विदेश दर्शन - १५८

आज रात्री, मला न सांगता, बरोबरच्या सर्व ऑफिसर्सनी लग्नाच्या वाढदिवसाचा केक आणून समारंभपूर्वक जेवण दिले. That was very sweet of them. मी त्यांचे मनापासून आभार मानले.

आल्यापासून क्षणाचीही फुरसत नाही. सर्व वेळ कामात, चर्चेत, भेटीत व परिषदेत जातो. किंबहुना वेळ पुरतच नाही म्हटले तरी चालेल.

डोळयांवर झोप आहे, पण लिहिणे पुरे केल्याशिवाय बिछान्यावर पडावयाचे नाही या निर्धाराने ते पुरे करीत आहे. प्रकृति सुदैवाने चांगली आहे.

- ता. क. - आजचा* दिवस तुझ्या स्नेहल, सुखद सोबतीच्या शुभारंभाचा दिवस, म्हणून मला त्याचे फार मोल आहे.

सुखदु:खांच्या ऊन-सावलीत, एकमेकांच्या मदतीने केलेला हा प्रवास तसा आनंददायी झालेला आहे. माझी तृप्ती आहे. अशीच अखेरपर्यंत सोबत दे.
-------------------------------------------------------------------------------------------
* दि.२२ जून हा दिवस यशवंतराव-वेणूताई यांच्या विवाहाचा वाढदिवस
-------------------------------------------------------------------------------------------

८० जकार्ता (इंडोनेशिया)
२१ जुलै, १९७६

काल संध्याकाळी येथे पोहोचलो. मुंबईहून दीड तास विमान उशीरा निघाल्यामुळे चिंता होती की सिंगापूरचे एअर-लाईनचे कनेक्शन तर चुकणार नाही! पण १५-२० मिनिटे वेळेत पोहोचलो व कसेतरी कनेक्शन मिळाले.

डॉ. आदम मलिक - येथील विदेशमंत्रि - इतर प्रमुख अधिकारी आणि हिंदी समाजाचे प्रमुख स्त्री-पुरुष हजर होते. तडक हॉटेलमध्ये व तेथून लगेच येथील राजदूत श्री. मेहबूब याच्या घरी जेवणासाठी गेलो.

जेवणापेक्षा येथे प्रथम आलेले आमचे अधिकारी आणि आमच्या दूतालयाच्या अधिकाऱ्यांशी मी येण्यापूर्वी चर्चेत घडले आहे काय काय आणि उद्याची चर्चा कोणत्या स्वरूपाची असावी याबाबत करावयाचे गुफ्तगूला अधिक महत्त्व होते. हॉटेल्सपेक्षा अशा ठिकाणी चर्चा अधिक स्पष्ट व सुरक्षितपणे करता येते. रात्री ११ वाजेपर्यंत यात वेळ गेला.

या देशाचे आमचे संबंध अनेकविध वळणांतून गेले आहेत. प्रथम स्वतंत्र होणारे हिंदी महासागरातील प्रमुख देश म्हणून आणि नॉन-अलाइन्ड विचारसरणीचे उद्गाते या नात्याने या देशाचे फार जवळचे संबंध आले.