांगितले होते (कुन्हीकृष्णन, ३३). स्वातंत्र्योत्तर देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नाचे गांभीर्य रॉय यांच्या शिकवणुकीतून त्यांना पटले असले तरी हे प्रश्न दुय्यम आहेत. स्वातंत्र्य हेच प्रथम महत्त्वाचे आहे अशीच त्यांची एकंदरीत धारणा होती. काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उभे करण्याची रॉयची भूमिका तर त्यांना कधीच पटली नव्हती. हे रॉयवादी काँग्रेसला अप्रत्यक्षतः कमजोर तर करणार नाहीत ना ही भीतीही चव्हाणांच्या मनात सतत वावरत होती. (कृष्णाकाठ, १९२). रॉय तुरुंगातून सुटल्यावर काँग्रेसवाल्यांनी त्यांचे थंड स्वागत केले तेव्हा तर चव्हाणांची खात्रीच झाली. तासगावची रॉयवाद्यांची परिषद उधळली गेली. जिल्ह्यात रॉयवादी व रॉयविरोधी अशा फळ्या पडल्या तेव्हा ''जिथे गांधी-नेहरू तिथे मी'' ही मूळ स्वभावाशी सुसंगत भूमिका चव्हाणांनी स्वीकारली. दुस-या महायुद्धात सहभागी होण्याच्या प्रश्नावरून अल्पावधीतच रॉयवादी व काँग्रेस यांच्या वाटा वेगळाल्या झाल्या आणि चव्हाणांच्या आयुष्यातले रॉयपर्व संपुष्टात आले.
चव्हाणांवर रॉयच्या विचारसरणीतून समाजवादाचे खूप ठळक संस्कार झाले होते असे म्हणता येणार नाही. कारण नंतरच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी त्या विचारसरणीचा कुठेही आग्रह धरलेला आढळत नाही. रॉयवादातल्या त्यांना पटलेल्या उपरोक्त दोन बाबींचा - काँग्रेसतर्फे शेतक-यांचे वर्गहिताधारे संघटन आणि विचारक्रांतीचे प्रयत्न - त्यांच्या हातून पाठपुरावाही झालेला दिसत नाही. युद्धातल्या सहभागावरून मतभेद झाला हे समजू शकले तरी रॉय यांनी पुढे जो नवमानवतावादी विचार मांडला तो मार्क्सवादाला भारतीय परिस्थितीशी जुळवण्याचाच एक खटाटोप होता. चव्हाणांची भूमिका तशी असली तरी त्यांनी रॉयवादाचा आधार मात्र पुढे कधीच घेतलेला दिसत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, त्यांना वाटलेले आकर्षण रॉय यांच्या विचारांपेक्षा व्यक्तिमत्त्वाचेच होते आणि त्याचे स्वरूप बौद्धिक असण्यापेक्षा भावनिकच होते. लवकरच ते यथाक्रम विरले.