विदेश दर्शन - १७२

८६
५ सप्टेंबर

Bai laterial चर्चा साडेतीन तास झाली. तपशीलाने आम्ही आमची विदेशी धोरणे व अंतर्गत धोरणे मांडली. श्री. दुगर सुरेन यांनी "Masterly presentation'' असा उद्गार खाजगी बोलण्यात काढला. रात्रीच्या व दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांचे प्रमुख मंत्रि भेटले.

मंगोलिया-भारत मैत्री संघामध्ये गेलो. संस्कृत, वाङ्मय, व्याकरण, इतिहास यावर सखोल माहितीने बोलणारे दोन-तीन विद्वान भेटले. पाणिनीच्या व्याकरणाचे मंगोलियन भाषांतर पूर्वीच झालेले आहे. कालिदासाच्या 'मेघदूताची' दोन भाषांतरे आहेत. त्यांपैकी एक १५ व्या शतकातील आहे. प्रो. लोकेशचंद्राचा येथे लौकिक आहे. त्यांचे पिताजी डॉ. रघुवीर यांनाही येथे मानतात.

''चेंगिझखान हे यांचे थोर ऐतिहासिक पुरुष! बाराव्या-तेराव्या शतकातील, मंगोलियाचे ऐक्य याने घडवून ते एकछत्राखाली आणले. तो धर्माने बुध्द किंवा मुसलमान असा काहीच नव्हता. आदिम होता. निर्दय पण शूर होता. 'क्रायसेस्' मध्ये असाच नेता लागतो.''

(इति मंगोलियन्स्)

८७
७ सप्टेंबर

सेंट्रल व आर्टस् म्युझियम्स पाहिली. लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे कित्येक हजार वर्षांपूर्वी दगडावर कोरलेली काही चित्रे.

पंतप्रधानांची एक तास भेट झाली, पण विशेष काही नाही. संध्याकाळी रिसेप्शनला रशियन-चायनीज राजदूत व इतरही होते. थोडयाफार गप्पागोष्टी झाल्या. नंतर स्थानिक मिशनचे कर्मचारी भेटले. येथील हिवाळा भयंकर अवघड असतो. बर्फ तसा नसतो. पण 'उणे पस्तीस-चाळीस' असे हवामान असते. डाळ हा पदार्थ खायला मिळत नाही. औषधोपचाराची फार गैरसोय. हिंदी डॉक्टर हवा - येथे मुलेबाळे कोणीच ठेवलेली नाहीत - इथे काम करणारांच्या अडचणी फार आहेत. वगैरे तक्रारींची आम्ही नोंद घेतली आहे. असलेच काही लिहावे लागत आहे.