''संसदीय'' समाजवाद
जनआंदोलनांच्या प्रयत्न अनुभवांमधून भारतीय समाजवादाची उभारणी होईल असे चव्हाणांनी वारंवार म्हटले असले तरी त्यांनी स्वतः मात्र पुरोगामी कायद्यांद्वारे निश्चितपणे समाजवाद आणता येईल अशी खूणगाठ बांधूनच राजकारण केले. तत्त्वाखातर राजकारणातून बाहेर पडण्याची पाळी त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आली त्या प्रत्येक वेळी तत्त्वाला मुरड घालूनही सत्तास्थानांवर राहणेच त्यांनी पसंत केले. यावरून समाजवादासाठी जनआंदोलनांपेक्षा सत्ताकारणाचे माध्यमच श्रेयस्कर मानण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट होते.
१९४६ च्या निवडणुकांनंतर ते मुंबई राज्याच्या गृहखात्याचे संसदीय सचिव झाले. हँजेनच्या म्हणण्याप्रमाणे लवकरच त्यांच्या लक्षात आले की, तरुणपणीच्या आपल्या समाजवादाच्या रोमँटिक कल्पना युद्धोत्तर टंचाईग्रस्त मुंबई राज्याच्या अर्थव्यवस्थेत सपशेल गैरलागू आहेत. अन्न-वस्त्र-निवारा-संपर्क साधने-ऊर्जा वगैरे सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आणि भडकती महागाई अशी सर्वत्र दुर्दशा होती. समाजवादाच्या सैद्धान्तिकांनी वाचाळपणे पुरस्कारलेली नियंत्रणे सहजासहजी धाब्यावर बसवली जात होती. भ्रष्टाचार भारतीय समाजजीवनाच्या हाडी मुरला होता (हँजेन, १३९). या अनुभवानंतर यशवंतरावांनी काँग्रेसच्या प्रचारात समाजवादी पण आचारात भांडवलदारी असलेल्या, धोरणांना मूकसंमती देण्याचा वसा स्वीकारला. काँग्रेसचे नामांतर ''काँग्रेस समाजवादी पक्ष'' असे करावे असा जो ठराव शंकरराव मोरे यांनी आणला होता तो मान्य करणे या परिस्थितीत काँग्रेस पक्षाला शक्यच नव्हते.
काँग्रेसच्या शहरी भांडवलदारधार्जिण्या धोरणाविरुद्ध केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव प्रभृतींच्या पुढाकाराखाली एक गट काँग्रेसमध्ये संघटित होत होती. त्याची एक बैठक खुद्द यशवंतरावांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. पुरोगामी विचार आणि कार्यक्रमाच्या आधारे ग्रामीण शेतकरीवर्गाचे व एकूणच बहुजनसमाजाचे हित साधावे हा या पक्षाचा हेतू होता. यशवंतरावांच्या मूळ समाजवादी भूमिकेशी तो सुसंगत होता. पण जेव्हा हा गट काँग्रेसबाहेर पडला तेव्हा यशवंतराव मात्र त्यांच्यासोबत गेले नाहीत. राष्ट्रीय राजकारणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसच प्रभावी ठरेल अशा विचारांती चव्हाणांनी तसे केल्याचे त्यांचे सर्व चरित्रकार (उदा. बाबुराव काळे, ५४) सांगत असले तरी यात वैचारिक आत्मप्रतारणा व तत्त्वच्युती होती हे लपवून लपवता येत नाही.
पुरवठामंत्री असत ना अन्नधान्यावरची नियंत्रणे यशवंतरावांनी काढून टाकली होती, किंवा शेतक-यांनी अधिक धान्य पिकवावे म्हणून त्यांना आर्थिक प्रलोभने दिली होती. शेतक-यांची उत्पादनप्रेरणा जमिनीच्या स्वामित्वाशी निबद्ध आहे असे मत मांडून त्यांनी सहकारी शेतीची कल्पना उडवून लावली होती. यशवंतरावांचा दृष्टिकोण व्यवहारी व फलितदर्शी असल्याचे सांगून काही भाष्यकारांनी या त्यांच्या समाजवादाशी विसंगत भूमिकांचा गौरवही केला होता. परिस्थितीतील वास्तवाशी चव्हाण कसे चपखलपणे जुळवून घेत हे सांगताना हँजेन म्हणतो की शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी आर्थिक प्रलोभने प्रभावी ठरतात हे चिनी नेत्यांनी उपेक्षिलेले सत्य चव्हाणांनी अचूक हेरले होते (हँजेन, १४०). तर शेतीची उत्पादनप्रेरणा यशवंतरावांनी स्वामित्वाशी जोडल्यावर, त्यांचा समाजवाद पाठ्यपुस्तकी नसून 'लोकांचा' समाजवाद असल्याचे शिफारसपत्र ब्लिटझचे संपादक आर. के. करंजिया यांनी दिले होते (अभिनंदन ग्रंथ, २१). चव्हाणांच्या समाजवादात मार्क्सची नीतिवचने नसली तरी मार्क्सवाद भारतीय परिस्थितीला लागू करण्याचे मनोधैर्य असल्यामुळे पुस्तकी समाजवाद्यांनाच नव्हे तर 'समाजवादाचा उच्चार पण समाजवादविरोधी आचार करणा-या' काँग्रेसवाल्यांनाही आपल्या मागे खेचून नेण्याचे सामर्थ्यही त्या संपादकांना यशवंतरावांच्या ठिकाणी जाणवले होते.
संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे चव्हाण मुख्यमंत्री होते. त्या काळात अत्यंत प्रतिकूल राजकीय प-यावरण असूनदेखील ते ग्रामीण बहुजन समाजाप्रमाणेच मुंबईतील अ-मराठी भांडवलदारांची मने आपलीशी करू शकले. वास्तविक आधीच आवडी अधिवेशनाच्या समाजवादी समाजरचनेच्या घोषणेने किंचित् चिंताक्रांत झालेला हा भांडवलदारवर्ग तळागाळातून आलेल्या एका मराठी माणसाच्या हाती सत्तेची सूत्रे गेल्यामुळे अधिकच हवालदिल झाला होता. गुजराती व्यापा-यांच्या देशी वसाहतवादावर चव्हाणांनी डागलेल्या तोफेचे पडसाद अजूनही पुरते विरलेले नव्हते. तरी पण अल्पावधीतच मुख्यमंत्री चव्हाणांनी या व्यापारीवर्गाचा विश्वास आपल्या प्रत्यक्ष कारभारातून संपादित केला. समाजवादविषयक संदिग्धतेतच त्यांच्या या यशाचे रहस्य शोधावे लागेल. विचाराने डावी पण व्यवहारात लवचिक माणसे नेहरूंना आवडायची. यशवंतराव नेहरूंना त्यामुळे लवकरच प्रिय झाले (हँजेन, १५७). ए. डी. श्रॉफ या मुंबईच्या एका बड्या सावकाराने चव्हाणांसंबंधी केलेले विधान या संदर्भात लक्षणीय आहे. तो म्हणतो, ''यशवंतराव नेहरूंना खूष करण्यासाठी इतर अनेकांप्रमाणे समाजवादी असल्याचा देखावा करीत असले तरी खासगी उद्योगक्षेत्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण सहानुभूतीचा आहे.'' (कित्ता, १४७).